अजितदादांच्या पत्राची आता गरज काय, हा संभ्रम कायम राखूनही पहाट, अपघात, सत्तेची जोड यांविषयी या पत्रातील विधाने फारच प्रांजळ..
राज्यातील आणि राज्याबाहेरीलही, किंबहुना पृथ्वीतलावरील, समस्त मराठीजनांस सध्या गहिवर अनावर झाला असून प्रत्येक सुजाण, साक्षर नागरिक स्वत:चे तरी डबडबलेले डोळे पुसताना दिसतो. त्याच्या डोळय़ातील अश्रूंमागे हवेत झालेली धूलिकणांची वाढ हे कारण नाही. काही महिन्यांपूर्वी ते कारण होते हे खरे. तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामप्रहरी स्वत: मैदानात (पक्षी : रस्त्यावर) उतरून हाती जलवाहिका (पक्षी : पाइप) घेऊन ‘खोलवर धुलाई’ (पक्षी : डीप क्लीनिंग) सुरू केल्याचे पाहून हवेतील धूलिकण, ईडीच्या चरणांवर विरोधी राजकारणी पडावेत तसे आपोआप धारातीर्थी पडू लागले आणि पाहता पाहता हवेतील प्रदूषण दूर झाले. तेव्हा नागरिकनयनींच्या अश्रूंमागे हवेतील प्रदूषण हे कारण निश्चित नाही. हे अश्रू भावनिक आहेत. आपला विकास व्हावा म्हणून अहोरात्र कष्ट करणारे, जमेल त्यांची टेंडरे काढणारे, काढलेली टेंडरे नव्याने लिहिणारे इत्यादी जनप्रिय लोकप्रतिनिधी पाहून महाराष्ट्रीय जनतेच्या भावना उचंबळून आल्या आणि त्या नयनमार्गिकेद्वारे वाहू लागल्या असेही नाही. या विकासकांक्षी राजकारण्यांस पाहण्याची सवय महाराष्ट्रास गेल्या काही वर्षांपासून लागलेली आहेच. अशांस पाहून त्यामुळे नागरिक हेलावत नाहीत. नागरिकांच्या नयनाश्रूंमागील कारण कर्तव्यकठोर, तर्कनिष्ठ, कार्यतत्पर असे आपल्या राज्याचे एक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समस्त मराठीजनांस लिहिलेले पत्र हे आहे. या अशा ऐतिहासिक संवेदनशील विषयाची दखल घेणे आवश्यक ठरते.
कोणत्याही पत्राचे काही एक प्रयोजन असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांस लिहिलेले, तुरुंगातून पं जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा हीस लिहिलेली अथवा पू साने गुरुजींनी संस्कारक्षम वयातील आपली पुतणी चि. सुधा हीस लिहिलेली पत्रे इत्यादी. सामान्यजनही ‘पत्रास कारण की..’ असे सुरुवातीलाच रिवाजाने लिहितात. तथापि अजितदादांच्या पत्राचे प्रयोजन काय हा प्रश्न ते वाचून पडतो. ते पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले हे कारण म्हणावे तर तसेही नाही आणि पहिल्यांदाच काकांचा हात सोडून प्रतिपक्षाच्या कळपास जाऊन मिळाले हे कारण म्हणावे तर तेही नाही. त्यामुळे त्यांच्या या पत्रकष्टामागील कारणांचा शोध घेण्यात वाचकांस बरीच ऊर्जा जाळावी लागते. पत्राच्या सुरुवातीलाच ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना’’ काय विचार केला ते जनतेस सांगावे असे दादा लिहितात. ते योग्यच. पण हे कारण आताच सांगण्याचे कारण काय? या त्यांच्या सांधेबदलास येत्या जुलै महिन्यात वर्ष होईल. हा थारेपालट आपण का केला हे सांगण्यास त्यांनी केलेला इतका विलंब अचंबित करतो. हे म्हणजे गांधर्व विवाहातून संसाराच्या वेलीवर उमललेल्या फुलांच्या शाळाप्रवेशक्षणी आपण पळून जाऊन लग्न का केले हे सांगण्यासारखे. त्याची ‘आता’ गरज काय? आणि मुख्य म्हणजे ही विवाह शौर्यगाथा आम्हाला सांगा असा कोणी हट्ट अजितदादांपाशी धरला होता काय? असेही नाही की दादांनी काकांचा हात का सोडला हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील जनता कानी प्राण आणून वाट पहात होती! असा सत्ताधीशांचा हात धरण्यास नकार दिल्यावर कोणत्या केंद्रीय यंत्रणांचा हात खांद्यावर पडतो हे महाराष्ट्राने, आणि देशानेही, पाहिलेले असल्यामुळे अलीकडे शेंबडय़ा बालकांसही पक्षांतरांची कारणे सांगावी लागत नाहीत. सर्वानाच ती माहीत असतात. जनतेस माहीत असलेली माहितीच पुन्हा देण्याच्या कौशल्यासाठी दादा ओळखले जातात असेही नाही.
