महाराष्ट्र राज्य ज्योतिष परिषदेचे सातवे वार्षिक अधिवेशन २५ ते २७ नोव्हेंबर, १९६१ रोजी मुंबईत संपन्न झाले होते. ते ज्योतिर्विद्या मंडळ, मुंबईच्या पुढाकाराने संपन्न झाले होते. त्याचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची छोटी पुस्तिका त्यावेळी प्रकाशित करण्यात आली होती.
आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे. अलीकडच्या काळात या विषयावर अॅड. मिलिंद चिंधडे यांनी ‘ज्योतिष नभातील तारे’ लिहून पंचांगनिर्माते, ज्योतिषशास्त्री यांच्या कार्य-कर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे.
तर्कतीर्थांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे की, ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती माणसाच्या अत्यंत मूलभूत अशा कालज्ञानाच्या गरजेतून झाली आहे. सर्व मानवी कार्ये नियत समयी झाली, तरच फलद्रुप होतात. काल नि कर्म यांचा अन्योन्य संबंध असतो. आकाशस्थ ग्रहगोल कालचक्राची निर्मिती नित्यनियमाने करतात. त्यांचे गतिचक्र निश्चित असते. त्यावर ऋतुचक्र, निसर्गचक्र निर्भर असते. त्यांचा मानवी जीवन व जगण्यावर अनिवार्यपणे प्रभाव पडत असतो. काल नि गतिचक्र मानवाचे जीवन सुखकर बनवू शकते, जर ते त्यास ज्ञात असेल तर.
शास्त्रांच्या इतिहासातील आद्याशास्त्र म्हणून ज्योतिषशास्त्राचे महत्त्व आहे. ज्योतिषानंतर गणित जन्मले; पण तेच त्याचे आधारतत्त्व ठरले. प्राचीन भारतातील ज्योतिषाची व गणिताची वाढ एकमेकांना उपकारक आणि परस्परपूरक ठरली आहे. भारतीय ज्योतिर्विद्या क्षेत्रातील शिरोमणी भास्कराचार्य यांनी आपल्या लेखनात या दोन शास्त्रांना पूरक बनविले. खगोलशास्त्र ज्योतिर्गणितावर आधारलेले आहे. वर्तमानात काल नि गतिमापनाची जी अद्यायावत यंत्रे नि उपकरणे विकसित झाली आहेत, ती प्राचीन काळी नव्हती. त्याकाळी हे शास्त्र अनुमानावर आधारित होते. त्या अनुमानांचे काहीएक आराखडे, आडाखे प्राचीन शास्त्रज्ञांनी विकसित केले होते. नंतर ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यटनशास्त्र यात ऋतुचक्र, पर्जन्यचक्र, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांचे परिभ्रमण इत्यादी घटकांचा अभ्यास अचूकतेकडे अग्रेसर होत गेला. त्यामुळे अनुमान व प्रत्यक्षातील गती अरुंद होत गेली. तुरीय यंत्र (शटल), गोलयंत्र (खगोलीय उपकरण), चक्र यंत्र (श्री यंत्र), नाडीवलय, घटिका, शंकू, फलक, चाप, यष्टीयंत्र अशा एकूण नऊ यंत्रांचा उल्लेख भास्कराचार्य यांनी केला आहे (बारावे शतक). असेच उल्लेख ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, लल्ल यांच्या लेखनात आढळतात. त्यावरूनही प्राचीन काळी हे शास्त्र उपकरण प्रयोगित होते, हे लक्षात येते. त्या काळात राजांनी वेधशाळा उभारलेल्या होत्या. राजा जयसिंहाने दिल्ली, जयपूर, मथुरा, काशी, उज्जयनी येथे अशा वेधशाळा बांधल्या होत्या. सन १७९९च्या ‘एशियाटिका रिसर्चेस’मध्ये हंटर यांचा लेख आहे. त्यात त्यांनी या वेधशाळांचे वर्णन नमूद केले आहे.
प्रत्यक्ष, अनुमान व शास्त्रग्रंथांचे साहाय्य शास्त्रवाढीस उपकारक सिद्ध होत आलेले आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात आर्यभट्ट (इ.स. ५००), भास्कराचार्य (इ.स. ११५०), वराहमिहीर (इ.स. ४९०) इ.चे योगदान महत्त्वाचे ठरते. ज्योतिष फलित हा स्वतंत्र विचार आहे. फलिताचा नि जातकशास्त्राचा संबंध अध्ययनाचा विषय आहे. लोकभ्रम व अंधश्रद्धा यांवर भरोसा ठेवून शास्त्र टिकविण्याचा आटापिटा योग्य नाही, हे तर्कतीर्थांनी आपल्या भाषणात नि:शंकपणे स्पष्ट केले आहे. ज्योतिर्गणित विद्या पाश्चात्त्य आधुनिक गणिताबरोबर आणण्यावर ज्योतिषशास्त्राचे शास्त्रत्व अवलंबून आहे. त्यासाठी पंचांगविद्या, ज्योतिर्गणित, ज्योतिषशास्त्र सर्वांगीण दृष्टीने विकसित होणे, ही काळाची गरज आणि आवाहन आहे. करणग्रंथ आधुनिक होणे आवश्यक आहे. पंचांगविद्या अजून घटिका नि पळे यामध्ये अडकून आहे. आधुनिक कालमापन सेकंद, मिनिट, तासाधारित झाले आहे. त्यांचेही सूक्ष्म भाग (मिलीसेकंद) अवकाशशास्त्र मोजण्यास सिद्ध झाले आहे. हे सर्व लक्षात घेता ज्योतिषशास्त्राचा प्रवास आडाखे, अनुमान यांपासून जितका अचूकतेकडे सरकेल त्यावरच त्याचे शास्त्रपण टिकेल, हा तर्कतीर्थांचा या भाषणातील इशारा अधिक महत्त्वाचा ठरतो. दृक्प्रत्यय इतिहासजमा आहे. आल्मनाकशी जुळणारी पंचांगे सर्वमान्य झाली आहेत. हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने उपकारक आहे. त्यामुळे आधुनिकतेची कास धरण्यावरच या विद्योचे भविष्य अवलंबून आहे.
drsklawate@gmail.com