गुंतवणूक ठेव विम्याची कल्पना मांडणाऱ्या डायमंड आणि डिब्विग या अर्थशास्त्रज्ञांच्या जोडीने, ती प्रत्यक्षात राबवणाऱ्या बर्नाके यांनाही ‘नोबेल’ मिळणे अप्रूपाचे..

..या बर्नाकेंवर ‘क्वांटिटेटिव्ह ईझिंग’बद्दल टीकाही झाली, पण मध्यवर्ती बँकरच्या भूमिकेस लक्षवेधी करण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल..

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

सरकारी धोरणकर्ते हे कधी नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या परिघात नसतात. ते तसे योग्यही. याचे कारण हे अनेक धोरणकर्ते बिचारे सत्ताधाऱ्यांच्या अडीअडचणींवर मात कशी करता येईल या एकमेव निकषावर धोरणे बेतत असतात. त्यामुळे प्रयोगशाळेत वा आपल्या अभ्यासिकेत निवांत विचारमंथन करून उद्याच्या पिढीच्या भल्याचा विचार करण्याइतकी उसंत त्यांना नसते. धोरणकर्त्यांच्या कामाच्या गरजा वेगळय़ा. अशा पार्श्वभूमीवर बेन बर्नाके यांचा समावेश डग्लस डायमंड आणि फिलिप डिब्विग यांच्यासमवेत अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकात होणे ही तशी अप्रूप बाब म्हणायची. बर्नाके हे अमेरिकेच्या ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’चे, म्हणजे त्या देशाच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी प्रमुख. कोणत्याही देशांतील आत्यंतिक महत्त्वाच्या असूनही आत्यंतिक दुर्लक्षित पदांत बँकर्सचा समावेश होतो. ते ना आर्थिक धोरणाचे नियंत्रक अर्थमंत्री ना उद्योगपती. त्यामुळे जनता तसेच सत्ताधीश अशा दोहोंच्या उपेक्षेचे धनी त्यांस व्हावे लागते. वास्तविक जगाचा आर्थिक इतिहास हा उत्तम बँकर्सच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. महायुद्धांच्या कालखंडात जागतिक अर्थव्यवस्था मृतावस्थेत असताना अमेरिकेचे बेंजामिन स्ट्राँग, ‘बँक ऑफ इंग्लंड’चे माँटेग्यु नॉर्मन, ‘बँक ऑफ फ्रान्स’चे एमिल मॉर्यु, जर्मनीच्या राईश बँकेचे हाम्लर शाष्ट या चार बँर्कसनी एकमेकांच्या सहयोगाने आखलेली धोरणे, त्याच सुमारास भारतातील चिंतामणी देशमुख यांच्यासारख्यांची कारकीर्द, अमेरिकेचे बलदंड पॉल व्हॉल्कर, अलीकडच्या काळातील बहुचर्चित बँकर अ‍ॅलन ग्रीनस्पॅन, आपले बिमल जालान, वाय. व्ही. रेड्डी, रघुराम राजन आदी काही मोजके महनीय सोडले तर बँकर्सकडे तसे आपले दुर्लक्षच होते. नोबेल पारितोषिकाने ही उणीव दूर झाली. आता या त्रयीच्या, विशेषत: बर्नाके यांच्या बँकिंग कामगिरीविषयी.

