चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवंतावर ज्याची निरपेक्ष भक्ती जडते, सख्य जडतं त्याची अखेरची परीक्षा भगवंत पाहतो, ती त्याच्या आंतरिक ओढीची! त्याची जगाकडे किती आंतरिक ओढ आहे? जगाची आस किती शिल्लक आहे? याची ती परीक्षा असते. आता मागेच म्हटल्याप्रमाणे हे ‘जग’ म्हणजे तरी काय? तर प्रारब्धानुसार आपल्याला लाभलेले आप्त आणि मनानुसार आपण जोडेलेले नवे आप्त-मित्र परिवार. यापलीकडे आपलं जग नाही आणि जन्मोजन्मी याच जगात आपला जो आसक्त वावर असतो त्यातूनच जुनं प्रारब्ध भोगता भोगता नवं प्रारब्धही तयार होत असतं. हे प्रारब्धभोग भोगत आपले अनंत जन्मं सरत असतात. जोवर या जगाची आस सुटत नाही, तोवर या जगाकडून  असलेल्या अपेक्षा  ओसरत नाहीत. जोवर जगाकडून अपेक्षा असतात तोवर जगाशी असलेला व्यवहार हा मोहग्रस्तच असतो. जेव्हा ही आस, अपेक्षा सुटते तेव्हा आसक्तीचं मूळ असलेला मोहही सुटतो. मग कर्तव्य तेवढं केलं जातं. पण जोवर आसक्ती असते तोवर कर्तव्यपूर्तीपेक्षा मोह आणि भ्रमयुक्त इच्छापूर्तीवरच भर असतो. त्यामुळे या जगाची आस सुटावी लागते. नीट लक्षात घ्या, जग सुटावं लागत नाही, जगातली कर्तव्यं सुटावी लागत नाहीत, केवळ आस सुटावी लागते! आणि म्हणूनच भक्ताची मोठी परीक्षा भगवंत पाहतो ती त्याची जगाकडे किती आस शिल्लक आहे, हीच! आता जगाची आसक्ती ओसरली, असं वाटलं तरी सूक्ष्म रूपानं ती अगदी खोलवर जिवंतच असते. मनातून जगाची आसक्ती गेली आहे, असं ज्या भक्ताला वाटतं त्याला वेगळ्या रूपात येऊन तीच आसक्ती कशी चिकटते आणि तो तिच्या पकडीत कसा अडकू शकतो, याचं फार सुरेख वर्णन नाथांनीच ‘चिरंजीव पदा’त केलं आहे. पद अगदी लहानसं म्हणजे ४९ ओव्यांचं आहे, पण त्यावर वर्षभर लिहिता येईल इतकं ते अर्थगर्भ आहे. आपण मात्र अगदी त्रोटकपणे, या मुद्दय़ापुरतं ते पाहू. तर, जो भक्तीत रंगून गेला असतो त्याचा स्वभाव अतिशय निर्मळ बनत असतो. त्यामुळे तो सदाप्रसन्न असतो. त्या प्रसन्नतेचे, त्याच्या शांतरसानं ओतप्रोत चित्ताचे संस्कार त्याच्या सहवासात आलेल्यांवर कमी-अधिक प्रमाणात होतात आणि म्हणून जगालाही तो हवासा वाटतो. मग हे जग आधी या भक्ताला प्रेमानं चिकटण्याचा प्रयत्न करतं आणि नंतर त्या भक्ताच्या मनात अत्यंत सूक्ष्म रूपात उरलेला मोह जागा करतं! या वेळी कसं सावध राहीलं पाहिजे आणि या मोहापासून स्वत:ला आणि हृदयातील भक्तिभावाला कसं सांभाळलं पाहिजे, याचा बोध या पदात आहे. आता हे जे चिरंजीव पद म्हणजे काय हो? तर अविनाशी आत्मसुखाच्या प्राप्तीनं लाभणारं मोक्षपद! ज्याला हे पद हवं आहे त्याच्यासाठी ‘किंचित बोलू निश्चयेसीं,’ अशी सुरुवात करीत नाथ म्हणतात, हे पद हवं आहे ना?म् मग, ‘‘येथें मुख्य पाहिजे अनुताप। त्या अनुतापाचें कैसें रूप। नित्य मरण जाणे समीप। न मनी अल्प देहसुख।।२।।’’ ज्याला खरी मुक्तस्थिती हवी आहे ना, त्यानं कल्पनाबंधातून मोकळं झालं पाहिजे. त्यासाठी मुख्य ‘अनुताप’ हवा. हा अनुताप कसा आहे? तर तो देहाची नश्वरता पूर्णत्वानं ओळखतो आणि नुसती ओळखत नाही, तर क्षणोक्षणी ती त्याच्या स्मरणात असते. आजवर या नश्वर देहातून ईश्वराकडे जाण्याची संधी आपण किती वाया दवडली, या जाणिवेनं त्याचं अंत:करण दग्ध होतं. मग उरलेलं आयुष्य वाया दवडायचं नाही, असा निश्चयही होतो.

Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number
First published on: 04-09-2019 at 04:15 IST