मी स्वत:ला एक सामान्य माणूस समजतो. मी एका दिग्गज कवीचा मुलगा आहे आणि त्यांच्याकडून जे काही मला मिळाले ते वहिवाटीने मिळाले आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, कारण मी अशा कुटुंबात जन्मलो, जेथे मला घडण्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध होत्या. त्यामुळे सचिन तेंडुलकर किंवा मी कवीचे पुत्र आहोत म्हणून मोठे आहेत, असे म्हणणे योग्य नाही. कारण या देशात जितके कवी असतील, त्यांची मुलेही मग भलताच विचार करू लागतील.

अमिताभ बच्चन म्हणजे मनोरंजनाच्या बदलत्या दुनियेतली जिवंत दंतकथा.. गेली ५० वर्षे रुपेरी पडद्यापासून ते छोटय़ा पडद्यापर्यंत अधिराज्य गाजवणारा हा तारा येत्या ११ तारखेला आपल्या वयाची ८० वर्षे पूर्ण करतो आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा तडफेने काम करणाऱ्या या अभिनेत्याचे स्वत:च्या आयुष्याबद्दल दहा वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्ये केलेले हे सिंहावलोकन आज तरी कालबाह्य कसे असेल?

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

‘लोकसत्ता’च्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त १२ जानेवारी २०१२ रोजीच्या विशेषांकाचे अतिथी संपादकपद अमिताभ बच्चन यांनी भूषविले होते. त्यावेळी ‘लोकसत्ता’मधील सहकाऱ्यांशी झालेल्या गप्पांचा आधार या मजकुरास आहे. छबी किंवा इमेज या शब्दाचा मी तिरस्कार करतो. कुठल्याही अभिनेत्याची एखादी विशिष्ट प्रतिमा व्हावी असं मला अजिबातच वाटत नाही. लोक म्हणतात, असं व्हायला हवं. मला तसं वाटत नाही. मला जे काम मिळेल, ते योग्य पद्धतीने केलं जावं याकडे माझं लक्ष असतं. एखादी प्रतिमा कलाकाराची बनलीच, तर ती त्याची सर्वात मोठी दुर्बलता ठरते. तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारचंच काम करू शकाल, दुसरं करूच शकणार नाही. चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो, तेव्हा प्रेक्षक असा विचार करून जातात की, हा शाहरूख खानचा सिनेमा आहे, यात प्रेमकथा असणार. हा सलमान खानचा चित्रपट आहे, यात हाणामारी असणार. यातून मग लोकांच्या अपेक्षा एकसुरी होऊ लागतात.

पडद्यावर तुम्ही मला किती तरी अशक्य गोष्टी करताना पाहिलं असेल. वीस जणांना मारताना, धावताना किंवा काहीही भन्नाट करताना, जे प्रत्यक्ष जीवनात मी कधीच करू शकत नाही. समाज तुमच्या कामाच्या दर्जावरून तुमच्याविषयी मत बनवतो. तुम्ही काही चूक करीत असाल, तर ते तुम्हाला मानणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला बदलणं गरजेचं असतं. हॉलीवूडमध्ये जॉन वेन यांना त्यांच्या सिनेमातील कामामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती असलेल्या वलयामुळे अमेरिकेचे राष्ट्रीय प्रतीक समजले जाई. पण कुठल्याही सिनेमामधील दृश्यांत ते घोडय़ावरून उतरायला तयार नसत. लोकांनाही त्यांना तसंच पाहायला आवडे. त्यामुळे आपण कसं राहायचं, कोणती प्रतिमा निर्माण करायची, ही व्यक्तिसापेक्ष बाब असते. आपल्याकडे जशी वलयाबाबत जेवढी विचित्र परिस्थिती आहे, ती जगात सगळीकडेच आहे.

मला वाटतं, की आजकाल लोक असं म्हणतच नाहीत, की हे कॅरेक्टर वाईट माणसाचं आहे तरी याचा एवढा उदोउदो का होत आहे? लोक आज हेच पाहतात, की सिनेमात किती नाच आहे, किती गाणी आहेत.. त्याने लोक जास्त प्रभावित होत आहेत. आजच्या सिनेमात पश्चिमेकडून आलेल्या मूल्यांचा परिणाम दिसत आहे. तेही माहिती-प्रसारण वाढल्यामुळे. आज आपल्याकडे ४०० दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. जगभरात इतक्या कुठेही नाहीत आणि त्यांची वाढ आपल्याकडं ज्या झपाटय़ाने झाली आहे, तसं दुसरं उदाहरणही जगभरात अन्य कुठं पाहायला मिळणार नाही. शिवाय जेवढय़ा संख्येने लोक या वाहिन्या पाहतात, तसं उदाहरणही अन्यत्र कुठं सापडणार नाही. त्यांच्याकडं एखाद्या कार्यक्रमाला ८०-९० लाख प्रेक्षक मिळाले, की श्ॉम्पेनची बाटली फोडून आनंदोत्सव केला जातो. आपल्याकडं एकटय़ा वांद्र्यात तेवढे प्रेक्षक आहेत. त्यांचा विश्वासच बसत नाही. आमचा एकेक कार्यक्रम तीन कोटी लोक पाहतात, असं सांगितलं, तर ते खुर्चीतून कोसळायचेच बाकी राहतात. त्यांना हे समजतच नाही. तर ज्या गोष्टींसाठी आमच्यावर टीका केली जात होती, की तुमच्याकडे लोकसंख्या खूप आहे, ती नियंत्रणात आणा, तीच गोष्ट आज त्यांच्यासाठी फायद्याची ठरायला लागली आहे. त्यामुळे आता ते त्याचा उच्चारही करत नाहीत. कारण आता हे सगळे ग्राहक झालेत!

चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही दोन्ही माध्यमे वेगवेगळी आहेत. सिनेमात मी जे नाही तेच इथे दाखवत आलो आहे. ‘केबीसी’मध्ये मी जो आहे तोच दिसतो, हा फरक आहे. मी जसा बोलतो, व्यवहार करतो, तसाच येथे देशासमोर दिसतो. यातून दोन-तीन गोष्टी साध्य झाल्या. लोकांना मी नक्की कसा आहे ते समजू शकलो. अन्यथा लोकांना पडद्यावर मी जसा आहे, तसाच वैयक्तिक आयुष्यातदेखील आहे असं वाटलं असतं. काही वर्षांपूर्वी एका मोठय़ा वाहतूक कोंडीमध्ये मी अडकलो होतो. अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच ठिकाणी होतो. शेजारच्या गाडीमधील एका माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही जरा उतरून दोन लाथा हाणा, मग बघा कशी वाहतूक कोंडी सुटेल. अशा प्रकारच्या प्रतिमा लोकांच्या मनात बनलेल्या असतात. त्या बदलणं गरजेचं असतं.

‘कौन बनेगा करोडपती’ ज्या पद्धतीने सादर केले गेले आणि त्याचा प्रचार केला गेला ते महत्त्वाचं होतं. ‘केबीसी’ हे माझ्यासाठी नव्या पद्धतीचं काम होतं. यापूर्वी छोटय़ा पडद्यावर कधी काम केलं नव्हतं. जोखीम तशी सगळय़ाच बाबत असते. यातही होती. खूप लोकांना असं वाटलं की हे योग्य नाही. पण मी करून दाखविलं. त्यात मी टीव्हीची प्रतिमा उंचावली नाही, तर त्या खेळाने वाढविली. चित्रउद्योगातील ‘कॉर्पोरेटायझेशन’ची सुरुवात मीच केली होती. मात्र दुर्दैव हे की, मला ते तेव्हा योग्य पद्धतीने चालवता आले नाही. त्याचे फायदे नक्कीच खूप आहेत. पैशांची जी गरज आम्हाला निर्मितीसाठी लागत होती, ती आज पूर्ण होते. ‘कॉर्पोरेटायझेशन’ ही अशी एक संघटित बाब आहे, बाजाराचे संशोधन करून आपली भूमिका ठरवते. व्यवस्थित जाहिरात करते. निर्मितीतल्या अनेक बाबींचा योग्य रीतीने अभ्यास करते. त्याचा खूप फायदा चित्रपटाला होतो.

पूर्वी स्टुडिओंची एक परंपरा होती, ज्यात लोक एकनिष्ठ राहून काम करीत असत. नंतरच्या दशकात ‘स्टार व्हॅल्यू’ वाढली आणि ही परंपराच बदलली. हेच पाश्चिमात्य देशांतही सारख्याच प्रमाणात झाले. स्टुडिओ पद्धती सुरू झाली. काही काळ चालली आणि नंतर कलाकार हा स्टुडिओपेक्षा मोठा होत गेला. आता तर तेथील सर्व स्टुडिओ तोटय़ात गेले आहेत. आता लोकांकडे वेळच नाही. आजच्या कुठल्याही सिनेमाची १९७० च्या दशकातील सिनेमाशी तुलना करा. दोन्ही सिनेमा पाहताना त्यातील ‘एडिटिंग कट्स’ची संख्या मोजा. आजच्या सिनेमात ते हजारांच्या संख्येने असतील, तर तेव्हाच्या सिनेमात जेमतेम दोनशे कट्स सापडतील. तेव्हा सिनेमातील कथा निवेदन अगदीच संथगतीने चाले. कॅमेरा भरपूर वेळ सुरू असे. आता तुम्ही थोडा जरी अधिक वेळ कॅमेरा सुरू ठेवला, तर प्रेक्षक वैतागतात. सिनेमा सुरू असतानाच प्रेक्षकांचे लक्ष आपल्या मोबाइलवर असते. दृश्य सुरू असताना, तेवढय़ाच वेळात प्रेक्षक मेसेज पाठवेल, कुणाशी तरी बोलेल. सिनेमा कसा वाईट पद्धतीने चाललाय, याची शेरेबाजी करेल. तो भलत्याच ठिकाणी गुंतलेला असेल. सिनेमा सुरू असताना पॉपकॉर्न सुरू.. फोनवर बोलणे सुरू.. आणि सिनेमा कुठे चाललाय याची माहिती नाही. प्रत्येक जण आज तंत्रज्ञानामुळे बहुद्योगी बनला आहे. हे वाईट आहे की चांगले आहे हे मी नाही सांगू शकणार. ‘मल्टिटास्किंग’मुळे आज लोक खरोखरच सिनेमाशी एकरूप होऊ शकत नाहीत. पण त्यांना गुंतवून टाकणारा सिनेमा तुम्ही बनवलात तर ते त्यात रस घेतील. मग त्यांचे लक्ष इतर गोष्टींकडे जाऊ शकणार नाही.