तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आत्मकथा असे विधिवत लेखन केले नाही हे खरे आहे; पण त्यांनी भाषण, लेख, मुलाखती, पत्रे इत्यादींमधून स्वत:बद्दल विपुल लिहून ठेवले आहे. ते क्रमश: संपादून सादर केले तर विधिवत आत्मकथन साकारू शकेल, असा दस्तऐवज वरील स्वरूपात उपलब्ध आहे.

तर्कतीर्थांनी आपला जन्म, बालपण, जन्मगाव, आई-वडील, प्राथमिक शिक्षण, आरंभिक संस्कार व घडण, प्राज्ञपाठशाळा, वाई येथील शिक्षण पद्धती यांबद्दल वेळोवेळी लिहिले आहेच. पुढल्या आयुष्यक्रमाबद्दलही अनेक लेख वा भाषणांतून माहिती मिळते. वाचन व स्वाध्यायी शिक्षण, प्रेरणास्थाने, शिक्षक सहाध्यायी व सहयात्री, वेदवाचन व वेदाध्ययन, धर्म व समाजसुधारणा कार्य, स्वातंत्र्य चळवळीतील जनजागृती व जनसंघटन, तुरुंगातील दिवस, मी रॉयवादी का झालो?, अस्पृश्यता निर्मूलन व येरवडा तुरुंग, आंतरजातीय विवाहाचे पौरोहित्य, सोरठी सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा व मंदिरात सर्वजातीय प्रवेश, साने गुरुजी मंदिर प्रवेश आंदोलन समर्थन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व द्वैभाषिक समर्थन, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ कार्य, धर्मकोश निर्मिती, मी परिवर्तनवादी शास्त्री, माझी वैचारिक वाटचाल, शास्त्री-पंडितांच्या सहवासात, माझी प्रेरणास्थाने, माझी घडण व जीवन, माझ्या आयुष्याची संध्याकाळ, दीर्घायुष्याची सूत्रे, असा मी- असा मी, माझ्या शब्दात मी, माझे कार्य व योगदान असे विपुल आत्मपर लेखन आहे.

सार्वजनिक व्यक्ती विचार आणि व्यवहाराच्या अभ्यासाचे कोणत्याही मानवी समाजातील सभ्यता विकासात असाधारण महत्त्व असते. म्हणून सामान्यांच्या मनात सार्वजनिक चरित्र बनलेल्या व्यक्तीचे जीवन समजून घेण्याची टोकाची जिज्ञासा असते. त्यामागे अनुकरणाचा ध्यास असतो, तसेच ध्येयाची पाठराखण करण्याची धडपडही. अशा लेखनात प्राथम्याचा (सेल्फ नॅरेशन) जो घटक असतो, त्याचे म्हणून एक ऐतिहासिक मूल्य असते. त्या ऐतिहासिक मूल्यात सत्यांशाचे महत्त्व असते. बऱ्याचदा चरित्रे ही वस्तुनिष्ठतेऐवजी सांगोवांगीवर आधारित राहतात. त्यात चरित्र नायकाबद्दलची आस्था, त्या लेखनास व्यक्तिसापेक्ष बनविण्याचा वा बनण्याचा संभव अधिक असतो. या पार्श्वभूमीवर आत्मपर लेखन अधिक वास्तव असते. ते लिहीत असताना समकालात सत्यान्वेषण करणारे अनेक सहकारी, सहयात्री जिवंत असतात. वाचून ते सत्य-असत्याची शहानिशा करू शकतात. म्हणून अशा लेखनात तथ्यांश अधिक संभवत असल्याने व्यक्ती विचार व व्यवहार अभ्यासाचे ते वस्तुनिष्ठ साधन बनते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेले हे आत्मपर लेखन या सदरात आपण विचारात घेतले तर, आपणास तर्कतीर्थ घडणीचा वेध घेऊन त्यांच्यातील परिवर्तने, स्थित्यंतरे तपासता येतील. या लेखनाची वस्तुनिष्ठता, प्रामाणिकपणा नव्या पिढीस प्रेरक बनण्याची शक्यता लक्षात घेऊन केलेला हा खटाटोप वाचकांची तर्कतीर्थ जडणघडणविषयक जिज्ञासा पूर्ण करेल. गेले शतक भारत व महाराष्ट्र दोन्हींच्या स्वातंत्र्यप्राप्ती व स्थापनेचा काळ. पूर्वसुरींनी काय म्हणून या घडणीची शिलेदारी केली असेल, हे लक्षात आले तर वर्तमान सभ्य, सुस्थिर, संस्कारी, जबाबदार आणि उत्तरदायी बनविण्याचा काहीएक अंतर्मुख विचार सुरू होईल. म्हणून आपण पुढील काही भागात टप्प्याटप्प्याने तर्कतीर्थांचे आत्मपर लेखन समजून घेणार आहोत. भविष्यकाळात तर्कतीर्थांचे बृहद् सचित्र चरित्र साकारेल. ते आत्मपर लेखन व तर्कतीर्थांबद्दल स्नेही, सुहृद, आप्तस्वकीय, समकालीन सहयात्री यांच्या लेखनाचा संयुक्त परिणाम व प्रभाव घेऊन येणार असल्याने ते सर्वांकष नि सर्वांगीण ठरेल असे वाटते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवन, कार्य आणि विचार हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. राजकीय मुत्सद्दी, ज्ञानसाधक, प्रबोधक म्हणून तर्कतीर्थ महाराष्ट्र साकारणाऱ्या समाजपुरुषांचे अग्रणी ठरतात, म्हणूनही त्यांच्या चरित्राचा धांडोळा अनिवार्य होऊन जातो.