यंदाचे वर्ष सर्व तिबेटींसाठी महत्त्वाचे आहेच, पण चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन देखील तिबेटमध्ये या वर्षात होते आहे. तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते चौदावे दलाई लामा यांनी दलाई लामांची संस्था सुरूच राहील याची पुष्टी करून गेल्या आठवड्यात, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यासंबंधीच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. दलाई लामांच्या ९०व्या वाढदिवशीच, ६ जुलै रोजी त्यांच्या पुनरावताराबाबतची घोषणा अपेक्षित होती, ती मात्र झालेली नाही. यापूर्वी दलाई लामांनी लिहिलेल्या ‘व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस’ या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा पुनरावतार ‘लवकरच’ स्थानापन्न होणार असल्याचे संकेत दिले होते. चिनी राज्यकर्त्यांनी ‘दोन दलाई लामां’ची परिस्थिती टाळण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला आहे. चीनने २००७ मध्ये कायदा आणि नियमावली करून, तिबेटी बौद्ध तुल्कू (पुनरावतारी लामा) ओळखण्यात चीन सरकारचाच अधिकार राहील आणि सुवर्णकलशातून चिठ्ठ्या काढून नावे ठरवण्यासह विशिष्ट प्रक्रियेचा वापर करून उच्च दर्जाचे अवतार निवडले पाहिजेत अशी अट लागू केलेली आहे. या चीनप्रणीत नियमांमध्ये असेही म्हटले आहे की दलाई लामांचे पुनरावतार चीनमध्येच जन्माला आलेले असावेत आणि कोणतीही परदेशी संस्था किंवा व्यक्ती निवडीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तथापि चौदाव्या दलाई लामांच्या ताज्या विधानामुळे, आता एक चौदाव्या दलाई लामांनी ठरवलेले आणि दुसरे बीजिंगने समर्थन दिलेले- असे दोन दलाई लामा निवडले जाणार, हे अटळ दिसते आहे.
चीनने तिबेटच्या केलेल्या तथाकथित ‘शांततापूर्ण मुक्ती’चा ७५ वा वर्धापन दिन, तसेच चीनच्या ताब्यातील या तिबेट भूभागात ‘तिबेट स्वायत्त प्रदेश’ (टीएआर) स्थापनेचा ६०वा वर्धापन दिन करण्याच्या योजनांना चिनी अधिकारी अंतिम रूप देत आहेत. यापैकी तिबेट ‘मुक्ती’चा अमृतमहोत्सव सप्टेंबरात साजरा होईल तेव्हा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तिबेटला भेट देतील, असे संकेत चिनी प्रसारमाध्यमांतून मिळालेले आहेत. जिनपिंग यांच्या भेटीमुळे उत्सवांचे महत्त्व वाढेल, तसेच खुद्द राष्ट्राध्यक्ष येणार म्हणून ‘टीएआर’ आणि लगतच्या भागांत तिबेटी लोकांवर आधीच लादलेल्या प्रतिबंधात्मक सुरक्षा नियंत्रणांमध्ये लक्षणीय वाढ होईल. चीनने १९९५ पासूनच ‘पंचेन लामा’ म्हणून नियुक्त केलेले ग्याल्त्सेन नोर्बू हे तिबेटच्या दौऱ्यात क्षी जिनपिंग यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. चौदाव्या दलाई लामांच्या पुनरावराताला मान्यता देण्यात आणि नंतर त्या (चिनी) पुनरावताराचे प्रमुख शिक्षक बनण्यात या ‘पंचेन लामां’ची भूमिका तयार करण्याच्या दृष्टीने त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी हे केले जाईल. हे चीन-नियुक्त ‘पंचेन लामा’ ग्याल्त्सेन नोर्बू चिनी राज्यकर्त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत, असे ठसवण्याचाही चिनी माध्यमांचा प्रयत्न दिसतो. या ग्याल्त्सेन नोर्बू ऊर्फ पंचेन लामांनी ५ जून रोजी बीजिंगला जाऊन अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि तिबेटशी संबंधित तीन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, ते २७ जून रोजी ल्हासा येथे पोहोचले. बीजिंगमधील बैठकीत क्षी जिनपिंग यांनी त्यांना ‘तिबेटी बौद्ध धर्मग्रंथांमध्ये प्रवीण होण्यासाठी कठोर अभ्यास करा’ असा सल्ला दिल्याच्या बातम्या चिनी अधिकृत प्रसारमाध्यमांतून आल्या. या बातम्यांमध्ये असेही म्हटले होते की, तिबेटी बौद्ध भिक्षूंमध्ये ‘चिनी समुदायाची भावना’ निर्माण व्हावी, राष्ट्रवाद आणि देशभक्ती वाढावी, यासाठी पंचेन लामांनी या भिक्षूंना उद्याुक्त केले पाहिजे आणि तिबेटी बौद्ध धर्माची सांगड ‘चिनी समाजवादा’शी घालण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, अशाही अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ग्याल्त्सेन नोर्बू या दृष्टीने प्रयत्न करतीलच, अशी चिनी राज्यकर्त्यांना खात्री वाटते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना तिबेटमध्ये विशेष रस असल्याचे दिसून येते. त्यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून तिबेटकडे लक्ष पुरवणे सुरू केले होते हे सर्वांना दिसलेले आहेच, पण आधीपासूनच त्यांना तिबेटमध्ये रस असावा. याचे एक कारण असे की क्षी जिनपिंग यांच्या आई बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत आणि खुद्द क्षी जिनपिंग यांनी झेजियांग प्रांताचे पक्ष सचिव म्हणून नेमणूक झाल्यावर, २००१ मध्ये चीनच्या पहिल्या जागतिक बौद्ध मंचाचे यशस्वीरीत्या आयोजन केले होते. जिनपिंग यांनी उच्च पदांवर असताना तीनदा तिबेटला (‘टीएआर’ला) भेट दिलेली आहे आणि प्रत्येक वेळी संवेदनशील न्यिंगची प्रांताचा दौरा केला आहे. बीजिंगच्या अधिकृत नकाशांनुसार, न्यिंगची प्रांताच्या प्रशासकीय सीमांचा नकाशा चीनच्या दाव्यांनुसार असतो- म्हणजे त्यात भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याच्या जवळपास सर्वच भागाचा समावेश असतो. याखेरीज, तिबेटच्या मेडोग भागामध्ये चीन ब्रह्मपुत्र नदीवर (तिबेटी भाषेत ‘यारलुंग त्सांगपो’ नदी) जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. जिथे ही नदी ग्रेट भारताच्या अरुणाचल प्रदेशातून तीव्र वळण घेऊन बांगलादेशात जाते, तिथेच हे चिनी धरण बांधले जाते आहे.
