चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वासना म्हणजे हवं-नकोपणाची इच्छा. क्षणोक्षणी माणसाच्या मनात हवं-नकोपणाचा भाव विलसत असतो. जे हिताचं आहे ते हवं आणि अहिताचं आहे ते नको, असा शुद्धपणा मात्र त्यात नसतो. तर जे आवडीचं आहे ते हवं आणि जे नावडीचं आहे ते नको, असा स्वाभाविक निवाडा असतो. विशेष म्हणजे, जे आवडीचं आहे ते बरेचदा हिताचं नसतं आणि जे नावडीचं आहे ते हिताचं असतं. अशा वेळी माणसाचं मन अशुभ वासनांनी, अशुभ इच्छा आणि अशुभ प्रेरणांनी व्यापून जावं, यात नवल नाही. पण ‘श्रीरामगीते’त म्हटल्याप्रमाणे या मनाचं एक वैशिष्टय़ आहे; ते असं की, एका वेळी एका प्रकारच्या इच्छेचाच पगडा या मनावर बसतो. म्हणजे अशुभ वासनेचा पगडा असेल, तर माणसाच्या उक्ती, कृती आणि विचारात अशुभाचीच छाया पडते. जर शुभ वासनेचा पगडा असेल, तर त्याच्या विचार, उक्ती आणि कृतीमधून शुभ भावनेचाच प्रत्यय येत राहतो. हे मन अशुभ वासनेच्या प्रवाहात वाहत असेल आणि त्याला प्रयत्नपूर्वक रोखता आलं तर ते शुभ वासनेकडेच वळतं, असं ‘श्रीरामगीता’ सांगते. आता पहिला प्रश्न असा येतो की, नेमकं शुभ काय आणि अशुभ काय? तर आत्महित साधणारी प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक उक्ती ही शुभ आहे आणि आत्मघात करणारी प्रत्येक उक्ती, कृती आणि विचार हा अशुभ आहे. मग शुभ आणि अशुभामधला फरक नेमका कसा कळावा? तर जो परमहित साधून देण्यासाठीच कार्यरत आहे, जो केवळ एका परमात्म स्वरूपाशी एकरूप आहे, अशा सत्पुरुषाच्या संगतीतच हा फरक जाणवू लागतो! संत एकनाथ महाराजच म्हणतात की, ‘‘साधुसज्जनसंगती। सभाग्य भाग्यातें पावती। सत्संगें भवनिर्मुक्ती। वेदशास्त्रसी संमत।।९३।।’’ (‘भावार्थ रामायण’, सुंदरकांड). काय विलक्षण गोष्ट सांगितली आहे की, ‘सभाग्य भाग्यातें पावती’! भाग्यात एखादी गोष्ट असते हो, पण ती उमजत नाही. आता माणसाचा जन्म मिळाला, यासारखी भाग्याची गोष्ट आहे का? पण ते भाग्य कुठे लक्षात येतं? सत्संगतीत ते उमजू लागतं. पण हा सत्संग काय वाटेवर पडला आहे का हो? एक वेळ उपासना माणूस ऐकीव माहितीवर करीलही, अगदी उपासतापास करील, पारायणं करील, जप करील, तीर्थाटनं करील, पण ‘मी करतो’ हा भाव असल्यानं हे सगळं करूनही खरा लाभ काही होणार नाही. मात्र खरा सत्संग लाभला तर कर्तेपणा ओसरून खरी साधना होईल आणि खरी आंतरिक घडणही होईल. पण हा सत्संग सहजसाध्य नाही बरं. संत तुलसीदास म्हणतात, ‘‘बिनु सतसंग बिबेक न होई, रामकृपा बिनु सुलभ न सोई!’’ सत्संगाशिवाय काय हिताचं आणि काय अहिताचं, काय श्रेय आणि काय प्रेय, काय स्वीकारार्ह आणि काय त्याज्य, हा विवेक होणार नाही आणि हा सत्संग भगवंताच्या कृपेशिवाय लाभणार नाही. तर जेव्हा असा खरा सत्संग लाभेल ना, तेव्हाच खरा परमार्थ सुरू होईल! पण एक मात्र आहे; खरा शुद्ध सत्संग बाजारात मिळणार नाही. जिथे शिष्याच्या अंत:करणापेक्षा त्याच्या खिशावर लक्ष आहे, तिथं अध्यात्म नाही! तेव्हा आत्मकल्याणाचा मार्ग उजळवून टाकणारा खरा सत्संग भगवंताच्या कृपेनंच मिळतो. तो मिळाला की खरा परमार्थ सुरू होतो. या परमार्थात अशुभ वासना त्यागून मनाला दृढपणे चिकटवावं, असं एकनाथ महाराज सांगतात. पण ते कसं साधावं?

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 383 zws
First published on: 07-09-2020 at 00:37 IST