कॉफी युरोपात पोहोचण्यापूर्वी युरोपीय लोक सकाळी काय पीत होते? पाश्चात्त्य देशांमध्ये ‘नाइटलाइफ’चे प्रस्थ कधी सुरू झाले? मसाल्यांची चटक किंवा तपकिरीसारखी नशा यांचा सांस्कृतिक इतिहास काय असावा? – यासारखे निराळेच प्रश्न महत्त्वाचे मानून, त्यांची उत्तरे अभ्यासपूर्वक शोधणारे इतिहासकार म्हणजे वुल्फगँग शिव्हेलबुश. त्यांची किमान सहा पुस्तके इंग्रजीत, तर त्याहून दुप्पट जर्मन भाषेत प्रकाशित झाली आहेत, अन्य युरोपीय भाषांतही अनुवादित झाली आहेत. पण २६ मार्च २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या निधनाची बातमी इतिहासजमाच झाली असती, ती एका अमेरिकी वृत्तपत्राने ४ मे रोजी दिल्यामुळे जगासमोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहासकार म्हणून सर्वापेक्षा निराळाच मार्ग धरणाऱ्या वुल्फगँग शिव्हेलबुश यांना काहींनी विक्षिप्त मानले होते. त्यांच्या संशोधकवृत्तीबद्दल आणि अनेक विषयांतील रुचीबद्दल कोणालाही संदेह नव्हता. ‘सांस्कृतिक इतिहासकार’ ही त्यांची ढोबळ ओळख. पण संस्कृती फक्त खाणेपिणे, कपडेलत्ते, सणसमारंभ वा आनंदाच्या कल्पना यांतूनच नाही दिसत. ती रोजच्या जगण्यातून, कामातूनही दिसत राहाते.. संस्कृतीच्या या विशाल प्रदेशाची घडण इतिहासात शोधण्यासाठी, त्या प्रदेशात अनेक ठिकाणी खोदकाम करावे लागणार, हे वुल्फगँग शिव्हेलबुश यांनी ओळखले होते. रेल्वेमुळे प्रवास आणि मालवाहतूकच नव्हे तर औद्योगिकीकरण आणि वसाहतींचे शोषणही कसे सोपे झाले, यावरचे त्यांचे पुस्तक १९७७ साली इंग्रजीत आले. कॉफी, तपकीर, अफू, मसाले या साऱ्या चटक-व्यसनांबद्दलचे पुस्तक १९८० मध्ये, तर त्यानंतर तीन वर्षांनी आलेले पुस्तक विजेच्या दिव्यांमुळे बदलत गेलेले सामाजिक आणि कौटुंबिक जीवन यांच्याबद्दलचे होते. जर्मनीत १९४१ मध्ये जन्मलेल्या वुल्फगँग यांचे शिक्षण युद्धानंतरच्या जर्मनीतच झाले. महाविद्यालयात त्यांनी समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. तिथे थिओडोर अडोर्नो हे संस्कृती-सिद्धान्तकार त्यांचे अध्यापक होते. जर्मन बुद्धिवादी लोक आपल्याच इतिहासाकडे आता कसे पाहायचे, याच्या गंभीर चर्चा तोवर करू लागले होते आणि १९६८ च्या सुमारास युवा चळवळींचे लोण पाश्चात्त्य जगात पसरू लागले होते. या साऱ्याचा उल्लेख त्यांनी ‘द अदर साइड : लिव्हिंग अ‍ॅण्ड रिसर्चिग बिट्वीन न्यू यॉर्क अ‍ॅण्ड बर्लिन’ (२०२१) या आत्मकथनपर पुस्तकात केला असला, तरी ते काही ‘मी असा झालो’ सांगणारे पुस्तक नव्हे. उलट आत्मचरित्राच्या मिषाने जर्मन आणि अमेरिकी संस्कृतींतला भेद त्यांनी अधिक तपासला आहे. पण इतिहासाकडे डोळय़ाला डोळा भिडवूनच पाहावे लागेल आणि त्यासाठी डोळेही तेवढेच मोठे, सताड उघडे असावे लागतील हे त्यांनी ओळखले होते. ‘थ्री न्यू डील्स’ या पुस्तकात रुझवेल्ट यांनी अमेरिकेत तर हिटलर/ मुसोलिनीने जर्मनी/इटलीत केलेल्या औद्योगिक विकासाचा आढावा त्यांनी घेतला. हे करताना कोणाचीही बाजू त्यांनी घेतली नाही- रुझवेल्टचीही!  ‘कल्चर ऑफ डिफीट’ (२००१) मध्ये हिटलरी ‘राष्ट्रचेतने’चा समाचार घेतानाच अन्य देशांचेही दाखले त्यांनी दिले.  इतिहासातून संस्कृतीकडे नेणारा एक भाष्यकार त्यांच्या निधनाने आपण गमावला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh wolfgang schievelbusch historian research ysh
First published on: 09-05-2023 at 00:02 IST