भारतात वन्यजीव चळवळीचा पाया रोवण्यात अ‍ॅन राइट यांनी मोलाची भूमिका बजावली. डब्ल्यूडब्ल्यूएफ (वल्र्ड वाइल्डलाइफ फंड) या संस्थेच्या स्थापनेदरम्यान भारतातील पहिल्या विश्वस्तांपैकी त्या एक. व्याघ्रप्रकल्पच नाही तर आसाममधील गेंडे आणि हत्ती तसेच त्यांच्या अधिवासासाठी अशा अनेक उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले. वन्यजीवांची व्यथा जाणून ती दूर करू पाहणारा हा आवाज आता कायमचा शांत झाला आहे.

अ‍ॅन राइट हे अतिशय धाडसी, दृढनिश्चयी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व.  एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ओळख असली तरीही ही ओळख निर्माण करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्षात क्षेत्रावर केलेले काम, कार्यकर्ता म्हणून केलेले काम महत्त्वाचे. वडील मूळचे ब्रिटिश. ते परतंत्र भारतात अधिकारी म्ह00णून आले, तेव्हापासून अ‍ॅन यांचे बालपण मध्य प्रदेशच्या जंगलात गेले. इथेच त्यांची वन्यजीवांबद्दलची आवड फुलली. लहानपणी त्या विंचू शोधायच्या, गोल्फ कोर्सवर वाघांच्या पाऊलखुणांचे अनुसरण करायच्या. एवढेच नाही तर अमरावतीच्या खडबडीत गाविलगड किल्ल्याच्या तटावरून बिबटय़ाला झेप घेताना पाहायच्या. स्वातंत्र्यानंतर हे कुटुंब भारतीय म्हणून इथेच राहिले! त्या काळात शिकारीवर बंदी नव्हतीच, उलट शिकार करणे हे सर्रास होते. याला अ‍ॅन यांचा मनोमन विरोध होता; पण १९६७ आणि ६८ मध्ये मोठा दुष्काळ पडला आणि त्याचा वन्यप्राण्यांवरही परिणाम झाला तेव्हापासून मात्र वन्यजीव संरक्षण हे अ‍ॅन यांच्या आयुष्याचा एक भाग बनले. १९६९ मध्ये भारतात जागतिक वन्यजीव निधी म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूएफची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. १९७१ साली त्यांना कोलकात्याच्या ‘द स्टेट्समन’मध्ये त्या शहरातील न्यू मार्केटमध्ये वाघाच्या कातडीचा व्यापार कसा चालतो, यावर लेख लिहिला. यातून वास्तवाचे अनेक धक्कादायक तपशील उघड झाले. 00

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यू यॉर्क टाइम्सने हा लेख पुनप्र्रकाशित केला. भारताने त्वरित पावले उचलली नाहीत तर वाघ आणि बिबटय़ाच्या भारतातील अस्तित्वावर कसे प्रश्नचिन्ह उभे राहील, हे सांगणाऱ्या या लेखाने अक्षरश: जग जागे झाले. अ‍ॅन या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सर्वात विश्वासू सल्लागारांपैकी एक ठरल्या. अ‍ॅन यांची भारताच्या टायगर टास्क फोर्सच्या सदस्य म्हणून १९७२ साली नियुक्ती करण्यात आली. भारतातील वाघांच्या अधिवासाचे सर्वेक्षण केल्यानंतर याच टास्क फोर्सने जो उल्लेखनीय दस्तऐवज तयार केला, त्याचे नाव ‘प्रोजेक्ट टायगर’! इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी वन्यजीव संरक्षण प्रकल्पाची ही सुरुवात होती. अ‍ॅन राइट यांनी वैयक्तिकरीत्यादेखील झारखंडमधील दालमिया वन्यजीव अभयारण्य, मेघालयमधील बालफाक्रम राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगालमधील निओरा व्हॅली नॅशनल पार्कसाठी काम केले. तब्बल १९ वर्षे त्या केंद्रीय वन्यजीव मंडळावर होत्या. त्याखेरीज, मेघालय ते अंदमानपर्यंतच्या सात राज्यांच्या वन्यजीव मंडळांवरही त्यांनी काम केले.  वन्यजीव- सेवेबद्दल त्यांना १९७९ मध्ये ‘ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क’ (नेदरलँड्स) आणि १९८३ मध्ये ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे दिवंगत पती बॉब राइट हेही स्वत:ला भारतीय मानणाऱ्या ब्रिटिश अधिकारी कुटुंबातले, तेही या कार्यात साथ देत; तर कन्या बेलिंडा राइट वन्यजीव छायाचित्रकार आणि संरक्षक आहेत. या कुटुंबाने १९८२ पासून मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानालगत रिसॉर्ट सुरू केला, तिथेच वयाच्या ९४ व्या वर्षी अ‍ॅन निवर्तल्या.