चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तम, मध्यम आणि सामान्य भक्तांची माहिती कवि नारायणानं राजा जनकाला सांगितली. पण तरीही उत्तम भक्तांची महती अजून गायल्यावाचून त्याचं मन भरेना! तो म्हणाला, ‘‘यापरी त्रिविध भक्त। सांगितले भजनयुक्त। परी उत्तमांचीं लक्षणें अद्भुत। तीं सांगावया चित्त उदित माझें।।६५६।।’’ मग तो उत्तम भक्तांची आणखी लक्षणं सांगतो. तो म्हणतो की, हे भक्त जगातल्या इतर लोकांप्रमाणेच संसारातली कर्तव्यं पार पाडत असतात, पण इतर माणसांच्या मनातही जसा संसारच रुतलेला असतो, तशी यांची गत नसते! ‘‘इंद्रियें विषयांतें सेविती। परी सुखदु:ख नुमटे चित्तीं। विषय मिथ्यात्वें देखती। ते जाण निश्चितीं उत्तम भक्त।।६५७।।’’ तेही इंद्रियांद्वारे विषय सेवन करताना दिसतात, पण त्या विषयांच्या ओढीचाच अभाव असल्यानं, त्यांच्या मनात विषयप्राप्तीनुसारचे सुख-दु:खांचे तरंग उमटत नाहीत. इतरांना ते प्रपंच करताना दिसतात, प्रपंचाची उस्तवार करताना दिसतात, पण प्रपंचातला त्यांचा वावर कसा असतो? कवि नारायण फार मार्मिक उपमा योजतो. तो म्हणतो, ‘‘मृगजळीं जेणें केलें स्नान। तो नाहतां कोरडाचि जाण। तेवीं भोगीं ज्यांसी अभोक्तेपण। ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम।।६५८।।’’ मृगजळाचं रूपक एरवी जो मोहभ्रमित आहे त्याच्यासाठी वापरतात, इथं ते उत्तम भक्तासाठी वापरलं गेलं आहे! मिथ्या भ्रामक सुखकल्पनांमागे धावत असलेल्या माणसाला मृगजळामागे धावत असल्याची उपमा देतात. इथं प्रपंचात वावरत असलेला उत्तम भक्त कसा दिसतो, यासाठी हे मृगजळाचं चपखल रूपक आहे! एखादा मृगजळात स्नान करताना दिसावा तसे हे भक्त प्रपंचात दिसतात! ते प्रपंचातली कर्तव्यं पार पाडत असतात, आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. मात्र हे सारं त्यांना मृगजळवत्च वाटत असतं! पाहणाऱ्याला ते स्नान करताना दिसले तरी ते मृगजळाचं स्नान असल्यानं ते कोरडेच असतात. म्हणजेच संसारात असलेल्या या उत्तम भक्तांना संसार चिकटू शकत नाही, जखडू शकत नाही. ते त्यापासून अलिप्तच असतात. भोगांत असूनही ते अभोक्ते असतात. मग प्रश्न असा की, मुळात ते विषयप्रपंचात येतातच का? कवि सांगतो, ‘‘येथवरी मिथ्या विषयभान। तरी सेवावया त्यांसी काय कारण। येथ प्रारब्ध बळी पूर्ण। तें अवश्य जाण भोगवी।।६६१।। परी मी एक विषयभोक्ता। ही स्वप्नींही त्यास नमुटे कथा। यालागीं उत्तम भागवतता। त्यासीच तत्त्वतां बाणली।।६६२।।’’ विषयभान जर मिथ्या असेल, तर ते त्यांनी का भोगावे? तर याचं उत्तर एकच, प्रारब्ध मोठं बलवत्तर असतं व त्यायोगेच त्यांनाही प्रपंचात कर्तव्यरत राहावं लागतं. पण तरीही त्यांच्या मनात कर्ताभाव आणि भोक्ताभाव कधीच, अगदी स्वप्नातही येत नाही. म्हणून भागवत धर्म त्यांच्यातच खरा बाणला आहे, हे निश्चित!

Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number 165 zws
First published on: 23-08-2019 at 03:17 IST