या कथित ‘न्यिंगची’ प्रांताबद्दलची चिनी सत्ताधाऱ्यांची भूमिका चीनचे नेते आणि अधिकृत माध्यमे ऊठसूट बिंबवत असतात. ते सातत्याने सांगत असतात की, चीनच्या नैऋत्य सीमांचे रक्षण करणारा न्यिंगची हा एक महत्त्वाचा प्रांत आहे. या विधानांना बळकटी देण्यासाठी अधिकृत संघटनांचे किमान अर्धा डझन लेख चीनच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अर्थात हे लेख केवळ तिबेटमध्ये तैनात असलेल्या सैन्यावर लक्ष केंद्रित करतात. ते अधोरेखित करतात की ‘तिबेटी दल’ हे पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सर्वोत्तम आणि कणखर सैन्यांपैकी एक आहे आणि त्यांनी गलवानसह भारतीय सैन्याशी झालेल्या अलीकडील संघर्षात स्वत:ला सिद्ध केले आहे. एका लेखात असे म्हटले आहे की, तिबेटी पठारावर तैनात असलेल्या सैन्यांना इतरांपेक्षा जास्त पगार आणि भत्ते मिळतात. लडाख आणि सीमेवर चिनी सैन्याच्या सततच्या तैनाती आणि नवीन लष्करी रचनेच्या माहितीशी ताडून पाहिले तर, या लेखांचा आणि क्षी जिनपिंग यांच्या भेटींचा अर्थ स्पष्ट आहे – भारताच्या भूभागावरल्या चिनी दाव्यांचा पुनरुच्चार करण्याचा उद्याोगच यातून चाललेला आहे.
एकंदरीत, चौदाव्या दलाई लामांच्या कारकीर्दीनंतरचा काळ तणावपूर्ण असेल. दलाई लामांच्या पुनरावताराचे वय किती असेल, यावरही बरेच काही अवलंबून राहील. निर्वासित तिबेटी बौद्धांमध्ये मतभेद आणि फूट निर्माण करण्यासाठी चिनी यंत्रणांचा आटापिटा वेगाने सुरू राहील. धरमशाला येथील भिक्षूंकडे दलाई लामांनी सोपवलेले पुनरावतार-शोधाचे काम सुरू असतानाच, चिनी अधिकारी स्वतंत्रपणे त्यांच्या पसंतीच्या दलाई लामाची ओळख पटवून त्यांना स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत राहाणार हे निश्चित. यामुळेच दलाई लामांच्या पसंतीचा पुनरावतार शोधण्याच्या (धरमशाला येथून सुरू असलेल्या) प्रयत्नांत चीनकडून या ना त्या प्रकारे अडथळा आणला जाणार, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाने (काँग्रेसने) ‘तिबेट रिझोल्यूशन अॅक्ट’द्वारे जुलै २०२४ मध्येच स्पष्ट केलेले आहे की, केवळ चौदावे दलाई लामा हेच त्यांचा पुनरावतार निवडू शकतात आणि तो पुनरावतार कुठला असेल, याचा निर्णयही सर्वस्वी दलाई लामांचाच असू शकतो. तरीसुद्धा चीनमध्ये सुमारे ७० लाख तिबेटी लोक राहातात हे विसरून चालणार नाही. चीनच्या ताब्यातील या तिबेटींच्या भावनांचे कारण पुढे करून, बीजिंग त्याच्या शेजारी अथवा अन्य प्रदेशांतील इतर बौद्ध राष्ट्रांवर चिनी दलाई लामांच्याच निवडीला मान्यता देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. तिबेटी लोक हे चौदाव्या दलाई लामा यांना मानणारे आहेत, ते त्यांनी निवडलेल्या पुनरावताराचाच स्वीकार करतील. तरीही ‘हेच आमचे आणि हेच खरे दलाई लामा’ म्हणून दुसऱ्याच दलाई लामांना पुढे करण्याचा प्रयत्न चीन सोडणार नाही.