चैतन्य प्रेम

देह आणि मनाला अडकवू शकणाऱ्या इंद्रियगळांपासून साधकानं कसं सावध राहावं, हे सांगितल्यावर अखेरीस नाथ म्हणतात, ‘‘कुटुंब-आहाराकारणें। अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें। ऐसे स्थितीं जें वर्तणें। तें जाणणें शुद्ध वैराग्य।।३७।। ऐसी स्थिती नाहीं ज्यासी। तंव कृष्णप्राप्ती कैंची त्यासी। यालागीं कृष्णभक्तांसी। ऐसी स्थिती असावी।।३८।।’’ याचा शब्दश: अर्थ कुटुंबाच्या आहाराकरता कधी अकल्पित काही मिळाले नाही, तर कोरडी भिक्षा मागून जो पोट भरू शकतो ते शुद्ध वैराग्य आहे. आता इथे मथितार्थ लक्षात घेतला पाहिजे. अध्यात्मबोध हा प्रारब्धातील कर्तव्यांसाठी प्रयत्न टाळायला शिकवत नाही. अर्थात कर्तव्यपूर्तीसाठी काटेकोर प्रयत्न केलेच पाहिजेत. जर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे, तर तीदेखील योग्य रीतीने पार पाडणे हे कर्तव्यच आहे. त्यात कसूर करता कामा नये. त्यासाठी उपजीविकेकरिता जे परिश्रम करायला हवेत, ते केलेच पाहिजेत. पण इथं साधकाच्या आंतरिक जडणघडणीसाठी हा बोध महत्त्वाचा आहे. आता अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्यावरही वाईट परिस्थिती ओढवू शकते आणि तशीच ती या मार्गावर आपण नाही, असे मानणाऱ्यावरही ओढवू शकते. तर अशा वाईट परिस्थितीत साधकानं कसं वागावं, याचा हा बोध आहे. हा बोध सांगतो की त्यानं परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली, तरी विरक्तीचाच अभ्यास करावा.  विरक्तीचा अभ्यास म्हणजे काय? तर, जे मिळेल त्यात समाधानी असणं. याचा अर्थ प्रयत्न करणं थांबवणं नव्हे, पण प्रयत्नांना आसक्तीचं अस्तर नको! दुराग्रहाचा वास नको. वैराग्याचा अर्थ काय, तर अमुकच असावं किंवा अमुकच नसावं, असा दोन्ही टोकाचा दुराग्रह नसावा. इथं आहाराचा उल्लेख आहे. याचा अर्थ खाण्यात अमुकच गोष्ट हवी, असाही आग्रह नको की अमुक खायला आवडतच नाही, असंही नको. थोडक्यात रूचीचे लाड नकोत. अन्न शरीरपोषण आणि रक्षणाकरता आवश्यक आहे. चवीसाठी नाही. म्हणजे कसंतरी रांधून खावं, असही अभिप्रेत नाही. अन्न रांधण्याची प्रक्रिया उत्तमच असली पाहिजे, पण त्याचाही हेतू त्या अन्नाचं पचन लवकर व्हावं, हा असला पाहिजे. अन्न सात्त्विकही असलं पाहिजे. सात्त्विक म्हणजे जे अन्न भगवंताच्या स्मरणात रांधलं जातं ते! आता ‘आहार’ या शब्दाचा व्यापक अर्थही लक्षात घेतला पाहिजे. सर्व इंद्रियांद्वारे जे जग आत घेतलं जातं तो आहारच आहे आणि तो आहारही सात्त्विकतेला धरूनच व्हावा, हे इथं अभिप्रेत आहे. जोवर अशी स्थिती येत नाही, तोवर ‘कृष्णप्राप्ती’ म्हणजेच परमात्मप्राप्ती नाही! आता ‘चिरंजीवपदा’ची ही चर्चा आपण कुठून सुरू केली? तर ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायातील ‘‘त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे। यालागीं देवो त्या पुढें मागें। त्यासभोंवता सर्वागें। भक्तीचेनि पांगें भुलला चाले।।७२५।।’’ या ओवीपासून! जगाची दृष्ट आपल्या भक्ताला लागू नये म्हणून देव त्याच्या मागे-पुढे सर्व बाजूंनी कसा वावरत असतो, हे सांगताना ही ‘दृष्ट लागणं’ म्हणजे काय? तर जगाच्या संगानं जगाचा मोह पुन्हा मनात उद्भवणं, हे आपण पाहिलं. हा मोह जग कसा निर्माण करतं आणि त्यात अडकायचं नसेल, तर विरक्तीचा अभ्यास कोणता आणि तो कसा केला पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी आपण ‘चिरंजीवपद’ पाहिलं. हा अभ्यास आहे आणि तो कठीण आहेच, पण तरीही तो जमेल तितका करीत गेलं पाहिजे.