– चैतन्य प्रेम

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

अनवधानानं जगणं सुरू असतं तेव्हा आपल्या वर्तनाकडे आपलं लक्षच नसतं. त्यामुळे आपण अनेकदा बोलू नये ते बोलून जातो, वागू नये तसं वागून जातो. जेव्हा अवधान येतं तेव्हा प्रसंगानुरूप मनात क्रोध, मत्सर भावना उसळू लागताच अनुतापही उत्पन्न होतो. मी साधक म्हणवतो आणि तरी माझ्या मनात हा अविचारी क्रोध का, ही सल मनात येऊ लागते. एक गोष्ट लक्षात घ्या. काही वेळा क्रोधाचा आविर्भाव धारण करावा लागतो. मुलांकडून चूक घडली तर त्यांना समजावताना, हाताखालच्या माणसांकडून काम करून घेताना प्रेमानं समजावता आलं तर उत्तमच. पण काही वेळा थोडा क्रोध व्यक्त होण्याची गरजही असते. पण श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, हा क्रोध चेहऱ्यावर असावा, हृदयात नको. असो. तर अवधानानं अनुताप आणि अनुतापानं विवेक निर्माण होतो. विवेक म्हणजे कोणतं वर्तन योग्य, कोणतं अयोग्य ही जाणीव. ती झाली की आशेचा निरास होतो. अवधूत म्हणतो, ‘‘अनुतापु नाहीं ज्यासी। विवेक नुपजे मानसीं। तो संसाराची आंदणी दासी। आशापाशीं बांधिजे।।२०६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). ज्याच्या मनात विवेक निपजत नाही तो अविवेकानं बेताल होतो. सुखलालसेनं सतत अशांत असतो. जगाकडूनच ती सुखपूर्ती होईल, या भावनेनं जगाचा दास होतो, जगाच्या तालावर नाचू लागतो. त्याच्या मनाला मोहममतेची बेडी पडलेली असते. त्याच्या देह-मनाच्या जात्यात अहोरात्र विषयांचंच दळण सुरू असतं! श्रीगोंदवलेकर महाराजांनी दिलेलं एक रूपक इथं स्मरतं. ते म्हणाले, जात्याला दोन दगडी पेडी असतात. खालचा दगड स्थिर असतो, तर वरचा दगड फिरता असतो. वरच्या दगडात बसवलेल्या खुंटय़ानं तो लयीत फिरत असतो आणि म्हणूनच जात्यात टाकलेलं धान्य दळलं जात असतं. पण जर दोन्ही दगड फिरू लागले, तर धान्य दळलं जाईल का? अर्थातच नाही. अगदी त्याचप्रमाणे जीवाचं हे देह-मनाचं जातं आहे. खालचा दगड म्हणजे मन स्थिर हवं, तर वरच्या दगडानं म्हणजे देहानं संसारात फिरावं, पण साधनेच्या स्मरणखुंटीला धरून! तरच बोध आणि त्यानुरूप कृती यांतील संतुलनानं अंत:करणाला लाभ होईल. पण जिथं दोन्ही दगड फिरू लागतात अशा मनाला अर्धघडीदेखील शांतता अनुभवता येत नाही. अवधूत म्हणतो त्यानुसार, ‘‘यासी मोहममतेची गाढी। घालिजे देहबुद्धीची बेडी। अहोरात्र विषय भरडी। अर्ध घडी न राहे।।२०७।।’’ अशा जीवाची किती आणि कशी दुर्दशा होते, ते अवधूत सांगतो. तो म्हणतो की, भवरोगानं असा जीव मायाजर्जर गोधडीला खिळून जातो! त्याचे विवेकाचे डोळेच फुटतात, विवेकदृष्टी हरवल्यानं त्याला जगण्याचा योग्य मार्गही दिसेनासा होतो (‘‘फुटले विवेकाचे डोळे। मार्गु न कळे विध्युक्त।।’’). मग तो वेडावाकडा चालत दुश्चित्त होऊन अंध:कारानं भरलेल्या अर्थात अज्ञानव्याप्त विहिरीत पडतो. तिथून बाहेर पडण्याचा उपायच त्याला उमगत नाही. इतकंच नव्हे, तर काया-वाचा-मनानं तिथून बाहेर पडावसंही वाटत नाही. अज्ञानातच सुरक्षित वाटतं, ज्ञानाची भीती वाटते! तोच लोभरूपी विंचू डंख मारतो. ते विष चढू लागतं. मग परनिंदेचा जोर, द्वेषाची जळजळ, अहंकाराचे आळोखेपिळोखे, मोहाचे उमासे सुरू होतात; पण विषयप्रेमाचं दळण दळणं आणि दु:खाच्या शेजेवर कुढत पडणं काही थांबत नाही! अवधूत म्हणतो, ‘‘अभिमानाचे आळेपिळे। मोहउमासे येती बळें। तरी विषयदळणें आगळें। दु:खें लोळे गेहसेजे।।२१२।।’’