‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’चे द्विदिवसीय कार्यकर्ता अधिवेशन २४ व २५ जानेवारी १९८१ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. या अधिवेशनाचा दुसरा दिवस २५ जानेवारी १९८१ हा मानवेंद्रनाथ रॉय यांचा २७ वा स्मृतिदिन होता. त्याचे औचित्य साधून या अधिवेशनास जोडून तर्कतीर्थांचे जाहीर व्याख्यान योजले होते. या व्याख्यानात त्यांनी ‘विज्ञाननिष्ठ मानवतावाद’ विषयावर आपले विचार मांडले. या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ मराठी समीक्षक आणि वक्ते प्रा. निर्मलकुमार फडकुले यांनी भूषविले होते.
त्यात तर्कतीर्थांनी म्हटले होते की, विसाव्या शतकात विज्ञानाला गृहीतकृत्याचे स्थान लाभले. डार्विनपासून वनस्पती व जीवशास्त्राला शुद्ध अधिष्ठान प्राप्त झाले. जीवनिर्मिती ही रासायनिक प्रक्रिया आहे. हा सिद्धांत मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. हा मानवतावादाचा प्रारंभ समजला पाहिजे. वर्णसंकराने मानवाला काही अपाय होत नाही, म्हणून सर्व मानव एक होत. भारतात जेवढे मानववंश आहेत, ते सर्व मिश्र आहेत. सर्व मानववंशातील भेसळीनंतर जाती जन्माला आल्या. देहात्मतेने पाहिले तर शरीरावरून जात ओळखता येत नाही.
मानवाच्या खालच्या जातीचे प्राणी पाहिले, तर त्यांच्यात हा प्रकार फार! मानवात फक्त हे सर्व बघण्याकरिता प्रेरणा हवी, त्यासाठी सर्व मानवजात एकत्र येणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यातील भेद संपले पाहिजेत. गेल्या २०० वर्षांत माणूस शिक्षण व संस्काराने बदलला आहे. विविध जाती, संस्कृती एकत्र आल्यानंतर त्यांच्या विचारविनिमय आणि देवाण-घेवाणीतून मनुष्यजातीचे मनोमंडळ तयार करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आज जगातील- राष्ट्रातील ताणलेले संबंध निवळले पाहिजेत. धार्मिकदृष्ट्या ख्रिाश्चन, हिंदू, मुसलमान आदी धर्म आपले देव ते प्रेरित बाकी सर्व पाखंड, असे मानतात. नवमानवतावाद म्हणतो की, सर्व धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत. त्याचा मानदंड माणूस आहे. तो नीतिमान, विवेकवादी, निसर्ग नियमबद्ध आहे. त्यातूनच मानवी नैतिक दृष्टी, शुद्ध नैतिकता कळते.
सत्य शोधनाची प्रेरणा मानवात उपजतच आहे. जगण्याची जास्तीत जास्त क्षमता तो बाळगतो. सुख-उपयुक्त माणसाला लागणारे अन्नघटक आजतागायत बदलले नाहीत. एक महत्त्वाचा सिद्धांत समान साधक आहे. व्यक्ती ही प्रधान आहे, हे मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडले आहे. विकासाची प्रेरणा म्हणजे मानवाचा मेंदू आहे. मानव जीवन व समाज यातील संबंध अविभाज्य आहे. कार्य आणि कारणसंबंध अतूट आहे. माणसाकरिता समाज हे सूत्र मानवतावादी सूत्र आहे. त्यासाठी मानवी मनोमंडळ सुसंगत होण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. राष्ट्रवाद हा पुराणा, जीर्णशीर्ण झालेला आहे. आज राष्ट्रवाद ताजातवाना होत आहे, म्हणून मानवजात धोक्यात आली आहे.
मानवतावाद व त्याचे भवितव्य पूर्ण बुद्धिगम्य विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक पद्धती यांचा विचार करता गॅलिलिओनंतर विज्ञान वाढले आहे, पद्धती सापडली आहे, व्यापक सिद्धांत सापडला आहे. विज्ञानाचे तर्कशास्त्र प्रयोगाच्या आधाराने काही अपवाद सापडले. त्यातून नवीन सिद्धांत प्रस्थापित झाले. आम्ही सत्याकडे त्याच पद्धतीने जातो आहोत. कॉ. मानवेंद्रनाथ रॉयनी नवमानवतावादाच्या रूपाने याच तत्त्वांचे प्रकटीकरण केले आहे. तोच खरा सत्य मार्ग आहे.
प्रस्तुत भाषणाच्या पूर्वार्धात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माणसास असे वाटत होते की, महायुद्ध संपले की वर्गयुद्ध संपेल. इतकेच नव्हे, तर जगातले युद्धपर्व संपेल; पण वस्तुत: आजही युद्ध होते आहे. युद्धप्रेरणा मूलत: मानवी हृदयात असते. हिंदीतील प्रख्यात विचारक व निबंधकार हजारी प्रसाद द्विवेदी यांचा प्रख्यात निबंध आहे, ‘नाखून क्यों बढते है?’ माणसाची नखे का वाढतात? त्यात त्यांनी सांगितले आहे की, नाक, दात, हात, पाय ही माणसाची नैसर्गिक शस्त्रं होत. माणसात हिंसा हा स्थायिभाव आहे. संयमानेच त्यावर विजय शक्य आहे. माणसाची नखे ही त्याच्यातील हिंसा नि हिंस्रातेची प्रतीके होत. माणसाच्या मनातून हिंसा नि हिंस्रातेचे जोवर समूळ उच्चाटन होणार नाही, तोवर नखे वाढणारच. कितीदाही कापा. वाढणारच.
drsklawate@gmail.com