चैतन्य प्रेम

जगाचं भ्रामक रूप आपल्यालाही उमगतं. हे जग अनंत ‘मी’केंद्रित माणसांचं असल्यानं आणि जो-तो स्वत:च्याच स्वार्थाच्या पूर्तीसाठी प्रयत्नरत असल्यानं ते सदोदित एकाच माणसाच्या मनाजोगतं राहू शकत नाही, हेही आपल्याला समजून चुकतं. तरीही त्या जगाचा आधार काही मनातून सुटत नाही. एक लक्षात घ्या, जगाचा आधार सोडायचा आहे, याचा अर्थ जग सोडायचं नाही. तर त्या जगावर जे मनानं विसंबणं आहे, भावनिकदृष्टय़ा जे अवलंबणं आहे, ते थांबवायचं आहे. जगावर आपण प्रेमच करायला शिकायचं आहे, जगातल्या आपल्या परीघातल्या माणसांबद्दल जी जी कर्तव्यं आहेत ती कसोशीनं पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्नही करायचा आहे, समाजासाठी आपल्या परीनं जे काही चांगलं करता येईल, तेही करायचं आहे; पण हे सर्व करीत असताना जे केलं त्याच्या मोबदल्याच्या अपेक्षेत अडकण्याच्या सवयीतून सुटायचंही आहे. कारण अपेक्षा ठेवणं म्हणजे इच्छा बाळगणं आणि तिच्या पूर्तीसाठी मनानं ताटकळणं आहे. असं मनानं कुठंच अडकून पडण्यात आपलं खरं हित नाही. त्यात मनाच्या आणि शरीराच्या शक्तीचाही अपव्यय आहे. आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे, साधनाभ्यासासाठी जी काळाची मुदत मिळाली आहे, तिचाही तो अपव्यय आहे. तेव्हा जगाच्या प्रभावातून सुटायचं असेल, तर जो स्वत: जगन्मोहात अडकलेला नाही, जगाच्या लौकिकात अडकलेला नाही, जगाकडून स्तुती व्हावी, मान मिळावा, या अपेक्षेत अडकलेला नाही, त्याच्याकडेच जावं लागेल. जो स्वत: मुक्त आहे, तोच मला बंधनातून सोडवू शकतो. जो परमात्म प्रेमात लीन आहे तोच माझ्यावर भगवंताच्या प्रेमाचे संस्कार करू शकतो. हा जो परमात्ममय सत्पुरुष आहे तोच सद्गुरू. तोच हरी आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत की, तुम्ही समस्येपासून अलिप्त असाल, तर तुम्ही त्या समस्येची कारणं नेमकेपणानं जाणू शकता आणि मग ती दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्याप्रमाणे तो जगन्मोहातून मुक्त असल्यानं मी नेमक्या कोणत्या मोहात अडकलो आहे, हे तोच जाणू शकतो. एकाला दारुचं फार व्यसन होतं आणि त्याच्या मित्रानं सदगुरुंकडे त्याच्या या व्यसनाची तक्रार केली. सदगुरू आज्ञेनुसार मग त्या माणसानं दारुच्या व्यसनापासून दूर होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यात त्याला यशही आलं. पण असं पहा, दारुचं व्यसन जगाला दिसतं, पण आपल्या मनात अशी अनेक ‘व्यसनं’ असतात जी जगाला दिसत नाहीत! ही ‘व्यसनं’ केवळ सदगुरू जाणतो आणि त्यातून आपल्याला दूर करीत असतो. कुणाला लौकिकाचं व्यसन असतं, कुणाला लोकांकडून स्तुती व्हावी, मान मिळावा, याचं व्यसन असतं. आणि ही व्यसनंसुद्धा दारुइतकीच वाईट असतात, बरं का! कारण ती मनाचा निकोपपणाच हिरावून घेतात. आपल्याव्यतिरिक्त इतरांना मान मिळत असेल, तर त्यांच्याबाबतच्या द्वेष आणि मत्सराचं विष मनात भिनवतात. तेव्हा हा सदगुरूच भगवंताचं होण्याची कला शिकवत असतो. भगवंताचं होणं म्हणजे तरी काय हो? तर संकुचित ‘मी’मध्ये देहबुद्धीनं अडकलेल्या जिवाला व्यापक अशा ‘तू’मध्ये देवबुद्धीनं गोवून मनानं मुक्त करणं! ज्या ज्या गोष्टींना मी आजन्म माझेपणानं चिकटत होतो, त्यांची मालकी भगवंताकडे सोपवून आपण निमित्तमात्र राहून कर्तव्य तेवढी पार पाडण्याची कला हा सद्गुरू शिकवत असतो. कारण मुक्त होण्याआड ‘मी’चाच केवळ अडथळा आहे!