अमेरिकेत येऊन मूळच्या ज्या असंख्य यहुदींनी आपले आणि अमेरिकेचेही नशीब उजळवले, त्यातील एक नामांकित हे बर्नाके घराणे. एके काळी अमेरिकेची संपूर्ण वित्त यंत्रणा या यहुद्यांच्या हाती होती. त्यांची इतकी पकड या क्षेत्रावर होती की आद्य अमेरिकी उद्योगपती हेन्री फोर्ड यांनी या यहुदी बँकर्सवर पहिल्या महायुद्धाचा घाट घातल्याचा आरोप केला होता. अशा वित्तसमृद्ध इतिहासाचे बर्नाके हे पाईक. त्यांची या पदासाठी निवड झाली नवीन सहस्रकाच्या प्रारंभी. अमेरिकेच्या अध्यक्षपदी युद्धखोर जॉर्ज बुश असताना त्यांनी बर्नाके यांस या पदासाठी आणले. बर्नाके हे अर्थशास्त्राचे अध्यापक. पार्श्वभूमी अत्यंत देदीप्यमान म्हणता येईल अशा शैक्षणिक गुणवत्तेची. बुश यांनी वित्त मंत्रालयात नियुक्ती केल्यानंतर २००६ पासून जवळपास सलग नऊ वर्षे बर्नाके यांनी अमेरिकी ‘फेड’चे नेतृत्व केले. ते ज्या वर्षी आले त्याआधी तीन वर्षे बुश यांनी इराकच्या सद्दाम हुसेनविरोधात युद्ध छेडले होते आणि तालिबान्यांचा अल कईदाशी संबंध आहे असे सिद्ध न झालेले कारण पुढे करीत अफगाणिस्तान बेचिराख केले होते. या काळात फेड प्रमुखपदी होते अ‍ॅलन ग्रीनस्पॅन. जवळपास १८ वर्षांची ग्रीनस्पॅन यांची कारकीर्द. सर्वार्थाने विक्रमी. त्यांनी बुश यांच्या युद्धखोरीसाठी स्वस्त पैसा उपलब्ध करून दिला. परिणामी बर्नाके हे ‘फेड’ची सूत्रे हाती घेत असताना अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने घरंगळू लागली होती. मंदीच्या काळाचा अर्थाभ्यास हा बर्नाके यांच्या जिव्हाळय़ाचा विषय. ‘महामंदी’ नावाने ओळखला जाणारा १९३०चा अर्थकाळ त्यांनी सखोल अभ्यासलेला. त्याच दिशेने अमेरिकी अर्थव्यवस्था निघालेली असताना ‘फेड’चे प्रमुखपद त्यांच्याकडे आले. आपला अभ्यास त्यामुळे बर्नाके यांना प्रत्यक्षात आणता आला.

लोकांच्या हाती पैसा राहील याची काळजी घेतल्यास अर्थव्यवस्था मंदावस्थेतून पुन्हा बाळसे धरू इच्छिते हे त्यांचे वरकरणी पाहता साधे वाटेल असे तत्त्व. अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे असे नागरिकांस कधीही वाटता नये, त्यांचा अर्थव्यवस्थेवर विश्वास हवा, तसा तो असेल तर बँकांतील आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गुंतवणूकदार गर्दी करीत नाहीत, अशी ही साधी मांडणी. १९३० साली मंदीची स्थिती निर्माण झाली आणि ती लांबली ती केवळ बँकांच्या निष्क्रियतेमुळे नव्हे, पण सक्रियतेच्या अभावामुळे, असे त्यांचे म्हणणे. बर्नाके यांच्या बरोबरीने नोबेल विजेते असलेले डायमंड आणि डिब्विग यांनी गुंतवणूक ठेव विम्याची कल्पना मांडली आणि बर्नाके यांच्या काळात ती अस्तित्वातही आली. आपल्याकडेही बँक गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींस सरकारी हमी असते. आधी ही मर्यादा एक लाख रु. इतकी होती. अलीकडे ती पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे बिकट आर्थिक परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी बँकांतून आपल्या ठेवी परत मागण्यास तगादा लावणे कमी झाले. या बदलाचे श्रेय या तिघांचे. तेव्हा नागरिकांच्या हाती पैसा खेळता राहिला तर मागणी कायम राहते आणि अर्थव्यवस्थेचे मंदीच्या गर्तेत रुतलेले चाक बाहेर येण्यास मदत होते हा त्यांचा सिद्धांत. त्यातूनच ‘क्वांटिटेटिव्ह ईिझग’ ही कल्पना बर्नाके यांनी राबवली. दोन दशकांपूर्वी २००८ नंतर जग आर्थिक संकटात सापडलेले असताना ही कल्पना त्यांनी अमलात आणली. काही विशिष्ट कालावधीने, उदाहरणार्थ तीन महिने, अमेरिकी ‘फेड’ बाजारात पैसा ओतत असे. म्हणजे सरकारी रोखे मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून बाजारात भरपूर रोकड राहील याची हमी देत असे. यामुळे २००८ सालातील अर्थसंकटावर मात करणे सोपे गेले. कारण मंदी होती तरी लोकांहाती पैसा होता. त्यामुळे मागणीचे चक्र पूर्ण थांबले नाही. हा मुद्दा महत्त्वाचा. मागणी आणि पुरवठा ही अर्थव्यवस्थेची दोन चाके. आपल्याकडे सतत प्रयत्न होतो तो पुरवठय़ाच्या अंगाने. म्हणजे मागणी नाही. तरी पुरवठा सुरू. त्यामुळे अर्थव्यवस्था अपेक्षित वेग घेत नाही. हा धोका बर्नाके यांनी टाळला.

