‘प्रिय माध्यमकर्मीनो, अगदी अल्प सूचनेवर आपण सर्व मोठय़ा संख्येत येथे जमलात त्याबद्दल सर्वाचे आभार! चार राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने विरोधक निराश झाले असून यातून त्यांनी सक्षम विश्वगुरूंवर नाहक टीका सुरू केली आहे. या देशातील विरोधकांच्या राजवटीने त्रस्त झालेल्या मागास, पीडितांना विश्वगुरू सर्वात मोठा आधार वाटत आले आहेत. त्यामुळे जाहीर सभांमध्ये नेते त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडतात. कधी फलक घेऊन तर कधी खांबावर चढून विश्वगुरूंचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. या सर्व प्रकाराला ‘घडवून आणलेली नौटंकी’ संबोधणाऱ्या विरोधकांचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. आपल्या भारतीय संस्कृतीत खांद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी जन्मापासून मरणापर्यंत. संकटाच्या काळात आधार म्हणून आपल्याला कुणाचा तरी खांदा लागतोच. अगदी पुराणकाळाचा विचार केला तर सुदाम्यानेसुद्धा श्रीकृष्णाच्या खांद्याचा आधार घेतलाच होता. त्याच संस्कृतीचे पाईक असलेल्या विश्वगुरूंचा खांदा कुणाला आधार म्हणून वापरावासा वाटत असेल तर विरोधकांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? या देशातील सर्व समस्या केवळ विश्वगुरूच सोडवू शकतात अशी सामान्य जनतेची ठाम धारणा झाली आहे. त्यामुळेच तेलंगणातील एका सभेत मागास जमातीचे एक लोकप्रिय नेते त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडले. आठ वर्षांपासून उरात लपलेले दु:ख यातून बाहेर पडले. २०१४ मध्ये विश्वगुरूंनी या जमातीला आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण तेथील सरकारच्या निष्क्रियतेमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. हे वास्तव दडवून केवळ मतांसाठी केलेला ‘ड्रामा’ असे म्हणणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५६ इंचांची छाती व मजबूत खांदा हे समर्थ पुरुषाचे लक्षण असून या दोहोंचाही संगम विश्वगुरूंमध्ये झाला आहे. म्हणूनच चंद्रावरची पहिली मोहीम अयशस्वी झाल्यावर तिथल्या प्रमुखांनाही हाच खांदा जवळ करावासा वाटला. त्या दु:ख हलके करण्यातून आलेल्या विश्वासामुळेच दुसरी मोहीम यशस्वी झाली. या देशातल्या शास्त्रज्ञांपासून सामान्य लोकांपर्यंत साऱ्यांना विश्वगुरूंचा खांदा ‘आपला’ वाटणे यातच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक दडलेले आहे. याच तेलंगणामधील एका सभेत एक तरुणी कर्णे लावलेल्या खांबावर चढली. ती व्यथित आहे हे लक्षात येताच विश्वगुरूंनी ‘बेटा, तुम नीचे उतरो, मै तुम्हारी सब बाते सुनूंगा’ असे भावनिक आवाहन करताच ती खाली उतरली. यावरून सामान्य जनतेला विश्वगुरूंविषयी किती विश्वास वाटतो हेच दिसले. छत्तीसगडमधील सभेत एका तरुणीने तिच्या समस्येकडे लक्ष वेधावे म्हणून एक फलक हाती धरला. विश्वगुरूंच्या तीक्ष्ण नजरेने तो हेरला व भाषण करता करता त्यावरची वाक्ये वाचून तिथल्या तिथे तिला दिलासा दिला. त्यावरही विरोधकांनी ‘इतक्या दूर अंतरावरून वाक्ये कशी वाचली, हा बनाव आहे’ अशी टीका केली जी पूर्णत: अनाठायी व गुरूंची प्रतिमा मलिन करणारी होती. विश्वगुरूंचे केवळ खांदेच मजबूत नाहीत तर सामान्यांशी थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. म्हणूनच जनता त्यांचे लक्ष वेधण्यासाठी धडपडत असते. यातून उत्स्फूर्तपणे घडलेल्या या घटनांना विरोधकांनी ‘मुद्दाम निर्माण केलेली नाटय़मयता’ असे संबोधणे गुरूंवर अन्याय करणारे आहे. या चारही राज्यांत विश्वगुरूंचाच करिश्मा चालेल हे मी ठामपणे सांगतो व निवेदन संपवतो.’ यानंतर पत्रकारांनी एकच गलका करत प्रश्न विचारणे सुरू केले. त्यावर नेत्यांनी ‘नो क्वेश्चन, आन्सर’ असे सांगत व्यासपीठ सोडले. मग पत्रकारांचा घोळका चहा-बिस्कीट ठेवलेल्या स्टॉलकडे वळला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma opposition disappointed as defeat in state elections became evident amy
First published on: 14-11-2023 at 00:12 IST