त्या काळी म्हणजे पाच दशकांपूर्वी मराठी माणूस अमेरिकेत जाणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून येत. परदेशात, त्यातही अमेरिकेत जाणे ही मराठी जनांसाठी अतिशय अभिमानाची बाब समजली जात असे, तेव्हा सांगलीत जन्मलेल्या सुनील देशमुखांनी त्या देशाकडे प्रयाण केले. तिथे उत्तम व्यवसायात उत्तम जम बसवला आणि उत्तम वेव्हारे जोडलेल्या धनातून या मराठी संस्कृतीसाठी दानयज्ञ सुरू केला. हे दान कर्तृत्वासाठी होते. सांस्कृतिक विकासासाठी होते आणि त्यातून या मऱ्हाटी संस्कृतीतील लेखनाला, समाजकार्याला बळ मिळावे, अशी अपेक्षा होती. सरकारी पारितोषिकांपेक्षा अधिक म्हणजे मराठी साहित्यिकांसाठी स्वप्नवत् वाटावी, अशी रक्कम एवढेच केवळ त्या पारितोषिकांचे वेगळेपण नव्हते. तर पारितोषिकपात्र साहित्यिक कलाकृती निवडण्यासाठी वेगळय़ा पद्धतीने निवड करण्याची कल्पना त्यांनी मांडली. गेली सुमारे तीन दशके त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांना जे वलय निर्माण झाले आहे, ते त्यातील स्वच्छ कारभारामुळे.

जी गोष्ट साहित्यिक पुरस्कारांसाठी तीच समाजकार्य पुरस्कारांचीही. गेली २८ वर्षे हे पुरस्कार नियमाने आणि आपुलकीने दिले जात आहेत. सांगलीत शिक्षण घेताना अकरावीच्या परीक्षेत बोर्डात चौथा क्रमांक पटकावणाऱ्या सुनील देशमुखांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागातून पदवी घेतली आणि पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे कमॉडिटी ट्रेडर म्हणून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली आणि अल्पावधीत जमही बसवला. परदेशात गेल्यानंतर आपल्या मूळ मातीशी संबंध ठेवणे म्हणजे केवळ स्मरणरंजनात मग्न होणे, या समजुतीतून बाहेर पडून नेमके आणि थेट काम करण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन साहित्य पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पुरस्कार निवडीतील पारदर्शकता अधिक महत्त्वाची मानल्यामुळे त्याबाबत फारसे वाद निर्माण झाले नाहीत, उलट या पुरस्कारांचा दर्जा उंचावतच गेला. अमेरिकेतील सिएरा क्लब या पर्यावरण क्षेत्रात दीर्घ काळ काम करणाऱ्या संस्थेबरोबर देशमुखांनी संबंध निर्माण केले. त्या संस्थेचे सक्रिय सदस्यत्व मिळवून त्या संस्थेच्या माध्यमातून भारतात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली. त्यासाठीच्या निधी संकलन समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. अमेरिकेच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या वेगळय़ा कामाने ठसा उमटविल्यामुळे ‘फुल वीक सॅल्यूट’ हा सन्मानही त्यांना मिळाला. मराठी संस्कृती, भाषा, समाज याबद्दलची कळकळ परदेशस्थांना अधिक असते. मात्र त्याचे कृतिशील परिवर्तन क्वचित घडते. सुनील देशमुखांना असलेली ही ओढ वेगळी आणि विधायक होती. त्यामुळेच पडद्यामागे राहून हे काम करण्यातच त्यांना आनंद वाटत होता. परदेशातील भारतीयांसाठी एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या सुनील देशमुख यांचे निधन म्हणूनच क्लेशदायक ठरले आहे.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!