मानवी विकासात बुद्धी हे त्यास लाभलेले वरदान आहे. माणसात असलेल्या मेंदूमुळे त्याचे मन तयार झालेले आहे. मेंदू व मन एक आहे की भिन्न, याबाबत वैज्ञानिकांमध्ये मतभेद आहेत; पण एक खरे की, मेंदूमुळे ज्ञाननिर्मिती व तिचे स्मरण संकलन माणसास शक्य झाले आहे. मानव विकास काळात त्याच्या विविध इंद्रियांचा विकास होत गेला. पंचेंद्रियांच्या विकासामुळे मनुष्य अन्य जीवांपेक्षा प्रगत झाला. यात मेंदूचे योगदान असाधारण आहे. अॅरिस्टॉटलने लिहिलेल्या ‘प्राण्यांचे अवयव’ [ऑन पार्ट्स ऑफ अॅनिमल / पेरी झोइऑन मोरी ऑन (ग्रीक)] ग्रंथात अन्य प्राण्यांच्या शरीराचे वजन व मेंदूचे वजन आणि मानव असा तुलनात्मक विचार करता लक्षात येते की, शरीराच्या वजनापेक्षा मेंदूचे वजन कमी असल्याने मानव तल्लख बुद्धीचा आहे. मेंदू नि मनाच्या स्थितीचा घनिष्ठ संबंध असतो. मेंदूस इजा झाल्यास मन, स्मरण, कार्य इत्यादींवर होणाऱ्या परिणामांतून स्पष्ट होते.

मानवी संस्कृतीची जी रचना व जो विकास आहे, तो मानवनिर्मित आहे. विश्व आहे तसे मानवास फार काळ भोगता येणार नाही. कारण, निसर्गाची स्वत:ची काही एक मर्यादा आहे. निसर्गात काही तत्त्वे वाढत नाहीत. खनिजे, भूगर्भवायू, वनस्पती, जीव इत्यादींचा उपभोग संयम व मर्यादेने घेण्यातच शहाणपणा आहे. मंत्र, तंत्राच्या जोरावर निसर्गशक्ती वर्धन होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. माणसाला प्रारंभी ऋतुचक्राचे जे ज्ञान झाले, त्या आधाराने त्याने कृषीसंस्कृती विकसित केली. मानवी संस्कृती कृषीसंस्कृतीच्या स्थैर्य व समृद्धीची परिणती होय. आकाशस्थ ग्रहगोलांच्या माहितीशिवाय पृथ्वीवरील संस्कृती विकास अशक्य आहे. ऋतुचक्र ज्ञानात ज्योतिर्विद्या, खगोलशास्त्र, कृषीविज्ञान, हवामानशास्त्र सर्व येते. त्याशिवाय सृष्टी परिवर्तनाच्या कार्यकारणमीमांसेचा पट मांडता येत नाही. आकाशस्थ ग्रहगोल व पृथ्वीवरील शेती यांचा निकट व अतूट संबंध आहे. तो विज्ञान व संस्कृती समन्वयसूचक आहे.

अग्नीच्या शोधामुळे मानवी जीवन आणि संस्कृती बदलली, हे विज्ञान व संस्कृतीत दोन्हीकडे दिसते. भारतीय व ग्रीक पुराणकथात अग्नीबद्दल अथर्वन ऋषी व देवपुत्र प्रॉमिथिअसच्या कथा आहेत. माणूस शिजवलेले अन्न खाऊ लागला, तो अग्नीच्या शोधामुळेच. अग्नीमुळे वाफेवर चालणारी यंत्रे आली. पुढे वाफेचे रूपांतर विजेत होऊन यंत्रे स्वयंचलित झाल्याचे दिसते. अग्नीइतकेच चाकाच्या शोधालाही विज्ञान व संस्कृतीत महत्त्व आहे. ज्ञानोपासना विज्ञान व संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. सत्यशोधन ही ज्ञानोपासना खरी. विज्ञान विकासाचा तो पाया आहे. सत्य स्वयंसुंदर, स्वयंपवित्र असते. ते अंत:करणाला उल्हसित करीत असते. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तर फॅरेडेने विजेचा. आईन्स्टाईनने सापेक्षवाद सांगितला. अशा मूलभूत वैज्ञानिक शोधांनी मानवी जीवन बदलले व संस्कृती विकास झाला, त्यामुळे साहित्यही बदलून गेले.

संस्कृती नदीकाठी विकसित होते. कारण, पाणी व जीव यांचा जगण्याशी अभिन्न संबंध असतो. मानवी सुबत्तेचा संबंधही जलतत्त्वावर अवलंबून असतो. शेती नि पाणी यांचे अद्वैत वादातीत आहे. संपन्न संस्कृती बारमाही वाहणाऱ्या नदीकाठी असते, हे त्याचे प्रत्यंतर. आध्यात्मिक संस्कृती ही भौतिक संस्कृतीच्या पायावर उभी असते. ‘महाभारत’, ‘भगवत्गीता’ वाचताना हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. कला, काव्य, तत्त्वज्ञान, चिंतन यांतूनच आध्यात्मिक संस्कृती विकसित होत असते; पण त्यामागे भौतिक संस्कृतीचे अधिष्ठान लागते. ‘शरीरमाद्यां खलु धर्म साधनम्’ असे जे म्हटले गेले आहे, ते शरीरबळ भौतिक होय. त्यावर आत्मबल विकसित होते. त्यामुळे आध्यात्मिक संस्कृती व बौद्धिक संस्कृती परस्पर पूरक असतात, हे लक्षात येते. त्यामध्ये तादात्म्य असेल, तरच विकास शक्य असतो, हे स्पष्ट आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणाशास्त्री जोशी हे वेदांती म्हणून सर्वश्रुत होते खरे; पण ते विज्ञानी होते, हे फार कमी लोक जाणतात. या साप्ताहिकातील सर्व लेख त्याची प्रचीती देणारे आहेत. जीवशास्त्राचा त्यांचा अभ्यास व चिंतन जीव आणि आत्मा शब्द पर्यायवाची बनणारा सिद्ध होतो, तसाच आत्मा, परमात्मा ईश्वर व ईह ठरणारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com