या पत्रात दादा आपणास संधी कशी अपघाताने मिळाली हे लिहितात. ते खरे आहे. कारण अशी संधी मिळावी यासाठी दादांनी अनेक अपघात केले. खरे तर इतके अपघात झाल्यावर एखाद्याचा वाहन परवानाच रद्द झाला असता. पण इथे हे पडले दादा. त्यात काकांचे पुतणे. तेव्हा त्यांनी रात्री-बेरात्री, भल्या पहाटे कितीही अपघात केले तरी त्यांना कोण विचारणार? एका अपघातानंतर तर त्यांचे नावच एका आरोपपत्रातून पुसले गेले. म्हणून अशा अपघातांचे महत्त्व दादांच्या आयुष्यात फार म्हणजे फारच. या पत्रात ते पहाटे पाच वाजल्यापासून आपण कसे जनसेवेच्या कामास लागतो, असे लिहितात. ही खरी मौलिक माहिती. ‘लवकर निजे, लवकर उठे’ हा सल्ला त्यांनी किती शिरोधार्य मानला ते यातून कळेल. त्यांच्या पहाटे पाच वाजता उठून कार्यास लागण्याकडे काकांनी लक्ष दिले असते तर त्यांस दादांच्या पुढल्या प्रवासाचा अंदाज आधीच येता. पहाटे पाच वाजता उठून दादा कसे जवळच्या मंदिरात काकडआरतीस जातात, हे काकांस तेव्हाच कळून दादांचा मंदिरगमनी मार्ग त्यांस लक्षात येता. असो.
दादांचा प्रामाणिकपणा या पत्रात शब्दाशब्दांतून ओसंडून वाहतो, हे बरीक खरे. पहा ‘‘लोकप्रतिनिधी म्हणून काम करावयाचे असेल तर सत्तेची जोड हवी’’, हे त्यांचे या पत्रातील विधान. सत्तेशिवाय लोकप्रतिनिधी म्हणजे अंधाराशिवाय वटवाघूळ! प्रकाशित वातावरणात ज्याप्रमाणे वटवाघळांचा कपाळमोक्ष अटळ त्याप्रमाणे सत्ताच्युत लोकप्रतिनिधींचे नामशेष होणे अटळ. गणपतराव देशमुख, नरसैया आडम, एन. डी. पाटील, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदींचे जे काही झाले तेच सत्तेशिवाय दादांचे होण्याचा धोका होता. आता हे सर्व राजकीय शीलवंत होते हे खरे. पण संपत्तीशिवाय शीलास विचारतो कोण? सत्तासंपत्ती असेल तर असे अनेक शीलवंत पदरी राखता येतात हा धडा दादांस घरातूनच मिळालेला असणार. त्यामुळे सुरक्षित सत्तास्थानी असलेले बरे असा विचार त्यांनी केला आणि तो प्रामाणिकपणे जनतेस सांगितला. हे असे वाटते ते सांगणे हा दादांचा खरा गुण. मनात येईल ते बोलून टाकले की दादांस किती ‘मोकळे’ वाटते हे महाराष्ट्राने धरण, जलसिंचन इत्यादी संदर्भात पूर्वीही अनुभवलेले आहे. त्याचाच प्रत्यय या पत्रात शब्दोशब्दी येतो. या त्यांच्या रोखठोकपणाची काळजी वाटते ते पत्रातील एका उल्लेखाबाबत.
‘‘माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे’’, असे दादा त्यांचे (विद्यमान) नेते साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री (तेही साक्षातच) अमित शहा यांच्याविषयी लिहितात. या त्यांच्या धाष्टर्य़ास महाराष्ट्र नाही तरी निदान त्यांचे राष्ट्रवादी स्वयंसेवक किंवा गेलाबाजार सुनील तटकरे तरी सकन्यारत्न मानाचा मुजराच करतील. साक्षात या दोघांशी स्वत:ची तुलना करण्याची हिंमत भाजपतील एकानेही अद्याप दाखवलेली नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांचे काय झाले, हा मुद्दा सोडा. पण या तुलनेविषयी या साक्षात दोघांस काय वाटेल हा यातील चिंताविषय. गल्लीतल्या भिंतीवर घरच्या चेंडूस लाथा मारणाऱ्यास आपली शैली (साक्षात) पेलेशी मिळतीजुळती आहे असे वाटावे तसे हे. दादांचे मोठेपण ते हेच. आता नरेंद्र मोदींप्रमाणे दादाही त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता महाराष्ट्रात आणतील आणि मोदींप्रमाणे किमान सलग तीन खेपेस स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद राखतील. पुढे मग पंतप्रधानपद आहेच! त्यांच्या या विधानाने दादांचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील अस्वस्थ आहेत असे म्हणतात. असो.
मराठी संस्कृतीत ‘‘माझ्या मामाचे पत्र हरवले, ते मला सापडले’’ असे म्हणत खेळायचा एक रिंगणखेळ एत्तदेशीयांत लोकप्रिय होता. आधुनिक काळात ‘मामा’ऐवजी ‘दादा’ म्हणत या खेळाचे पुनरुज्जीवन करता येईल. तेवढेच मराठी संस्कृतीच्या सेवेचे पुण्यही गाठी जमा होईल. तेव्हा दादांनी हे पत्रलेखन असेच सुरू ठेवावे. ‘‘अस्वस्थ शारदा’’ खंडात ती प्रसिद्ध करता येतील आणि त्यासाठी टेंडरेही काढता येतील.