सुनिल कांबळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश माध्यमांनी बोरिस जॉन्सन यांना आरसा दाखवत त्यांना पायउतार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. माध्यम स्वातंत्र्याचा हा आविष्कार सुखावणारा आहे.

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. लंडन ऑलिम्पिकच्या जाहिरातबाजीनिमित्त या शहराचे तत्कालीन महापौर बोरिस जॉन्सन यांची छबी सर्वत्र झळकत होती. ब्रिटनला पहिले सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांनी ऑलिम्पिक पार्कमध्ये ‘झिप वायर’ने जायचे ठरवले. मध्येच तांत्रिक बिघाड झाला आणि ते १५० फुटांवर हवेत अडकले. दहा मिनिटे त्यांची  लटकंती झाल्याने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. पण, जॉन्सन यांनी ‘‘किती मजेशीर आहे हे. तुम्ही, दोरी किंवा शिडी आणून देता का?’’ असा प्रश्न विचारून वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती प्रतिकूल असताना ती अनुकूल करण्याचे कसब फक्त जॉन्सन यांच्याकडेच आहे, असे कौतुकोद्गार वगैरे त्यावेळी अनेकांनी काढले.

 हा प्रसंग आठवायची कारणे दोन. आता त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पण, ‘गिरे तो भी टांग उपर’ या उक्तीप्रमाणे जॉन्सन यांनी अनेक वादांत अडकूनही वेळ मारून नेत पंतप्रधानपदाला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला. दुसरे कारण म्हणजे, बहुतांश ब्रिटिश माध्यमांनी जॉन्सन यांचे ‘रोप वायर’वर लटकलेले छायाचित्र वापरून शेलक्या विशेषणांनी धारदार टीका केली आहे. त्यात लख्खपणे उठून दिसणारे छायाचित्र आहे ‘द इकॉनॉमिस्ट’च्या अमेरिकी आवृत्तीचे. दोरी तुटल्याने जॉन्सन खाली कोसळत आहेत, असे दर्शवणाऱ्या मुखपृष्ठचित्राबरोबर शीर्षक आहे, ‘क्लाऊनफॉल.’ पंतप्रधानपदाची दोरी तुटलेल्या बोरिस महाशयांच्या एका हातातून ब्रिटिश ध्वज सुटला तरी दुसऱ्या हातात तो शाबूत आहे. ते अद्यापही काळजीवाहू पंतप्रधान असल्याचे त्यातून सूचित करण्यात आले आहे. ‘‘ब्रिटनचे प्रश्न केवळ खांदेपालटाने मिटणारे नाहीत. हे वास्तव सत्ताधारी हुजूर पक्षाने लक्षात घेतले नाही तर ब्रिटनचे सामाजिक, आर्थिक प्रश्न आणखी बिकट बनतील,’’ असा इशारा या ‘द इकॉनॉमिस्ट’ने मुख्य लेखात दिला आहे. सत्तेवर आल्यानंतर बढाया मारण्यातच जॉन्सन यांना अधिक स्वारस्य असल्याचे दिसले. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची प्रगती जगाला हेवा वाटावा अशी आहे, असे ते अनेकदा म्हणाले. पण, प्रत्यक्षात जी-७ देशांमध्ये सर्वाधिक महागाई दर ब्रिटनमध्ये आहे. वार्षिक विकास दर घसरला आहे. उत्पादकता १५ वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. शिवाय, २०२३ मध्ये ब्रिटनचा विकासदर जी-७ गटातील देशांमध्ये सर्वात कमी असेल, असे भाकीत अनेक संस्थांनी वर्तवले आहे, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. थोडक्यात, ब्रिटनची आर्थिक स्थिती बिघडली आहे. चालू खात्यातील तूट वाढत आहे आणि कर्जावरील व्याज वाढत चालले आहे. नव्या सरकारने वास्तवाचे भान ठेवले नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल, असा इशारा या लेखात देण्यात आला आहे.

‘जॉन्सनकाळाने मागे सोडलेले अवशेष’, या शीर्षकाच्या लेखात त्यांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा  आहे. आता जॉन्सन गेले. पण त्यांनी केलेले नुकसान भरून काढण्याची काही योजना हुजूर पक्षाकडे नाही, असे निरीक्षण हा लेख नोंदवतो. ‘जॉन्सन यांचा विषारीपणा’ या शीर्षकाच्या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परखड भाष्य आहे. जॉन्सन हे खोटारडे आणि बेशिस्त आहेत, हे पंतप्रधान होण्याआधीच स्पष्ट होते. ते लंडनचे महापौर असल्यापासूनच ही बाब लपून राहिली नव्हती. उच्चपदस्थ राजकारण्याचा विषारीपणा हा  संपूर्ण राजकीय व्यवस्थेला कीड लागल्याचे  निदर्शक असतो. पंतप्रधान हे सरकारी यंत्रणेच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे या पदावर बसलेली व्यक्ती विषारी असेल तर ते हळूहळू यंत्रणेत पसरू लागते, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.  हुजूर पक्षाच्या नव्या नेत्याच्या निवडीपर्यंत जॉन्सन काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. मात्र, त्यांच्याकडून हा कार्यभारही काढून घ्यायला हवा, असा ‘द इकॉनॉमिस्ट’चा सूर आहे.

‘द इंडिपेंडंट’ने तर जॉन्सन यांनी काही महिने काळजीवाहू पंतप्रधानपदी म्हणून राहणे, हेच काळजीचे कारण असल्याचे म्हटले आहे. कठीण परिस्थितीत पंतप्रधान बदलणे ही मोठी चूक होऊ शकेल, हे जॉन्सन महाशय म्हणतात. पण, अशा संकटकाळात कणखर नेतृत्व हवे असते. त्यामुळे जॉन्सन यांचा काळजीवाहू पंतप्रधानपदाचा काळ हा अधिक अस्थैर्याचा असेल. शिवाय, आता गमावण्यासारखे काही नसल्याने जॉन्सन यांचा वारू आणखी उधळण्याची शक्यता ‘द इंडिपेंडंट’ने अग्रलेखात वर्तवली आहे.

काळजीवाहू पंतप्रधान अशी काही गोष्टच ब्रिटिश राज्यघटनेत अस्तित्वात नाही, याकडे लक्ष वेधणारा एक लेखही ‘द इंडिपेंडंट’ मध्ये आहे. जॉन्सन यांनी आपल्या खासदारांचा विश्वास गमावल्याने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांच्याऐवजी अन्य व्यक्तीची नेमणूक करण्याची गरज या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. हुजूर पक्ष आत्मसंतुष्ट बनला आहे. या पक्षाकडे नवकल्पनांची वानवा आहे. त्यामुळे ब्रेग्झिटोत्तर अर्थव्यवस्थेसाठी त्यांच्याकडे काही योजनाच नसल्याचे दिसते, असे निरीक्षण या लेखात नोंदविण्यात आले आहे.

अनेक ब्रिटिश माध्यमांनी जॉन्सन यांची तुलना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली. ट्रम्प यांच्याप्रमाणे जॉन्सन यांनीही सत्तेला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनीही जितके असे प्रयत्न केले तितके ते पदासाठी किती अपात्र होते, हे स्पष्ट झाले, असे ‘द इकॉनॉमिस्ट’ने एका लेखात म्हटले आहे. ‘इंडिपेंडंट’मध्ये उभयतांमधील साम्यस्थळे दर्शवणारा एक लेख आहे. तीन वर्षांपूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जॉन्सन यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले प्रिय सहकारी असा त्यांचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत पदत्यागास तयार नसल्यापासून अनेक वादांपर्यंत या दोन नेत्यांमधील अनेक साम्यस्थळे या लेखात आढळतात.

‘ब्रेग्झिट’वर स्वार झालेले जॉन्सन पुढे अनेक वादांत अडकले. ‘पार्टीगेट’, पिंचर प्रकरणात ब्रिटिश माध्यमांनी जॉन्सन यांना शब्दश: धारेवर धरले. त्यात ‘द गार्डियन’चा विशेष उल्लेख करावा लागेल. जॉन्सन यांच्या राजीनाम्याच्या गार्डियनच्या वृत्ताचे शीर्षक आहे- ‘इट्स ओव्हर.’ या दोन शब्दांमध्ये ऑलमोस्ट हा शब्द कंसामध्ये छोटय़ा अक्षरात आहे. जॉन्सनपर्व जवळपास संपले, ते पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने धोका टळलेला नाही, असे त्यात सूचित करण्यात आले आहे. द गार्डियनने त्यांचे वर्णन ‘लबाड’ या एका शब्दात केले. ‘‘जॉन्सन हे सराईतपणे खोटे बोलतात. त्यांचा पत्रकारितेपासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास अप्रामाणिकपणानेच भरलेला आहे. पत्रकारितेत असताना खोटारडेपणामुळेच त्यांना ‘द टाइम्स’मधून काढण्यात आले होते. खरे तर अशा खोटारडेपणा करणाऱ्या व्यक्ती उच्च पदावर पोहोचत नाहीत. किमान अप्रामाणिकपणा हा त्यांच्या कारकीर्दीच्या प्रवासातला अडथळा ठरतो. मात्र, जॉन्सन यांच्याबाबत असे काही घडले नाही,’’ असे ‘द गार्डियन’च्या एका लेखात म्हटले आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानांमध्ये जॉन्सन हे सर्वात वाईट पंतप्रधान ठरतील, असे सांगणारा एक लेखही ‘द गार्डियन’मध्ये आहे. जॉन्सन यांनी राजीनामा देताना केलेल्या भाषणात करोना हाताळणीबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, त्यांना करोनास्थिती हाताळणीत अपयश आले. याप्रकरणी त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे, अशी मागणी करोनाबळींचे कुटुंबीय करत आहेत, याकडे ‘गार्डियन’ने लक्ष वेधले आहे.

 ब्रिटनमध्ये करोनाकाळात सुमारे दोन लाख नागरिकांचा बळी गेला. जॉन्सन मात्र स्वत: नियमभंग करून पाटर्य़ा करण्यात मग्न होते. अशीच एक शेवटची (विवाह वाढदिवसानिमित्त) पार्टी करण्यासाठी जॉन्सन हे सत्तेला चिकटून आहेत, असा आरोप ‘द डेली मिरर’ने केला आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clownfall british media boris johnson role medium freedom invention ysh
First published on: 10-07-2022 at 00:02 IST