‘भारतीय संस्कृती संसद, कलकत्ता’ ही भारतीय भाषा, साहित्य, संस्कृती, संगीत इत्यादी क्षेत्रांत गेल्या शतकांतील आठव्या दशकापासून कार्यरत असलेली संस्था आहे. ३ मार्च १९८५ रोजी या संस्थेमार्फत संस्कृतीसंबंधी एका द्विखंडात्मक ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. या समारंभात त्यांनी ‘भारतीय संस्कृति और राष्ट्रीयता’ हे व्याख्यान हिंदी भाषेत दिले. त्या राष्ट्र, राष्ट्रीयता, ऐक्य इत्यादी मुद्द्यांवर खल केला होता.

या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य या घटक तत्त्वांवर आधारित आहे. याच मूल्यांवर या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीयत्वाचा विचार धर्माधिष्ठित नाही. तो संस्कृतिनिष्ठ राष्ट्रीय एकत्वाचा विचार आहे. तो हिंदू राष्ट्रवाद खचितच नाही. कारण, भारतीय राज्यघटनेत हिंदू राष्ट्रवादास अपेक्षित वा आधारित जन्मसिद्ध उच्च-नीच भेद, स्पृश्यास्पृश्य जातिभेद, चातुर्वर्ण्यतत्त्व यांना मान्यता नाही. समान नागरिकत्वाचा भारतीय राज्यघटनेतील विचार हिंदू राष्ट्रीयतेच्या विरुद्ध असलेला समन्वयी आणि समन्यायी विचार आहे. हिंदू धर्मशास्त्र अभिप्रेत स्त्री-पुरुष विषमता तो मान्य करीत नाही, तद्वतच स्त्रियांच्या सांपत्तिक उत्तराधिकारीत्त्व सीमित वा मर्यादित ठेवणे त्यास मान्य नाही. मनुस्मृती आधारित हिंदू राष्ट्रवाद आणि समानतेवर आधारित भारतीय राष्ट्रवाद परस्पर विरुद्ध होत. धर्मनिरपेक्ष इहवादी राष्ट्रवाद हिंदू समाजाच्या ऐहिक मानवी समान अधिकार तत्त्वावर उभा राहील, तरच तो समरस आणि एकात्मक बनू शकेल, अन्यथा नाही.

मॅकियाव्हेली या राज्यशास्त्रज्ञाने १७ व्या शतकात राष्ट्रवादावर विचार व्यक्त केले आहेत. इटलीचे साम्राज्य त्या वेळी शेकडो गणराज्यांत नि संस्थानांत विभाजित झालेले होते. मॅकियाव्हेली त्यांच्या एकत्वाचे स्वप्न पाहत होता. पुढे १९व्या शतकात काऊंट काव्हूर, गॅरिबाल्डी, जोसेफ मॅझिनी यांच्या नेतृत्वात इटलीत राष्ट्रवादाची एकात्म संकल्पना आविष्कृत झाली. त्याआधी १८व्या शतकात असा विचार युरोप, अमेरिका खंडांत झाला होता, तेव्हा विशिष्ट धर्म, विशिष्ट संस्कृती यांपेक्षा विशिष्ट समाज गट (वर्ग) आणि त्यांची राज्यव्यवस्थेप्रति आत्मीयता, निष्ठा ही राष्ट्रीय वृत्ती म्हणून स्वीकारली गेली. ‘नागरिकांच्या समान हितांचे रक्षण करणारा विशिष्ट प्रादेशिक (भौगोलिक) समाज म्हणजे राष्ट्र,’ ही संकल्पना विश्वमान्य झाली. राष्ट्रवादाचा व्यापक विचार ऐहिक आदर्शवादात अनुस्यूत आहे. त्यात राजकीय व सामाजिक आशय अभिप्रेत आहे. भारतीय राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकात्मतेवर उभा असणे राज्यघटनेस अपेक्षित आहे. या दृष्टीने भारत एक राष्ट्र म्हणून वैश्विक संस्कृती आणि वैश्विक मानवतेची समरसता व एकात्मता निर्माण करणारी प्रयोगशाळा आहे.

वस्तुवादाद्वारे (भौतिकतावाद) आणि वस्तुवादाच्या मार्गे आदर्शवादाकडे जाणे हा व्यवहार्य मार्ग होय. जर भारतीय सत्ता केंद्रीभूत होत गेली, तर घटकराज्यांच्या विकासाची प्रक्रिया मंद होत होत ती एक दिवस संपुष्टात येईल. राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणापेक्षा तिचे विकेंद्रीकरण केव्हाही हिताचेच. मनुष्य नि सामाजिक संस्थांचा विकास बाह्यबंधनांपेक्षा अंत:प्रेरणेने होणे चांगले. मानवाचा आत्मविकास ही स्वावलंबनाची पहिली पायरी होय. संसदीय लोकशाहीची पहिली जबाबदारी व कर्तव्य म्हणजे ग्रामविकास होय. ग्राम, नगर, राज्य यानंतर राष्ट्र वा केंद्र येते. राष्ट्राचा प्रमुख उद्देश लोकतंत्र व समाजवादाकडे जाणे असला पाहिजे.

मूलत: वैश्विक संस्कृती ही मानवी संस्कृतीचे विकसित रूप आहे. आज जग एकमेकांजवळ आले आहे. आज भगवान बुद्धप्रणीत पारमिता (सार्वभौम मैत्री) अनिवार्य होऊन गेली आहे. भारतीय राष्ट्रवाद आज आपल्या नव्या आकृतिबंधाद्वारे मानव संस्कृतीचे नवे आश्वासक रूप दाखवू शकेल इतकी क्षमता त्याच्या वैविध्यपूर्ण एकात्मतेत आहे. मौलिक लोकशाहीचा (रॅडिकल डेमॉक्रसी) भारतीय प्रतिदर्श (मॉडेल) संस्कृती आणि राष्ट्रीयतासंबंधीचा अनुकरणीय परिपाठ (एक्सरसाइज) म्हणून जगापुढे आहे. तो जितका प्राचीन आहे, तितकाच आधुनिकही! म्हणून त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर सातत्याने भर दिला पाहिजे. वास्तवात मात्र बरोबर याउलट सुरू असलेला आपला प्रवास दिशांतर अपेक्षितो आहे, त्याचा गांभीर्याने विचार व कृतीची आज नितांत गरज आहे.

drsklawate@gmail.com