यंदाच्या ऑस्कर पुरस्कारामुळे मुदुमलाईच्या जंगलातल्या रघु, अमू या आशियाई ‘हत्तींची कुजबुज’ जगाच्या कानावर गेली खरी; पण त्याला कारणीभूत ठरल्या, त्या या लघुपटाच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस. या जंगलात राहणाऱ्या बोमन आणि बेले या जोडप्याचे आणि रघु या हत्तीच्या अनाथ पिल्लाचे नाते हा या लघुपटाचा विषय. आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नात तो जागतिक पातळीवर नेऊन पोहोचवणाऱ्या कार्तिकी यांचेही रघुशी आणि या जोडप्याशी तेवढेच जिव्हाळय़ाचे नाते आहे. या नात्याला सुरुवात झाली ती सहा वर्षांपूर्वी बोमन रघुला आंघोळ घालत असताना त्यांनी पाहिले तेव्हा. मदुमलाई नॅशनल पार्कसाठी काम करणारे हे जोडपे कार्तिकी यांना सांगत होते की, अन्नाच्या शोधात रघुची आई एका शेतात शिरली. हत्ती शेतात शिरू नयेत म्हणून त्या शेताच्या बांधावरून विजेच्या तारा सोडल्या होत्या. विजेच्या धक्क्याने रघुची आई मरण पावली. तीनचार महिन्यांच्या रघुला आमच्याकडे सोपवले गेले. आम्ही त्याचे काळजीवाहू पालक असलो तरी, आम्हाला खरे तर तो आमचा मुलगा आहे, असेच वाटते. रघुही हक्काने बोमनकडून लाड करवून घेतो, सोंडेत त्यांना गुंडाळण्याचा खेळ खेळतो हे कार्तिकी यांनी बघितले आणि त्या या नात्याच्या प्रेमातच पडल्या. या तिघांच्या कुटुंबात अमू या आणखी एका पिल्लाची भर पडली आणि हे गोड कुटुंब आणखी विस्तारले.
त्यामुळे तर कार्तिकी यांची पावले पुन्हा पुन्हा मुदुमलाईच्या जंगलात वळायला लागली. गेली पाच वर्षे त्यांनी या चौघांच्या नात्याचे वेगवेगळे पैलू कॅमेऱ्यातून टिपले. त्या तब्बल ५०० तासांच्या फुटेजमधून ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा ४० मिनिटांचा लघुपट तयार झाला आहे. हत्ती या प्राण्याची बुद्धिमत्ता आणि स्थानिक लोकांचे पर्यावरणाशी असलेले नाते या दोन्ही गोष्टींची सांगड पर्यावरण जतनाच्या कामासाठी किती परस्परपूरक आहे, हे त्यांना या लघुपटामधून दाखवायचे होते. कार्तिकी यांची पर्यावरणाची समज अशी बोमन आणि रघु याचे नाते बघून अचानक निर्माण झालेली नाही. पर्यावरणप्रेमाचे बाळकडू त्यांना पालकांकडून लहानपणापासून मिळाले. फोटोग्राफी हा त्यांचा व्यवसाय आणि निसर्ग, पर्यावरणप्रेम आणि संस्कृती हा अभ्यासाचा विषय. त्यामुळे भारतातल्या जंगलांमधली भटकंती त्यांनी सातत्याने केली आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी त्या जोडलेल्या आहेत. डिस्कव्हरी आणि अॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांसाठीही त्यांनी काम केले आहे.
‘द एलिफंट व्हिस्पर्स’चा विषय शोधणे, निवडणे याचे श्रेय कार्तिकी यांचे आहे. पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना जोड मिळाली ‘मसान’, ‘द लंचबॉक्स’ आदी चित्रपटांसह २०१९ मधील ऑस्कर-विजेत्या ‘पीरियड एण्ड ऑफ सेन्टेन्स’ या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांची. मोंगा यांचीच निर्मिती असलेल्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे संकलन केले आहे संचारी दास मौलिक यांनी. इतरही खूप हात या कामात लागले आहेत, पण ऑस्कर आणण्यात या स्त्रीशक्तीचे योगदान मोलाचे आहे.