तथापि त्याचेही काही दुष्परिणाम झालेच नाहीत असे नाही. पैसा अतिस्वस्त झाल्याने जगात मोठी चलनवाढ झाली आणि आता ती सगळय़ांसमोरील डोकेदुखी बनून गेली आहे. बर्नाके यांनी सुरू केलेले ‘क्वांटिटेटिव्ह ईिझग’ बंद वा कमी करणे त्यांच्या उत्तराधिकारी जेनेट येलेन यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक बनले. जेव्हा जेव्हा त्या देशाने तसा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोठा फटका आपल्यासारख्या अर्थव्यवस्थांस बसला. पैसा स्वस्त आणि सहज उपलब्ध व्हावा यासाठी अमेरिकेत व्याज दर शून्यापर्यंत खाली आलेले असताना बऱ्यापैकी व्याज देणारा भारत अनेकांच्या आकर्षणाचा विषय होता. पण अमेरिकेत पुन्हा व्याज दर वाढवण्यास सुरुवात झाली तेव्हा भारताचे आकर्षण संपुष्टात आले. अवघ्या काही महिन्यांत तीनेक लाख कोटी रुपये भारतीय भांडवली बाजारातून काढले गेले. ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली आहे असे नाही. म्हणूनच एक-दोन दिवसांच्या उभारीनंतर भारतीय भांडवली बाजार पुन:पुन्हा मटकन बसतो. पैसा स्वस्त केल्याने आपल्याकडेच नव्हे तर अमेरिकेसह जगात सर्वत्र चलनवाढ इतकी झाली की या बाटलीतल्या राक्षसास पुन्हा बंद कसे करायचे हा प्रश्न सध्या जगास भेडसावत आहे.

त्यामुळे अर्थतज्ज्ञांचा एक गट अमेरिकी ‘फेड’ला, म्हणजे ग्रीनस्पॅन आणि बर्नाके यांना, यासाठी बोल लावतो. त्यामुळे त्यांस नोबेल मिळाले यावरही काही टीका होताना दिसते. बर्नाके यांच्यावर वैयक्तिक आरोपही झाले. ते ठीक. सर्वानाच सर्व आवडायला हवे अशी अपेक्षा बाळगणे अयोग्य. बर्नाके यांच्याबाबत मतभेद असले तरी एका मुद्दय़ावर मात्र सर्वाचे एकमत दिसते. ते म्हणजे त्यांनी इतके दिवस दुर्लक्षित मध्यवर्ती बँकरच्या भूमिकेस लक्षवेधी केले. यापुढील बँकर्ससाठी हे प्रेरणादायी असेल. म्हणून या पुरस्काराचे महत्त्व.