‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’च्या जानेवारी १९८१च्या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्याच वर्षी पुढे ऑक्टोबर ४ व ५ रोजी करमाळा येथे आनंद कोठाडिया यांनी आपल्या ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने तेथील जयप्रकाश नारायण सांस्कृतिक सभागृहात द्विदिवसीय युवा विचार प्रबोधन शिबिर योजले होते.
यास ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’, मुंबईचे सहकार्य लाभले होते. या शिबिरास न्यायमूर्ती वि. म. तारकुंडे, प्रा. मोकाशी, दैनिक ‘सकाळ’चे संपादक एस. के. कुलकर्णी, डॉ. इंदुमती पारिख, साथी एम. एस. ढोले, अॅड. काणे, भाई अ. के. भोसले, ‘मॅगसेसे’ पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे, श्री रानपारखी प्रभृती मान्यवर रॉयवादी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन युवकांना लाभले होते. या शिबिराचे उद्घाटन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात तर्कतीर्थ म्हणाले की, सामान्य लोकांना विचार करण्याची सवय लावावी लागते, आजच्या सामाजिक जीवनात नेते धर्म व पुरोहितांनी सांगावे आणि त्याप्रमाणे आचरण घडावे, त्यानुसार होणाऱ्या चुकांची जबाबदारी आपलीच ठरते. बाह्य आदेश तपासण्याची विचारशक्ती माणसाला जन्मत:च लाभलेली आहे. आजपर्यंतची आपली परंपरा ही सांगितले ते ऐकण्याचीच आहे.
आपण विचार करून त्याच्या बाजू, कक्षा शोधतो. त्यात सत्य सापडले नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली कृती खड्ड्यात नेणारी ठरते. उपलब्ध ज्ञान व वस्तुस्थिती यांचा समन्वय साधून निष्कर्ष व त्यानुसार आचरण करण्याची सवय निर्माण झाली पाहिजे. आकाशातील चंद्र, तारे, सूर्य यांच्या दिशा व अंतराचे मोजमाप करण्यासाठी, काम करण्यासाठी निसर्गाने दिलेल्या हातांच्या दहा बोटांचा वापर प्रथम माणसाने केला. त्यातून दशांश पद्धती जन्माला आली.
जग निर्मितीकामी माणसाने केलेल्या निर्मितीचे मोजमाप नसेल, तर तेथे ज्ञान असणार नाही. आजचे ज्ञान, विज्ञान ज्यायोगे माणूस मोटार, विमान, अवकाशयान चालवितो, याचे ज्ञान माणसाला अवगत होण्यासाठी काल, स्थल, मोजमाप या तीन गोष्टी माहीत होण्याची गरज आज भासते आहे.
तर्कतीर्थांचे हे विचार मूळ मानवेंद्रनाथ रॉयप्रणीत ‘नवमानवतावाद’वर आधारित असल्याचे लक्षात येते. त्यांच्या विचारांमध्ये ज्ञान, तत्त्वज्ञान आणि वस्तुस्थिती हे मुख्य गाभा घटक दिसून येतात. रॉय यांचे हे घटक अनुभवाधारित ज्ञान म्हणून महत्त्वाचे ठरतात. त्यांची अशी धारणा होती की, मानवी ज्ञान हे इंद्रियजन्य अनुभव आणि वैज्ञानिक निरीक्षणांवर आधारित असते, त्यामुळे ते अध्यात्म, अंधश्रद्धा, रूढी परंपरांना नाकारते. वैज्ञानिक ज्ञानावर आधारित समाजपरिवर्तनच मानवासाठी अंतिमत: हिताचे ठरते. त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी धारणा असणे त्याची पूर्वअट असते. बौद्धिक स्वातंत्र्य हाच सर्व प्रकारच्या विचारांचा पाया व केंद्रबिंदू हवा. यातूनच मनुष्याचे चरम विचारी बनणे शक्य आहे. विज्ञानाच्या मदतीने मनुष्य स्वत:ला व समाजाला उन्नत करू शकतो, हा विश्वास यामागे दिसून येतो.
मानवेंद्रनाथ रॉय यांची विचारसरणी ही वस्तुनिष्ठ वास्तववादावर उभी आहे. मानवेंद्रनाथ रॉय प्रारंभीच्या काळात मार्क्सवादी होते; पण जसे त्यांनी भारतीय समाजजीवनाचा अनुभव घेतला आणि अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, केवळ भौतिकतावादी चिंतन व व्यवहाराने मानवी जीवन संपन्न होणार नाही. त्याचा गाभा घटक (आत्मा) व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणून मग ते मानवकेंद्रित भौतिकतावादाचा विचार करू लागले. त्याचीच निष्पत्ती म्हणजे नवमानवतावाद होय.
वरील शिबिरात तर्कतीर्थांनी विज्ञानाधारित वस्तुस्थितीची केलेली मांडणी ही धर्म, अंधश्रद्धा आणि रूढींना नकार देणारी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाने स्वविवेकाचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजपरिवर्तनाचे प्रयत्न केले पाहिजेत, असे आचरण मानव समाजास अंतिमत: धर्मनिरपेक्षतेकडे घेऊन जाणारे ठरते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी ‘रीझन, रोमँटिसिझम अँड रिव्होल्युशन’ ग्रंथात यावर पुरेसा प्रकाश टाकला आहे. ‘बुद्धी, प्रेरणा आणि क्रांती’ या शीर्षकाने या ग्रंथाचे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. हे भाषांतर बा. रं. सुंठणकर यांनी केलेले आहे.