मानसशास्त्राने माणसाच्या पलायन, युद्ध, घृणा, वात्सल्य, याचना, संभोग, आत्मसमर्पण, आत्मप्रतिपादन, जिज्ञासा, भूक, निर्मिती, विनम्रता, हास्य (आनंद) या १४ सहजप्रवृत्ती सांगितल्या आहेत. त्यात मला आणखी एक सहजप्रवृत्तीची भर घालावीशी वाटते. ती म्हणजे, वाद करणे. मानवी मन द्वैत असल्याने त्यात द्वंद्व अनिवार्य असते. जिथे द्वंद्व तिथे वाद अटळ असतो. लहान नि मोठा मेंदू नसता, तर मानवाचा वर्तमान विकास झाला नसता. या मानवी वादवृत्तीचा अभ्यास वेदकाळात वादविद्योच्या रूपात झालेला आढळतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘प्राचीन भारतातील वादविद्या’ हे महत्त्वपूर्ण भाषण मुंबई आकाशवाणी केंद्राने ध्वनिमुद्रित करून प्रक्षेपित केले होते. ते साप्ताहिक ‘साधना’च्या शनिवार, १४ सप्टेंबर, १९५७ च्या अंकात प्रकाशित झाल्याने जिज्ञासू वाचकांस ते आज वाचण्यास उपलब्ध आहे.

यात तर्कतीर्थांनी समजाविले आहे की, साधक-बाधक चर्चा म्हणजे वाद होय. कोणत्याही विषयावर अनुकूल-प्रतिकूल चर्चा केल्याशिवाय सत्य हाती येत नसते. दुसरी बाजू वा प्रतिपक्ष समजल्याशिवाय विषयाचे पूर्ण आकलन अशक्य असते. वादाशिवाय भ्रमाचा निरास अशक्य असतो, म्हणून आपणास द्रष्टे, साधू, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, विचारवंत यांमध्ये मतभिन्नता दिसून येते. समाज, जीवन, इतिहास सर्वत्र वाद असतात. न्यायालये, पंडित सभा, संसद या वादपरिषदा होत. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’, ‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’सारख्या सुभाषितांमधून वादमाहात्म्य अधोरेखित केले गेले आहे. प्राचीन भारतीयांच्या वादविद्योतही वादाचा तत्त्वबोध (सत्य) हा मुख्य उद्देश सांगितला गेला आहे. प्राचीन भारतीय वादविद्या वाढीस लागण्यास प्राचीन भारतीयांच्या अनेक बुद्धिप्रधान विचारांची, दर्शनांची, भौतिकशास्त्रांची परिणती कारण झाली आहे. धर्मतत्त्वांची मीमांसा, विश्वतत्त्व चर्चा, सृष्टीरचना चिकित्सा, रोग-आरोग्य संशोधन, न्यायनिर्णय पद्धती, भाषा-व्याकरण वाद या सर्वांतून मानवी सांस्कृतिक व बौद्धिक विकास घडून आला आहे. बालजिज्ञासेत मानवी बुद्धी विकासाचे बीज आढळते. उपनिषद विस्तार एक अर्थाने बालप्रश्नांच्या प्रौढ उत्तरांनी घडून आलेला विकास होय.

‘चरकसंहिता’मध्ये ‘तद्विद्यासंभाष’ असा जो शब्द आढळतो, तो आजच्या सर्व परिषदा, सभा, चर्चासत्रे यांचे ते मूळ उगमस्थान होय. मनु, याज्ञवल्क्य, नारद इत्यादी ऋषींनी धर्मशास्त्रात वादविद्या अथवा वादशास्त्र वर्णिले आहे. प्राचीन भारतात तत्त्वदर्शने, धर्मशास्त्रे, व्याकरण, न्याय, वैद्याक इत्यादी विद्या परिणत पावल्या त्या वादविद्योमुळेच. वादविद्योवर प्रथम विधिवत प्रकाश टाकला तो अक्षपाद गौतम मुनी यांनी. त्यामुळे वादविद्या स्वतंत्र दर्शन व शास्त्र म्हणून विकसित झाली. गौतम, कणाद, कपिल, पतंजली, व्यास, जैमिनी ऋषींद्वारा विकसित षङ्दर्शने वादविद्या प्रसूत होत. दर्शनास प्राचीन वाङ्मयात न्यायदर्शन शब्द प्रयोगित होतो. तो सत्य सूचक आहे. यथार्थ निर्णय म्हणजेच सत्य, न्याय, ज्ञान होय. यास प्राचीन वाङ्मयात ‘प्रभा’ म्हटले आहे. वादविद्या तर्काधारित सत्य विशद करते. गौतमाचे न्यायदर्शन हे न्यायसूत्रच होय. भाष्य, वार्तिक, मीमांसा, टीका इत्यादी वादविद्योची फलश्रुती होय. ‘प्रमाण वार्तिक’ याचेच उदाहरण.

‘जिथे वादास विराम, तिथे अज्ञानास प्रारंभ’ हे सुभाषित ब्रह्मसत्य होय. भगवान बुद्धांनी आर्यसत्ये सांगितल्याचे सर्वश्रुत आहे. वेदास संपृक्त प्रमाण मानणे, विश्वाचा कोणी एक कर्ता मानणे, स्नानाने पुण्यप्राप्ती होते यावर विश्वास ठेवणे, जातीचा अहंकार बाळगणे, पापनाशाकरिता जिवाची बाजी लावणे वा ताप करून घेणे यांसारखी पंचकृत्ये ही मानवी जडबुद्धीची लक्षणे होत, असे ‘प्रमाण वार्तिक’मधील एका श्लोकात वर्णिली गेले आहे. ते वाचले की सत्यबोध होतो नि सत्यशोध लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानवी विचारस्वातंत्र्याचे मूळ प्राचीन वादविद्योत सामावलेले आहे. शंकराचार्यांचा धर्म दिग्विजय हा ‘वादिगजसिंहत्व’मध्ये प्रतिबिंबित आहे. ‘तत्त्वबुभुत्सो, वाद, कथा:’ यात पक्ष, प्रतिपक्ष, पूर्व मीमांसा- उत्तर मीमांसा इत्यादी सर्व वादविद्या पद्धती अंतर्भूत आहेत. वाद, जल्प (सत्य), वितंडा या वादपद्धती म्हणजे सत्यशोधनाचे त्रिविध मार्ग होत. तर्कतीर्थांचे हे भाषण म्हणजे ‘वाद : प्रयदतामहम’चे प्रमाण होय. तर्कतीर्थ लेखन म्हणजे शब्दाचा अर्थ, संदर्भ, आशय, इतिहास इत्यादींची विस्तृत प्रमाणमीमांसा व तत्त्वचिकित्सा असते हेच खरे!
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com