‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. या वार्षिकाच्या प्रतिनिधींनीच घेतलेली ती मुलाखत ‘सांप्रदायिकता’ विषयावर आधारलेली होती.
या छोटेखानी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांपैकी सांप्रदायिकता म्हणजे काय? सांप्रदायिकतेशिवाय धर्म शक्य आहे का? प्रेषित, चमत्कार, सामंजस्य इत्यादींतून वाट काढत राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव विचाराला बळकटी येऊन सर्वधर्मीयांचा समान विचार करणारी राज्यपद्धती यावर तर्कतीर्थांनी व्यक्त केलेली मते आजही प्रस्तुत ठरतात.
या मुलाखतीत तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांनाच सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, असा आग्रह धरण्यातून संप्रदाय निर्माण होत असतो. या सांप्रदायिक श्रेष्ठत्वाच्या आग्रहापुढे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार दुर्बल ठरतो. वेगवेगळ्या धर्म संप्रदायांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य मर्यादित अर्थानेच स्वीकारले जाते. मर्यादित म्हणण्यापेक्षा प्रासंगिक वा तात्पुरते म्हणणे अधिक योग्य होईल. मुस्लीम समाजात हिंदूंबरोबरचे समान नागरिक अधिकार स्वीकारून समान नागरिकत्व स्वीकारण्याची मानसिकता नाही. ख्रिाश्चनधर्मीयांना अल्पसंख्याक म्हणून राज्य शासनाकडून शासकीय सेवा, आर्थिक व्यवहार, शिक्षण संस्थांत प्रवेश इत्यादी बाबींत विशेष सवलती मिळाव्यात असे त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना वाटते. वेळोवेळी असे ठराव विविध सांप्रदायिक गटांकडून केले जातात. यातून राष्ट्रीय एकात्मता वृत्ती कमकुवत होते, हे लक्षात येत नाही.’’
‘‘सांप्रदायिक अहंकारास मर्यादा घालून विविध संप्रदायांमध्ये सहजीवन भाव खरे तर शक्य असतो. शैव आणि वैष्णव एकमेकांशी जुळवून घेत प्रयत्न करीत असून, त्यास मोठे यश आल्याचे दिसून येते. परधर्मसहिष्णुता हे हिंदू संस्कृतीचे असलेले मोठे वैशिष्ट्य इतिहासाने मान्य केले आहे. स्वत:चाच धर्म खरा आणि दुसऱ्याचा खोटा अशी ताठर भूमिका न घेता धार्मिक जीवन चांगल्या रीतीने चालू शकते. किंबहुना चांगल्या जीवनाला ताठरपणा घातक ठरतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या धर्माशिवाय इतर धर्मांशी बंधुत्वाचे नाते निर्माण करणाऱ्याला आवश्यक अशी उदार आणि व्यापक बुद्धी व दृष्टी जो देईल तोच खरा धर्म होय, असा विचार धर्माचार्यांनी आपापल्या धर्मानुयायींना शिकविला पाहिजे. आज तर याची फार गरज आहे. कारण, सर्व धर्म एकमेकांजवळ येत आहेत. त्यांचे एकमेकांचे ऐहिक हितसंबंध एकमेकांत खूप मिसळले आहेत आणि एका अर्थाने परस्परांवर अवलंबूनही आहेत. परंतु अपवाद धर्माचार्य वगळता सर्व मानवजातीचा आणि जगाचा उत्कट आत्मीयता विचार धर्माचार्य देताना दिसत नाहीत.’’
‘‘प्रेषित, देववाणी, अवतार, चमत्कार इत्यादी शक्तींवर विश्वास ठेवण्याचा कल धर्मानुयायींमध्ये दिसून येतो. यास कोणताही आधार नाही. अंधश्रद्धा यापलीकडे त्यास फारसा अर्थ नाही. त्यामुळे सर्व संप्रदाय एक तर खरे मानले पाहिजेत, नाही तर खोटे. त्यातील एकच धर्मसंप्रदाय खरा असे मानण्यास पुरावा नाही. सर्व धर्मसंप्रदायांमध्ये माथेफिरू आढळतात. हे सगळे माथेफिरू लोकच या जगाच्या नाशास कारण होणार आहेत, असे दिसते. ’’
तर्कतीर्थांचे हे विचार सुमारे चार दशकांपूर्वीचे आहेत. या काळात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रयोग आणि प्रगतीने जगास अंधश्रद्धेकडून विज्ञाननिष्ठेकडे नेले आहे. तरीही जग पूर्णत: धर्मश्रद्धामुक्त झालेले नाही. तर्कतीर्थांच्याच शब्दात सांगायचे झाले तर धर्म नाही असा मनुष्य समुदाय जगात नाही. यातून अधोरेखित होणारी गोष्ट ही आहे की, केवळ भौतिक संपन्नतेने माणसास पूर्ण सुख लाभत नाही. ‘रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे’ यातील कवी नारायण सुर्वे जे सुचवू पाहात आहेत, ते केवळ ‘नाही रे’ वर्गासाठी नाही, तर ‘आहे रे’ वर्गालाही ते तितकेच लागू आहे. आध्यात्मिक आणि आधिभौतिकचे शोधक सत्यशोधकच होत. दोन्हींचे सत्यशोध मार्ग व लक्ष्य जसे भिन्न असतात, तसेच तत्त्वज्ञानातील सत्याचा शोधही भिन्न असतो. जगात अद्याप अंतिम सत्याचा शोध लागला नसल्याने मानव समुदाय वाट पुसत (विचारत) अग्रेसर होत आहेत, इतकेच वर्तमान सत्य आहे.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com