काळाच्या ज्या एककाला कोणताही खगोलीय आधार नाही तेच काळाचं एकक सर्वव्यापी आणि सर्वमान्य ठरलं आहे. लोकप्रियतेची माळ गळ्यात पडायची तर सोपेपणा, व्यापार-व्यवहाराची गरज आणि उपयुक्तता या तीन गोष्टी असल्या पाहिजेत. शास्त्रशुद्धता असो- नसो काही फरक पडत नाही!
‘आठवडा’ हे काळाचं एकक मोठं गमतीचं आहे. हा विविध कालगणनांमध्ये आढळतो. शालिवाहन शकात आठवडा आहे. भारतात वापरात असलेल्या बाकीच्या कालगणनांमध्येदेखील आठवडा आहे. जपानी, चिनी कालगणनांमध्ये आठवडा आहे. हिब्रू कालगणनेत आठवडा आहे आणि हिजरी कालगणनेतदेखील आठवडा आहे. ग्रेगरियन कालगणनेत तर तो आहेच आहे. असा अगदी सर्वव्यापी आहे हा आठवडा.
दुसरा भाग असा की या सगळ्या कालगणनांमध्ये तो सातच दिवसांचा आहे! म्हणजे गंमत बघा. यातल्या काही कालगणना सौर आहेत, काही चांद्र आहेत, काही चांद्र-सौर आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा महिना निराळा, प्रत्येकाची तारीख निराळी. पण आठवडा? तो मात्र सगळीकडे अगदी एकसारखा.
म्हणजे ‘आज तारीख किती’ याचं उत्तर कालगणनेनुसार बदलेल. पण ‘आज वार कोणता’ याचं उत्तर मात्र जग फिरून आलात तरी तेच राहील! कालगणनेमध्ये एवढं सार्वत्रिक असं दुसरं एकक नाही.
एवढं सार्वत्रिक आणि एवढं अतार्किक! अतार्किक? हो. आठवडा या एककाला कोणत्याही खगोलीय घटनेचा आधार नाही. शालिवाहन शकाचं उदाहरण घेऊ. तिथी, पक्ष, महिना, योग, करण ही सगळी एककं चंद्र आणि सूर्याच्या भासमान भ्रमणावर आधारित आहेत. पण आठवडा? तो मात्र कोणत्याही खगोलीय घटनेवर आधारित नाही!
हे थोडं नीट पाहू. ‘आत्ता पंचमी तिथी आहे’ असं म्हटलं तर त्यावरून चंद्र आणि सूर्यामध्ये ४८°पेक्षा जास्त आणि ६०° पेक्षा कमी अंतर आहे असा निष्कर्ष आपण काढू शकतो. पण हेच, ‘आज शनिवार आहे’ यावरून कोणत्याही खगोलीय घटनेचा बोध होत नाही!
मग असं काहीही शास्त्रीय आधार नसलेलं काळाचं एकक आणि तरीही एवढी अफाट लोकप्रियता? काय कारण असावं यामागे?
दोन कारणं संभवतात. एक तर हे एकक कमालीचं सोपं आहे. अशिक्षितातल्या अशिक्षित माणसाला जर सांगितलं की ‘आज वार शनिवार. आता उद्यापासून वार मोजायचे’. तर तो हे काम बिनचूक करू शकेल. या तुलनेत काळाची बाकीची एककं किती तरी किचकट वाटतात. आणि सोप्या गोष्टी सर्वसामान्यांना प्रचंड आवडतात!
पण केवळ सोपं आहे म्हणून लोकप्रिय आहे असं नाही. सोपं तर आहे आणि गरजेचंही आहे. ‘महिना’ हे तुलनेने मोठं एकक आणि ‘दिवस’ हे तुलनेने अगदीच लहान एकक यांच्या मधलं काहीतरी एकक ही लोकांची आणि प्रामुख्याने व्यापार-व्यवहाराची गरज होती.
तेव्हा, आठवड्याच्या लोकप्रियतेचं गमक हे त्याचा सोपेपणा आणि व्यापार-व्यवहाराकरता त्याची उपयुक्तता या दोन गोष्टींमध्ये आहे. आणि ‘आठवडा’ या संकल्पनेचा जन्मदेखील याच गरजेपोटी झाला होता.
अगदी पार जुन्या, रोमचा पहिला राजा रोमुलस याने अमलात आणलेल्या रोमन कॅलेंडरच्या पहिल्या आवृत्तीतदेखील आठवडासदृश संकल्पना होती. आणि हे रोमन कॅलेंडर ज्या एक्स्ट्रुसन कॅलेंडरवर आधारित होतं त्यातदेखील ही संकल्पना होती. पण त्यांचा आठवडा आठ दिवसांचा असे. आणि बाजार भरण्याचा दिवस ठरवणे हेच त्या आठवड्याचं प्रमुख कार्य होतं. जुन्या इजिप्शिअन कालगणनेतदेखील आठवडा होता. तोदेखील व्यापाराच्या सोयीसाठीच होता. पण तो दहा दिवसांचा होता.
मग हा आठवडा सात दिवसांचा कसा झाला आणि का? आकाशात नुसत्या डोळ्यांना दिसणारे ग्रहगोल एकूण सात. सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी. फार पुरातन काळी कदाचित या संख्येवरून सात या संख्येला महत्त्व प्राप्त झालं असावं. दुसरं असं की २९-३० दिवसांच्या चांद्र महिन्याचे सात-सात दिवसांचे चार भाग आणि वर एक किंवा दोन वाढीव दिवस अशी विभागणीही करता येते.
पुढे यहुदी धर्माच्या जुन्या करारात ( Old Testament) देवाने सहा दिवसांत हे जग निर्माण केलं आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असा उल्लेख आहे. त्यामुळे ही सात दिवसांच्या चक्राची कल्पना दृढतर झाली असावी.
अर्थात, हे सगळे कयास झाले. पण एक गोष्ट मात्र नक्की की या विविध प्रभावांमुळे आठवडा सात दिवसांचा हे हळूहळू प्रस्थापित झालं. जूलियन कालगणना अमलात येईपर्यंत सात दिवसांचा आठवडा हा जवळजवळ सर्वमान्य झाला होता. पण तरी यावर अधिकृत असं शिक्कामोर्तब होण्यासाठी सन ३२१ उजाडावं लागलं. त्या वर्षी सम्राट कॉन्स्टन्टाईन याने ‘आठवडा सात दिवसांचा असेल आणि रविवार हा सुट्टीचा वार असेल’ असा आदेशच काढला.
पुढे पोप ग्रेगरी तेरावे यांनी कॅलेंडरमधले दहा दिवस गायब केले, लीप वर्षाच्या गणितात बदल केले. पण हे सगळे क्रांतिकारक बदल करणाऱ्या पोप ग्रेगरींनी वारांच्या चक्राला जराही धक्का नाही लावला. जूलियन कॅलेंडरनुसार ४ ऑक्टोबर १५८२ रोजी गुरुवार होता. त्याच्या पुढचा दिवस १५ ऑक्टोबर १५८२ होता खरा. पण वार मात्र शुक्रवारच होता!
@KalacheGanit
kalache.ganit@gmail.com
