बिहारमधील निवडणुकीतील दणदणीत पराभवामुळे भारतीय जनता पक्षातील दबलेल्या आवाजांना कंठ फुटणे स्वाभाविकच होते. ते राजकीय पक्षांच्या गुणसूत्रांतच असते. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार, यशवंत सिन्हा या मंडळींनी पक्षातील मोदीशाहीविरोधात आवाज उठविला यात काहीही धक्कादायक नव्हते. गेल्या रविवारी बिहार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पक्षाच्या खालच्या स्तरातून तातडीने तशा काही प्रतिक्रिया उमटल्याही होत्या. बिहारमधील शत्रुघ्न सिन्हा यांनी तर थेट नितीशकुमार यांचीच भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. सिन्हा हे जितके थोर नट, तितकेच थोर नेते. त्यामुळे ते एरवी पक्षातही अदखलपात्रच ठरत होते. पराभवानंतर मात्र त्यांचीही नाराजी चर्चेत आली. अडवाणी मात्र त्या पराभवानंतर शांत असल्याचे भासत होते. निकालाच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वेळात वेळ काढून नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतरचे अडवाणी यांचे मौन हा मोदींनी दिलेल्या शुभेच्छांचा परिणाम असावा असे वाटत असतानाच मंगळवारी त्यांनी एक पत्रक काढून मोदीशाहीवर तोफ डागली.

भाजपच्या संसदीय मंडळाने पराभवाची जबाबदारी सामुदायिक असल्याचे जाहीर करून मोदी आणि शहा यांना त्या अपश्रेयापासून वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाच अडवाणी आणि मंडळींनी आक्षेप घेतला. अडवाणी आणि मोदी यांचे ताणलेले संबंध पाहता आणि अडवाणी यांचे पक्षातील स्थान पाहता त्याचे स्वरूप गरज सरल्याने बाजूला फेकल्या गेलेल्या एका ज्येष्ठाचा आक्रोश एवढेच राहिले असते आणि मग सारे भाजपाई अडवाणी यांची खासगीत टिंगल करण्यास मोकळे झाले असते. परंतु यावेळच्या अडवाणी आणि मंडळी यांच्या बंडामध्ये एक फरक आहे. तो म्हणजे पक्षातील मोदीशाहीविरोधातील ते पत्रक मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानातून प्रसारित झाले आहे. तसे जोशी यांनाही पक्षात आता काही स्थान नाही. एकेकाळी ते पक्षाचे अध्यक्ष होते. परंतु तरीही ते काही लोकप्रिय नेते नव्हते. त्यांच्या पक्षातील स्थानाचा पाया होता तो संघाचा. संघाने भाजपला ‘दिलेल्या’ नेत्यांपैकी ते एक महत्त्वाचे नेते होते. हे नाते लक्षात घेतले की त्यांनी काढलेल्या पत्रकाची किंमत ध्यानात येते.

पक्षातील काही नेत्यांकडून आपणांस जी माहिती मिळाली त्याच्या आधारे आपण हे पत्रक काढले असल्याचे जोशी सांगत असले तरी त्यांचे बोलवते धनी वेगळेच असल्याचे दिसून येते. त्यांचा हा विरोध संघभावनेनेच करण्यात आलेला आहे हे स्पष्ट आहे आणि त्या विरोधाची धार बोथट करण्याचे कामही आता संघभावनेनेच सुरू असल्याचे दिसत आहे. अडवाणी हे भाजपाध्यक्ष असतानाही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि तेव्हाही ती सामुहीक जबाबदारी असल्याचेच गणले जात होते हे नागपूरचे लाडके नेते नितीन गडकरी यांनी अडवाणी यांच्या लक्षात आणून देणे याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. अडवाणी-जोशी यांच्यामार्फत इशारा देण्याचे जे काम होते ते सफळसंपूर्ण झाले असून आता बंडाचे ज्येष्ठ निशाण खाली उतरविण्याची वेळ आली आहे हाच याचा अर्थ आहे. त्यामुळे हे ज्येष्ठांचे बंड जसे उठले तसेच ते थंड होणार आहे. त्याचे नेमके परिणाम लक्षात येण्यास काही वेळ लागेल इतकेच.

Story img Loader