बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू विस्मृतीत गेल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती एबोला या आजाराची. चार आफ्रिकी देशांत त्याचा फैलाव झाल्याचं नक्की झालंय. या ठिकाणी मोठय़ा संख्येने भारतीय असल्याने आपल्यालाही काळजी घेण्याची सूचना अमेरिकेच्या पुढाकाराने अनेकांनी केली आहे. अशा आजारांच्या नवनव्या लाटा येतच असतात. त्यातून  एखाद्या  नव्या औषधाचा बोलबाला होईलही कदाचित.. बलाढय़ औषध कंपन्यांचे भले करण्यासाठी !
आफ्रिकेतल्या तीन-चार देशांत आता मोठय़ा प्रमाणावर माकडं, डुकरं यांची कत्तल होईल. एबोला नावाचा नवा आजार आलाय ना आता. जवळपास हजार जण गेलेत त्या साथीत. माकडं, डुकरं हे या आजाराचे सर्वात मोठे विषाणूवाहक असतात, पण एकदा का ते माणसाच्या शरीरात शिरले की मग ते शारीरिक संबंध, रक्त यांच्यातूनच एकमेकांत पसरतात. एखाद्याच्या शरीरात ते शिरले की लगेच तो आजार होतोच असं नाही. साधारण दहा-पंधरा दिवसांनी आजाराची लक्षणं दिसू लागतात. साधीच असतात तशी ती. ताप. अंगदुखी. अन्नावरची वासना जाणं. कधी कधी उलटय़ा आणि फारच तो बळावला तर थेट रक्ताच्याच उलटय़ा. अगदी मग डोळय़ा-नाकातनंदेखील रक्तस्राव. या आजाराची पंचाईत अशी की सुरुवातीला त्याची सगळी लक्षणं ही साधा हिवताप, पटकी वगैरेसारखीच असतात. त्यामुळे या आजारापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा इतर आजार नाहीत ना.. हे नक्की करावं लागतं आणि पंचाईत ही की हा आजार आहे हे सिद्ध झालं तरी त्यावर म्हणून असा खास काहीच उपाय नाही. सारखं लिंबूपाणी पाजायचं, या रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवायचं, आराम करायला लावायचा.. इतकंच आणि या रुग्णावर करायचे नवनव्या औषधांचे प्रयोग.    
चार आफ्रिकी देशांत त्याचा फैलाव झाल्याचं नक्की झालंय. सिएरा लिओन, लायबेरिया, पापुआ न्यू गिनी आणि नायजेरिया. या देशांत तो प्रामुख्यानं पसरलाय. या चार देशांत मिळून जवळपास ४५ हजार भारतीय आहेत. त्यामुळे भारतानंही काळजी घ्यायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक देशांनी बजावलंय. अमेरिका विशेष आघाडीवर आहे हे धोक्याचे इशारे देण्यात. साहजिकच आहे ते..
बरोबर नऊ वर्षांपूर्वी, म्हणजे २००५ साली, अमेरिकेचे तेव्हाचे थोरथोर अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी असंच एका आजाराच्या साथीचं भाकीत वर्तवलं होतं. २००१ सालचं ९/११ घडल्यानंतर बुश यांना नाही म्हटलं तरी खर्च करायची सवय झालीच होती. ९/११ नंतर अफगाणिस्तानवर हल्ला. २००३ साली मार्च महिन्यात इराकच्या सद्दामविरोधात चढाई. अमेरिकेने आपली तिजोरी खुलीच केली होती या सगळय़ासाठी आणि त्यानंतर २००५ साली या नव्या आजार प्रतिबंधाचा खर्च. किती रक्कम मंजूर केली होती बुश यांनी या नव्या आजाराच्या मुकाबल्यासाठी? तब्बल ७१० कोटी डॉलर. खरं तर हा आजारही तसा काही विशेष नव्हता. ताप वगैरे नेहमीचंच. आता एबोलाची लक्षणं आहेत तशीच त्याचीही. फरक इतकाच की एबोला माकडं, डुकरं यांच्यामार्फत पसरतो. तर त्या वेळच्या आजाराला पसरण्यासाठी कोंबडय़ा, बदकं यांची गरज लागायची. या आजारानं जगात हजारो जणं दगावतील अशी भीती त्या वेळी अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे रोखायलाच हवा त्याचा प्रसार. ती ताकद अमेरिकावगळता दुसऱ्या कोणाकडे कशी काय असणार?
जगातल्या एकमेव महासत्तेचे प्रमुख म्हणून जगाच्या आरोग्याची काळजीदेखील अमेरिकी अध्यक्षांना वाहायची असते. त्यामुळे त्यांनी या आजाराला रोखणारी लस तयार करायचा आदेश दिला.    
एकच कंपनी तर होती या आजारावरचं औषध बनवणारी. जिलाद लाइफ सायन्सेस नावाची. फार काही काम नव्हतं तिला २००५ सालापर्यंत. २००४ सालातली तिची एकूण उलाढाल होती पंचवीसेक कोटी डॉलरच्या आसपास. या कंपनीच्या औषधाचं नाव टॅमी फ्लू. हे एकच उत्पादन होतं या कंपनीचं. पण २००४ सालापर्यंत त्याला काही उठावच नव्हता. कारण ते औषध लागू पडेल असा आजारच नव्हता. मग कंपनीला हवा तो आजार आला. त्याचं नाव बर्ड फ्लू. बुश यांना दृष्टान्त झाल्यानुसार २००५ साली या कंपनीचं औषध घ्यावं लागेल असा बर्ड फ्लू चांगलाच पसरला. शेवटी महासत्ता प्रमुखाची इच्छा नियतीलादेखील मानावीच लागते ना. मग टॅमी फ्लूची मागणी इतकी वाढली, इतकी वाढली की कंपनीला दिवसरात्र काम करावं लागलं. साहजिकच नफा धो धो मिळायला लागला. त्या एकाच वर्षांत कंपनीचा महसूल चार पटींनी वाढून १०० कोटी डॉलरचा टप्पा पार करून गेला. तेव्हा अर्थातच या कंपनीच्या संचालकांनीही बक्कळ डॉलर कमावले.
