घराच्या पायरीवर गेल्या चार तासांपासून ताटकळत बसलेल्या बूमधारी पत्रकाराला त्याच्या वाहिनीचा टीआरपी वाढेल अशा चार-पाच चटपटीत वाक्यांची प्रतिक्रिया देऊन ते मध्यरात्री घरात शिरले. त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका सहायकाने हा निरोप अजितदादांना देताच त्यांनी लगेच फोनाफोनी सुरू केली. त्यानंतर एक तासाच्या आत उद्धवजी, नानाभाऊ, जयंतराव व स्वत: दादा सिल्व्हर ओकला पोहोचले. सर्वाची थोरल्या साहेबांसह अनौपचारिक बैठक सुरू झाली. ‘याची माहिती कोणत्याही स्थितीत राऊतांना कळायला नको’ असे दादांनी करडय़ा आवाजात साहेब व उद्धवजींकडे बघत स्पष्ट केले तसे साहेब मंद हसले. उद्धवजींचा चेहरा मात्र निर्विकार होता. मग नानांनी सुरुवात केली. ‘मविआ मजबूत व्हायला हवीच. त्यात विरोधकांनी खोडा घालणे समजू शकतो, पण या राऊतांचे काय करायचे ते आधी ठरवा. इथे नांगरणीचा पत्ता नसताना हे थेट औतच जुंपायला निघालेत. जागावाटपाचे काहीच ठरले नसताना फाम्र्युला ठरला, आम्ही १९ जागा लढवणार हे ते कशाच्या आधारावर सांगताहेत?  हे सकाळी उठून वाटेल ते बोलतात. मग दिवसभर आम्हाला स्पष्टीकरण देत फिरावे लागते. मध्यंतरी आमचे नागपूरचे देवेंद्रभाऊ बरोबर बोलले होते. सर्व वाहिन्यांनी सकाळी राऊतांचे बाइट घेणे थांबवले तर राज्यात वादच निर्माण होणार नाहीत. हे प्रवक्ते कमी आणि पत्रकारच अधिक. उद्धवजी, तुम्ही तुमच्या पक्षात आमच्यासारखे ‘एक पद एक व्यक्ती’ धोरण राबवा व या राऊतांपासून त्याची अंमलबजावणी करा, अन्यथा आघाडीचे काही खरे नाही.’ मग दादा बोलू लागले. ‘नाना म्हणताहेत ते अगदी योग्य. मला तर अलीकडे असे वाटायला लागलेय की यांना अति बोलण्याचे व्यसन जडलेय. व्यसन कुठलेही असो, मला त्याचा तिटकारा आहे. त्यामुळे राऊतांना काही काळ तरी एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा. आजच्या घडीला भाकरी फिरवण्यापेक्षा यांची चाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आपल्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी या विरोधकांच्या प्रचाराला बळ मिळते हेही त्यांना कळत नसेल तर ते कसले प्रवक्ते? मध्यंतरी माझ्याच बाबतीत त्यांनी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी डोळे वटारताच खूशमस्करी  करायला लागले. आता तर मलाच संशय येऊ लागला की ते विरोधकांशी संधान साधून असावेत. (यावर साहेब व उद्धवजी चमकून दादांकडे बघतात) जॉर्ज वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीची कथा पाठ केल्यागत यांचे वागणे आहे. मी स्पष्टच सांगतो, तुम्ही दोघांनी दोर सैल सोडल्यामुळेच ही स्थिती उद्भवली. आमच्या साऱ्या प्रवक्त्यांना विरोधकांवर तुटून पडण्याऐवजी राऊतांच्याच वक्तव्यांचे खंडन करत बसावे लागते. हे कुठे तरी थांबायला हवे अन्यथा आघाडीचे गणित बिघडेल. उद्धवजी, राऊतांचे प्रवक्तेपद ही तुमच्या पक्षाची मजबुरी असेल, पण आघाडीची नाही तेव्हा तीन पक्षांच्या वतीने बोलण्याचा अधिकार कुणा दुसऱ्याकडे सोपवणेच सोयीस्कर.’ दादा थांबताच मग सारे जयंतरावांकडे बघतात. ते स्वत: मात्र ‘साहेब जसे म्हणतील तसे’ एवढे बोलून थांबतात. मग साहेब व उद्धवजी आतल्या खोलीत जाऊन पाच मिनिटांनी बाहेर येतात. ‘काहीही गोंधळ उडायला नको म्हणून मी दोन-तीन दिवसांत यावर निर्णय देईन’ असे साहेबांनी सांगताच बैठक संपते. दुसऱ्या दिवशी सकाळी राऊत पेपर चाळत असताना फोन वाजतो. पलीकडे साहेब असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma the journalist reaction ajit dada jayantrao mahavikas aghadi ysh
First published on: 23-05-2023 at 00:02 IST