तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सत्तराव्या वाढदिवशी झालेल्या खासगी सत्कार समारंभात पु. ल. देशपांडे व इतर अनेक मित्रांनी मी आत्मचरित्र लिहावे, अशी सूचना केली होती. याचा उल्लेख करून पुढे एका कार्यक्रमातील भाषणात तर्कतीर्थ म्हणाले : आत्मचरित्रापेक्षा एका अर्थाने परचरित्र लिहिणे अधिक सोपे. त्याचे कारण असे, आपण दुसऱ्याला जितके चांगल्या रीतीने पाहू शकतो, तसे त्याचा चेहरा व चेहऱ्यावरील हावभाव निरखू शकतो, तसे आपण आपणाला पाहू किंवा निरखू शकत नाही. स्वत:चा चेहरा आरशात पाहता येतो, हे खरे आहे. दुसरे असे की, आपले सत्य स्वरूप आपणास कळले, तरच आपण व आपले वास्तव चरित्र म्हणजे शब्दचित्र रेखू शकतो. त्याला सर्वात मोठी अडचण अहंकाराची. अहंकारामुळे आपले दोष गुण वाटतात व दुसऱ्याचे गुणही दोष वाटतात. आत्मचरित्रात दुसऱ्याचा संबंध येतोच. माणूस एकटा असूच शकत नाही. गणिती व वैज्ञानिक आधुनिक तत्त्ववेत्ता व्हाइटहेड म्हणतो की, ‘थिंग्ज लिव्ह इन सोसायटीज्’ माणूसच नव्हे, तर अन्य प्राणी, वनस्पती, सजीव व अजीव सृष्टी ही समुदायामध्ये म्हणजे समाजातच राहाते वा जगते. आत्मचरित्रात आपण ज्या समुदायात व समाजात जगतो, त्याचाही जीवनक्रम व वर्तनक्रम चित्रित करावाच लागतो.

कायमचा दृष्टीआड झालेला भूतकाळ हा आत्मचरित्राचा विषय असतो. माझ्या जीवनपद्धतीत विश्लेषणाला, पृथक्करणाला किंवा समीक्षेला महत्त्वाचे स्थान आहे. अनुभवाचे विश्लेषण करताना तो जिवंत कसा होणार?

आत्मचरित्र लिहिण्याची मूळची श्रेष्ठ परंपरा पश्चिमी देशांची आहे. नवे ज्ञान-विज्ञान जसे आपल्याकडे पश्चिमेकडून आले, तसेच अनेक साहित्यप्रकारांचे नवे आकृतिबंधही पश्चिमेकडून आपल्याकडे आले आहेत. गुणदोषासह आत्ममूर्ती शब्दद्वारा जगापुढे उभी करण्याची कला म्हणजे आत्मचरित्र होय. गुणदोषासह आपण जसे आहोत तसेच सजीव शैलीने जगाला दाखविणे, हे आत्मचरित्रकार साहित्यकाराचे नैतिक कर्तव्य होय.

माझ्या पूर्वायुष्याचे सिंहावलोकन केल्यास मला जो विलक्षण प्रत्यय येतो, तो झपाट्याने बदलत असलेल्या जगाचा. त्याबरोबर मीही झपाट्याने बदलत गेलो. महात्मा गांधींमुळे येरवडा कारागृहात माझ्या अनेक थोरामोठ्यांच्या गाठीभेटी झाल्या. चर्चा झाल्या. आयुष्यातील मौलिक विचारपरिवर्तनाचा हा काळ होता. मी शास्त्राधारे सुधारणांचे समर्थन मोठमोठ्या पंडितांच्या सभेत धिटाईने करत असतानाच माझ्या लक्षात आले की, शास्त्राधार आपल्याला फार दूरच्या पल्ल्यापर्यंत जाण्याला उपयोगी पडणार नाही. मी याच सुमारास कार्ल मार्क्सच्या पुस्तकांचे व एम. एन. रॉयप्रणीत मार्क्सवादी विचारांचे अध्ययन करू लागलो. आतापर्यंत माझा ध्येयवाद भारतापुरता मर्यादित होता. या अध्ययनाने माझे ध्येयवादाचे क्षेत्र केवळ भारत न राहता संबंध मानवजातीचे जग बनले. माझ्यात सारखा बदल होत गेला; अजूनही होणार नाही, असा निर्वाळा मी देऊ शकत नाही. परंतु, तेव्हा लोक म्हणत हा खूप वाहवला आहे. मी प्रवाहपतितासारखा मात्र हतबल होऊन वाहत गेलो नाही. आतापर्यंत मी उच्च, नैतिक व बौद्धिक सत्याच्या ध्रुवताऱ्याकडे लक्ष देऊनच वाहत राहिलो आहे. वेगाने बदलणाऱ्या जगाच्या प्रवाहात पहिल्या उमेदीत पाऊल टाकले. केव्हा वाहत व केव्हा पोहत राहिलो. कोठेच पाय टेकले नाहीत. टेकायला जागाच सापडली नाही. जगाबरोबर माझ्यातही खूप बदल होत गेला. डॉ. के. ना. वाटवे ४० वर्षांपूर्वी मी रॉयवादी बनलो, तेव्हा मला म्हणाले की, ‘‘तुमच्यातले बदल मोजले तर ते तीन प्रकारचे आहेत व त्याकरिता निरनिराळी तीन आयुष्ये वस्तुत: लाभावयास पाहिजेत, ते तुम्ही एकाच आयुष्यात अनुभविले.’’
drsklawate@gmail.com