scorecardresearch

Premium

गरजूंचे ‘गुरुजी’

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे शिक्षणाचे दरवाजे बंद होतात. ते खुले करून गरजूंना आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्याचे सामर्थ्य मिळवून देण्याचा प्रयत्न ठाण्यातील गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून करीत आहे.

guruji foundation
गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन

पूर्वा साडविलकर/वेदिका कंटे

२०० हून अधिक स्वयंसेवकांची फौज प्रदीप यांना अविनाश सुर्वे, प्रशांत फाटक, पलानी त्यागराजन, प्राध्यापक सुरेश कोठारी, सुनील दोडेजा, विजय खरे, डॉ. ललिता देशपांडे, हर्षिता गोयल, सुनील पाटील यांच्यासह प्रदीप यांची पत्नी संध्या, त्यांच्या इतर नातेवाईकांचाही या उपक्रमाला मोलाचा हातभार लाभत आहे. याचबरोबर फाऊंडेशनचे २०० हून अधिक स्वयंसेवक असून, ते आपापल्या स्तरावर काम करत आहेत. विशेष म्हणजे सर्व स्वयंसेवक त्यांच्या घरातून ऑनलाइन स्वरूपात किंवा शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन काम करतात.

lokrang
दूर चाललेले शिक्षण..
four thousand bmc health workers warned of agitation on october 4
मुंबई: आरोग्य सेविकांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा
engineering student cheated
‘ऑनलाइन जॉब’ : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले
school student
अर्थसंकल्पीय तरतुदीऐवजी ‘दात कोरून..’?

उच्च शिक्षण घेऊन एखाद्या क्षेत्रात नाव कमावण्याचे अनेकांचे स्वप्न घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अधुरे राहते. अशा वंचित, गरजू विद्यार्थ्यांना ठाण्यातील गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन मदतीचा हात देते. शालेय आणि महाविद्यालयीन गरजू मुलांची पारख करून त्यांच्या उत्थानाचे काम गेली १८ वर्षे ही संस्था करत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असलेले, घरातून शिक्षणाला विरोध होणारे, कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आजारपणामुळे शैक्षणिक वयात कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजी फाऊंडेशनने प्रगतीची दारे खुली केली आहेत. विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रति आवड, जिद्द, इच्छाशक्ती या बाबी लक्षात घेऊन त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने संस्था आखणी करते. केवळ पुस्तकी नव्हे, तर सर्वागीण विकासाचे धडे देणारे शिक्षण देण्यावर गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशनचा भर असतो. 

वंचित समाजातील मुलांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे करण्याचे बळ देणारी ही चळवळ ठाण्यातील डॉ. प्रदीप वायचळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे १८ वर्षांपूर्वी सुरू केली. डॉ. प्रदीप वायचळ यांचे बालपण सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावात गेले. त्यांचे शालेय शिक्षण वैराग आणि सातारा येथील शासकीय विद्यानिकेतनमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर, सांगली आणि आयआयटी दिल्ली येथे झाले. बालपणी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शैक्षणिक जीवनामध्ये त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, अपार कष्ट आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षण घेऊन अनेक आघाडय़ांवर यश मिळवले. आयआयटीमध्ये असताना त्यांनी मित्र-मैत्रिणींबरोबर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचे प्रदर्शन भरवले होते. त्यानंतर, ते बाबा आमटे यांच्याबरोबर ‘आनंदवन’मध्ये चार दिवस राहिले. बाबा आमटे यांचा जीवनप्रवास, त्यांची समाजासाठी तळमळ पाहून प्रदीप यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांना नवा मार्ग सापडला. आपल्या शिक्षणात आलेले अडथळे इतर विद्यार्थ्यांच्या वाटय़ाला येऊ नयेत, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी प्रदीप आणि त्यांचे मित्र अविनाश सुर्वे यांनी ‘गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रदीप यांनी आयआयटी मुंबईमधून डॉक्टरेट  मिळवली. त्यांनी आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करून तिथे पारितोषिके मिळवली आहेत. या कामांचा अनुभव आता ते नव्या पिढीला देत आहेत.

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अनेक आहेत; परंतु ‘गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन’ विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्याचे काम करते. त्यासाठी मुले निवडण्याचे निकष ठरविले आहेत. जात-धर्म-भाषा-प्रदेश न पाहता, फक्त गुणवत्ता म्हणजे बौद्धिक क्षमता, शिकण्याची जिद्द, शैक्षणिक प्रगती, कुटुंबाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पाहून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची वास्तविक परिस्थिती पाहिली जाते. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावर नाही, तर त्यांना गुणवत्तापूर्ण मदत देण्यावर भर दिला जातो. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेली मदत कालांतराने संस्थेस परत केली, तर काहींनी देणगी स्वरूपात मदत केली आहे. यातील काही जण नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता आणि कल याची शास्त्रीयदृष्टय़ा चाचणी घेऊन त्यांच्यासाठी योग्य करिअरचे नियोजन केले जाते. त्यासाठी प्रदीप यांनी स्वत: एमए सायकॉलॉजी केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांस दोन मार्गदर्शक दिले जातात. एक मार्गदर्शक विद्यार्थी ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे, त्या क्षेत्रातील असतो, तर दुसरा मार्गदर्शक विद्यार्थी ज्या भागात राहत आहे, त्या भागातील असतो. प्रत्येक महिन्यात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमातील, अभ्यासेतर विषय, वाचनामधील प्रगती, आहार, निद्रा, व्यायाम, सवयी, पुढील तीन महिन्यांमधील आर्थिक गरजा यासह कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवरील एक लहानसा निबंध-अहवाल बनवतात. त्यावर त्यांच्या मार्गदर्शकांशी चर्चा करतात.

या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता, आर्ट ऑफ लिव्हिंग, वेळेचे नियोजन, उद्योजकता आदी उपक्रम राबविले जातात. त्यांच्या -त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींबरोबर बैठका घेतल्या जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी संस्थेत येतात. मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या पालकांचा हातभार लागणेही आवश्यक असते. त्यामुळे फाऊंडेशनमार्फत पालकांना त्यांच्या उत्पन्नातील योग्य तो वाटा त्यांच्या मुलासाठी संस्थेकडे देण्याचे आवाहन केले जाते. मुख्य म्हणजे संस्थेमध्ये ६५ टक्के मुली आणि ७५ टक्के मुले ग्रामीण भागांतील आहेत. आतापर्यंत शालेय स्तरावरील दोन हजार, तर महाविद्यालयीन स्तरावरील शेकडो विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्यासह व्यक्तिमत्त्व विकास, बौद्धिक कौशल्य आणि मानसिक सामर्थ्य वाढविण्यास संस्थेने मदत केली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शारीरिक साक्षरता, मानसिक सामर्थ्य, बौद्धिक कुशाग्रता, उद्यमशीलता आणि जीवनकौशल्ये हा पंचशील कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. तो राज्यातील ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांसह तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेश येथील १६ शाळांमध्ये कार्यरत आहे. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये त्यात १५ ते २० नवीन शाळांची भर पडेल. शारीरिक साक्षरतेमध्ये शाळेला योग्य ते खेळाचे साहित्य व योग्य ते मार्गदर्शन करून संस्था त्यांच्या प्रगतीचा आढावा नियमितपणे घेते.

त्याशिवाय नवनवीन पुस्तके वाचणे आणि त्यावर चर्चा करणे, त्यांचे समीक्षण करणे हेसुद्धा विचारशक्ती समृद्ध करायला उपयोगी पडते. शाळांना पुस्तके देऊन या गोष्टी राबवल्या जातात. गणिताच्या मूलभूत संकल्पना समजावण्यासाठी गणिती प्रयोगशाळा विकसित केली आहे. उद्योजकतेवर शालेय जीवनात विशेष भर देण्याचे काम केले जाते. इंग्रजी संभाषणकला, नेतृत्व आणि सादरीकरण, ध्येय निश्चित करणे, सांघिकीकरण, पैसा आणि वेळ यांचे व्यवस्थापन, स्वयंशिस्त, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे, आत्मनिर्भरता, स्वच्छता आणि चांगले नागरिकत्व या विषयांवर मुलांना सखोल मार्गदर्शन केले जाते. यातील काही गोष्टी शाळांमध्ये जाऊन शिकविल्या जातात, तर काही ऑनलाइन घेतल्या जातात. काही ठिकाणी शाळेच्या शिक्षकांची मदत घेतली जाते. काही ठिकाणी हुशार मुले निवडून त्यांना प्रशिक्षित केले जाते आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतले जाते.

दरवर्षी संस्थेचे वार्षिक संमेलन पार पडते. पूर्वी विद्यार्थी संख्या कमी होती. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी एकच वार्षिक संमेलन होत असे. मात्र आता विद्यार्थी संख्या वाढल्याने प्रत्येक भागात वार्षिक संमेलन पार पडते. गेल्या वर्षी उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या ठिकाणी संमेलन झाले. या संमेलनाचे आयोजन विद्यार्थी करतात. या संमेलनात येणाऱ्या पाहुण्यांच्या भाषणाऐवजी मुलाखत घेण्याकडे फाऊंडेशनचा कल असतो. समाजातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस आहे. दुर्गम भागांत अनेक गुणवान मुले संधीविना असतात, असा संस्थेच्या स्वयंसेवकांचा अनुभव आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांचे आणि समाजाचे भवितव्य उज्ज्वल करण्याची आवश्यकता आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्र प्रयोगशाळांची उभारणी आणि पालकांचे प्रशिक्षण या दोन गोष्टींवर सध्या संस्थेचे काम सुरू आहे. दुर्गम भागांतील जास्तीत जास्त शाळांना मूलभूत सुविधा पुरवण्याचाही संस्थेचा मानस आहे. त्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Education provide guruji education foundation organization for last 18 years ysh

First published on: 28-09-2023 at 00:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×