 या संचालकांचा म्होरक्या म्हणजे अमेरिकेचे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड. बुश यांच्या या विश्वासू सहकाऱ्याची जिलाद लाइफ सायन्सेसवर मजबूत पकड होती. १९८८ पासून ते या कंपनीशी संबंधित होते. पण या नव्या आजारामुळे फायदा झालेले बुश यांच्या मंत्रिमंडळातले ते काही एकटेच मंत्री नव्हते. जॉर्ज शुल्ट्झ यांचं नाव आठवतंय? अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री. त्यांचीही मालकी होती या कंपनीत. झालंच तर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर पीट विल्सन यांचाही वाटा होता त्यात. तेव्हा इतका मोठा आजार यायला, या कंपनीच्या उत्पादनाला प्रचंड मागणी यायला आणि या सगळय़ांच्या नफ्यात घसघशीत वाढ व्हायला.. हे सगळं एकाच वेळी झालं. तो योगायोगच म्हणायचा. मोठय़ांचे योगायोगही मोठेच असतात. आपल्याकडे नाही का सोनिया गांधी यांच्या जावयालाच बरोबर एखादी कंपनी भूखंडच्या भूखंड देते. तसंच हे. हे असं होतच असतं. या एका आजारातनं रम्सफेल्ड यांनी एकटय़ानी तब्बल अडीच कोटी डॉलर कमावले. झालंच तर शुल्ट्झ यांची कमाई होती ७० लाख डॉलर इतकी.     
आणखी एक योगायोग यात खूप महत्त्वाचा आहे. या दोघांनी उत्तम फायदा कमावून झाल्यावर या आजाराची तीव्रताही कमी झाली. तोपर्यंत जगात इतकं भीतीचं वातावरण होतं की गावोगाव कोंबडी मारली जात होती, लोकतोंडावर फडकी गुंडाळून वावरू लागली होती आणि गावोगावच्या औषधाच्या दुकानांतून टॅमी फ्लूच्या गोळय़ा रग्गड खपत होत्या. तेव्हा या कंपनीचा जीव फायद्यामुळे गुदमरायची वेळ आली. भरपेट नफा कमावून झाल्यावर या आजाराची भीती संपली आणि आता तर बर्ड फ्लूला कोणीही घाबरत नाही.
यात आणखी एक बाब महत्त्वाची आहे. ती कळल्यावर धक्काच बसेल अनेकांना.    
 बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू या आजारांवर दिलं जाणारं टॅमी फ्लू हे औषध कशापासून बनतं?
बडीशेप. आपल्याकडे जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून, पचनाला मदत म्हणून सर्रास खाल्ली जाते त्या बडीशेपेपासनं हे औषध बनतं. पण हे अर्थातच भारतीयांना माहीत नव्हतं. त्यामुळे ते बिचारे टॅमी फ्लू मिळावं यासाठी रात्र रात्र रांगा लावत होते आणि कंपनीची धन करत होते.
यातला पुढचा भाग हा त्याहून महत्त्वाचा. तो असा की जगात बडिशेपेच्या शास्त्रशुद्ध लागवडीवर एकाच कंपनीची जवळपास ९० टक्के इतकी मालकी आहे. ती कंपनी म्हणजे रोश. तीच ती औषध निर्मिती क्षेत्रातली बलाढय़ स्विस कंपनी. टॅमी फ्लू या औषधावर नंतर तिचीच मालकी झाली. हे झालं या औषध कंपनीचं.
पण या नव्या आजाराबाबत एक योगायोग महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि हा नवा एबोला या तीनही आजारातली बरीचशी लक्षणं सारखीच आहेत.
तेव्हा समजून घ्यायचं ते हेच की या अशा आजारांच्या नवनव्या लाटा येतच असतात. सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्स नावाचा असाच एक आजार मध्यंतरी आला होता. गंमत ही की त्याची प्राथमिक लक्षणं ही वर उल्लेखलेल्या तीनही आजारांसारखीच होती. तो आला तसाच गेलाही. जाता जाता अर्थातच औषध कंपन्यांचं भलं करून गेला.
हे असे आजार आले नाहीत तर या बिचाऱ्या कंपन्यांना  कोण विचारणार? रस्त्यावरचे खड्डे जसे कंत्राटदारांच्या पोटापाण्यासाठी आवश्यक असतात तसंच नवनव्या साथींमुळे आरोग्याला पडणारे खड्डे या बलाढय़ औषध कंपन्यांच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असतात. आता काहींना शंका येईल की रस्त्यावरचे खड्डे पडावेत याची जशी एक व्यवस्था असते तशीच अशा वेगवेगळय़ा आजारांच्या साथी याव्यात अशीपण व्यवस्था असते की काय?
या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं समजून घ्यायचं. म्हणून तर ‘साथी’ हाथ बढाना.. हे औषध कंपन्यांचं आवडतं गाणं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epidemic diseases help out medicine companies
First published on: 09-08-2014 at 05:38 IST