पाकिस्तानात कलागुण असणाऱ्या व्यक्ती भरपूर असूनही तेथे त्यांचे पुरेपूर चीज होतेच असे नाही, याचे उत्तम उदाहरण ठरणारे अभिनेते झिया मोहियुद्दीन नुकतेच वयाच्या ९१ व्या वर्षी निवर्तले. खर्जातला तरीही धारदार आवाज, उर्दूप्रमाणेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, जागतिक रंगभूमीची पुरेपूर जाण इतके भांडवल असूनसुद्धा झिया मोहियुद्दीन यांची कारकीर्द बहरली ती पाकिस्तानापेक्षा ब्रिटनमध्येच. वास्तविक, भारतीय नाटय़गुरू इब्राहीम अल्काझी यांचे झिया मोहियुद्दीन हे तसे समकालीन. अल्काझींचा जन्म १९२५ चा, तर मोहियुद्दीन यांचा १९३१ सालचा. हे दोघेही (निरनिराळय़ा वेळी) लंडनच्या ‘रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’मध्ये नाटय़कलेच्या विविध पैलूंचे शिक्षण पूर्ण केलेले. पण अल्काझींना १९४०- ५० च्या दशकांतील मुंबईत जे समृद्ध सांस्कृतिक वातावरण मिळाले आणि पुढे दिल्लीत ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’चे नेतृत्व करण्याची संधी मानाने मिळाली, तसे काहीच झिया मोहियुद्दीन यांच्याबद्दल होऊ शकले नाही.
नाही म्हणायला त्यांनी पाकिस्तानात- कराचीत ‘नॅशनल अकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्ट’ स्थापन केली, पण ती २००३ साली, म्हणजे दिल्लीच्या ‘रा. ना. वि.’ने चाळिशी ओलांडल्यानंतर!अर्थात, झिया मोहियुद्दीन यांना अभिनेता म्हणून स्वत:ची छाप पाडता आली. यासाठी सुरुवातीला त्यांच्या लंडन मुक्कामात त्यांनी ‘ज्यूलिअस सीझर’सारख्या नाटकांत केलेल्या भूमिका कामी आल्या. १९६०च्या दशकात ते लंडनच्याच रंगभूमीवर रमले असताना एका मुलाखतकाराने त्यांना विचारले, ‘पाकिस्तानची आठवण येते का?’ त्यावर ‘ हो येते..’ असे उत्तर मोहियुद्दीन यांच्याकडून येताच तत्कालीन पाकिस्तानी शासक याह्या खान यांनी सन्मानाने त्यांना मायदेशी बोलावले. नुकत्याच सुरू झालेल्या ‘पाकिस्तान टेलिव्हिजन’ (पीटीव्ही) या एकमेव वाहिनीवर त्यांना ‘द झिया मोहियुद्दीन शो’ हा कार्यक्रम देण्यात आला. नाटय़संस्था उभारण्याचे प्रयत्न करतानाच हा चित्रवाणी कार्यक्रमही त्यांनी उत्तम प्रकारे सादर केला. झुल्फिकार अली भुत्तो यांच्या सत्ताकाळात हा कार्यक्रम तुफान चालत असे. पण पाकिस्तानात लष्करशाही अवतरली, जनरल झिया-उल-हक यांनी इस्लामीकरण सुरू केले आणि मोहियुद्दीन यांनी १९७३ मध्ये पाकिस्तान सोडला. ब्रिटन जणू या गुणी अभिनेत्याची वाटच पाहात होता. अनेक ब्रिटिश चित्रपटांतून आणि चित्रवाणी मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या, या बहुतेक भूमिका दक्षिण आशियाई पात्रांच्या असत. लंडनच्या बर्मिगहॅम भागात राहाताना काही उर्दू कार्यक्रमही केले. पण त्यांना नाटय़गुरू होता आले नाही. १९८० च्या दशकात ते पाकिस्तानात परतले, पण एक पाय ब्रिटनमध्ये ठेवून आणि ‘पाकिस्तानी-ब्रिटिश’ ही ओळख राखूनच. मात्र या मुक्कामात, विशेषत: बेनझीर भुत्तो आणि नवाज शरीफ यांच्या कार्यकाळांत त्यांना हवा तसा नाटय़चमू मिळाला, नाटकांच्या प्रयोगासाठी भारतातही येता आले.
शायरीचे दर्दी असलेल्या भारतीयांनाही मोहियुद्दीन यांचे नाव माहीत असते, ते गजल आणि नज़्म यांना कोणत्याही संगीताविना, नाटय़मय गद्य आवाजात पेश करण्याची ‘पढम्त’ कला त्यांनी फुलवल्यामुळे. यातून लक्षात राहातो तो त्यांचा अर्थवाही आवाज. तो आवाज १३ फेब्रुवारीच्या सोमवारी कायमचा थांबला.