चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

त्याग, त्याग आणि त्याग-हा साधक जीवनाचा मोठा संस्कार आहे. मनाच्या ओढींचा त्याग, आवडींचा त्याग, स्वार्थाचा त्याग, दुराग्रहाचा त्याग, संकुचितपणाचा त्याग, अविचार व मग कुविचारात वेगानं परिवर्तित होणाऱ्या अतिविचारशीलतेचा त्याग.. असे अनंत त्याग म्हणजेच साधना! त्याची सुरुवात ‘परोपकारा’नं- इतरांसाठीच्या त्यागभावनेनं होते. अवधूत म्हणतो, ‘‘परमार्थाचिया चाडा। स्वार्थ सांडोनि रोकडा। परोपकारार्थ अवघडा। रिघे सांकडा परार्थे।।३८७।।’’ ज्याला परमार्थाची तळमळ आहे, त्यानं सगळा स्वार्थ सांडलाच पाहिजे. परोपकारासाठी अवघड कष्टही सहन केले पाहिजेत. कधी कधी काय होतं की, साधकानं या बोधाचा नेमका अर्थ लक्षात घेतला नाही किंवा या बोधाचा नेमका हेतू लक्षात घेतला नाही; तर – ‘परोपकार’ म्हणजे इतरांसाठी भरमसाट आणि अनावश्यक कष्ट करीत राहणे, ‘परोपकार’ करताना एखाद्याला परावलंबी होण्यास मदत करणे, त्याच्याकडून किमान प्रेमादराच्या परतफेडीची आस बाळगणे; अशा चक्रात अडकून साधनापथापासूनच दूर फेकला जाण्याचा धोका असतो. या ‘परोपकारा’च्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन पातळ्यांवरील दोन अर्थछटा आहेत. जे पारायणापुरतं ‘भागवत’ वाचतात आणि उरलेला वेळ आसक्तीयुक्त ‘मी’ व ‘माझे’च्या चाकोरीतच जगतात, त्यांच्यासाठी स्थूल पातळीवरचा ‘परोपकार’च अभिप्रेत आहे. त्यांच्या वृत्तीला थोडं तरी व्यापक करावं, त्यांच्या मनात दानधर्माची जाणीव थोडी तरी वाढावी, हा हेतू आहे. थोडय़ा थोडय़ा वृत्तीपालटाच्या संस्कारांचं पाणी घातल्याशिवाय अंत:करणातील भक्तीचं बीज अंकुरणारच नाही. ते सडून जाईल. तेव्हा स्थूल पातळीवरचा ‘परोपकार’ हा अवतीभवतीच्या माणसांना जमेल तितकी मदत, अन्नदान, धनदान, वस्त्रदान या रूपांतच अभिप्रेत आहे. पण जो साधनापथावर आहे, त्याच्यासाठी ‘एकनाथी भागवत’च काय, प्रत्येक ग्रंथ हा आत्माभ्यासाचं पुस्तकच आहे! ‘टेक्स्ट बुक’ आहे! पूर्वी एकशिक्षकी शाळा असत. म्हणजे एकाच वर्गात इयत्ता पहिली ते चौथीची मुलं बसत. ते एकच शिक्षक एकाच वेळी सगळ्यांना शिकवत. तसं हे एकग्रंथी शिक्षण आहे. ते समाजाला व्यापक होण्याची शिकवण देता देता साधनापथावरील व्यक्तीला एकाग्र आणि केंद्रित करणारंही आहे! थोडक्यात, जगाकडे विस्तारलेल्या साधकाच्या मनाला ते एका सद्गुरू बोधावर स्थिर करणारं आहे. तेव्हा ‘परोपकार’ या शब्दाचा साधकासाठीचा जो सूक्ष्मार्थ आहे, तो पुन्हा दोन पातळ्यांवरचा आहे. पहिली पातळी अशी की, साधकाची वृत्ती ही इतकी व्यापक होत जाते की त्याची प्रत्येक कृती ही सहज परोपकारी होत जाते. मुख्य म्हणजे त्यात ‘उपकारा’चा भाव नसतोच. अशा साधकाच्या सहवासात जो येतो, त्याच्या चित्तावरही शांततेचे आणि प्रसन्नतेचे संस्कार झाल्याशिवाय राहात नाहीत. यासारखी खरी विलक्षण परसेवा नाही! आता दुसरी सूक्ष्म पातळी कोणती? ती पाहू.