चैतन्य प्रेम

ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची परंपरा विज्ञानानं सातत्यानं विकसित केली आहे. अंतरीक्षाची उत्तरं ही परमात्म केंद्रित आहेत. अर्थात या सृष्टीचं मूळ, या चराचराचा उगम, स्थिती, लय आणि विलयानंतरचंही अस्तित्व हे परम तत्त्वाच्याच आधारावर आहे, असं तो सांगत आहे. एका वेगळ्या अंगानं होणारं सृष्टीचं हे विराट दर्शन आहे आणि ज्या पृथ्वी, हवा, पाण्याची सहज प्राप्ती आपल्याला झाली आहे, त्यांची आपण किती हेळसांड करतो, हा विचार मनाला शिवून जातो. अंतरीक्ष सांगतो की, हे राजा, या परमात्म्यानं जड, मूढ आणि अचेतन अशी पंचमहाभूतं निर्माण केली आणि प्राणिमात्रही उत्पन्न केले. या सर्वाकडून अपेक्षित कार्य करून घेण्यासाठी मग हा परमात्मा शक्तीरूपानं त्यांच्यात प्रवेशला. (‘‘एशीं स्रजिलीं भूतें महाभूतें। जीं जड मूढ अचेतें। त्यांसी वर्तावया व्यापारार्थे। विभागी आपणातें तत्प्रवेशीं।। ८५।।’’) पाहा बरं.. या परमात्म शक्तीनं जशी जड, मूढ आणि अचेतन पंचमहाभूतं उत्पन्न केली, त्याप्रमाणे याच अचेतन पंचतत्त्वांच्या संयोगानं सचेतन प्राणिमात्रही घडविले! या पंचमहाभूतांमध्ये प्रवेशून त्यांच्यात कार्यशक्ती निर्माण केली आणि याच पंचतत्त्वांनी घडलेल्या जीवमात्रांतदेखील तिचा विस्तार केला. आता ही पंचमहाभूतं मूढ आहेत, म्हणजे काय? तर त्यांच्यात निर्णयबुद्धी नाही! पुरानं होत असलेल्या हानीनं पाण्याला दु:ख होत नाही, की त्याच्या योगानं फुलत असलेल्या बागा, फलोद्यानं आणि शेती पाहून पाण्याला गर्वही होत नाही. अगदी त्याचप्रमाणे अग्नितांडवात भस्मसात होत असलेल्या घरांबद्दल आणि होरपळत असलेल्या माणसांबद्दल अग्नीला दु:ख जाणीव नाही किंवा त्याच्या योगानं स्वयंपाक रांधून रोज कोटय़वधी लोकांची पोटं भरत असल्याचा त्याला गर्व नाही. तेव्हा ही पंचमहाभूतं जड-मूढ आहेत, अचेतन आहेत. सचेतन प्राणिमात्रांतही हीच परमात्म शक्ती कार्यक्षमतेसाठी आहे. पण त्या देहाच्या आकार आणि मर्यादेनुसार ती शक्ती प्रकट होते. या प्राणिमात्रांच्या निर्वाहासाठी मग त्या परमात्म्यानं पंचमहाभूतांमध्ये पाच रूपांनी प्रवेश केला. म्हणजेच पृथ्वी या पहिल्या महाभूतात तो गंध रूपानं प्रकटला (‘गंध’ रूपें पै पृथ्वीतें। प्रवेशोनि श्रीअनंते।); जल म्हणजे पाणी तत्त्वात स्वाद रूपानं (‘स्वाद’ रूपें उदकांतें। प्रवेशोनि श्रीअनंतें।); तर तेज तत्त्वात तो रूप याच रूपानं प्रकटला (तेजाचे ठायीं होऊनि ‘रूप’। प्रवेशला हरि सद्रूप।); वायू तत्त्वात तो स्पर्श रूपानं प्रकटला (वायूमाजीं ‘स्पर्श’ योगें। प्रवेशु कीजे श्रीरंगें।); आकाश तत्त्वात तो शब्द रूपानं प्रकटला (‘शब्द’ गुणें हृषीकेश। आकाशीं करी प्रवेश।)! आता या पाचही तत्त्वांत परमात्म शक्तीनंच प्रवेश केल्यानं ही पाचही तत्त्वं परस्परविरोधी अथवा परस्परांसाठी घातक न ठरता परस्परपूरक झाली! कशी? तर, भूमी तत्त्वात परमात्म शक्तीचा निवास असल्यानं ती जळात विरघळली नाही (‘‘पृथ्वीं प्रवेशला भगवंतु। यालागीं ते आवरण-जळांतु। उरलीसे न विरतु। जाण निश्चितु मिथिलेशा।। ८८।। धरा धरी धराधर। यालागीं विरवूं न शके समुद्र। धराधरें पृथ्वी सधर। भूतभार तेणें वाहे।। ८९।।’’). या पृथ्वीचा आणखी एक फार मोठा गुणही अंतरीक्ष सांगतो, तो म्हणजे क्षमा! तो म्हणतो, गंध रूपानं या पृथ्वीत अनंतानं प्रवेश केला.. बघा, जो अनंत आहे ना, त्यानं या मर्यादित आकारमानाच्या पृथ्वीत प्रवेश केला आणि तिच्यात क्षमा हा गुण भरला.

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती