प्रबुद्ध मस्के

द्वेष हा राष्ट्रवादासाठी आवश्यक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून गांधीजींनी जे लोक द्वेष हा राष्ट्रवादाचा आवश्यक घटक मानतात ते एका मोठ्या भ्रमात राहतात असे सांगितले. द्वेष हा मानवतावादाच्या पोषकतेस व त्याच्या वाढीस खीळ घालतो. म्हणून जात, धर्म, वंश, वर्ग, भाषा, प्रांत व लिंग यावरून द्वेष करणे किंवा पसरवणे हे मानवतेसाठी घातक ठरते. ही वृत्ती पोसणे म्हणजे व्यक्ती, कुटुंब व पर्यायाने राष्ट्राची प्रगती खुंटविणे होय. एखाद्या व्यक्ती वा समूहावर आपण प्रेम करत नाही; पण म्हणून त्या व्यक्ती वा समूहाचा द्वेष किंवा तिरस्कार करणे आवश्यक असते का? अर्थातच नाही. आपण एकमेकांवर प्रेम न करताही समाजात एकत्र राहू शकतो; पण प्रेम नसलेल्या समाजात कोणत्याही प्रकारची प्रगती उद्भवत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्ती, समूह किंवा राष्ट्राच्या प्रगतीचा आधार हा प्रेमच असू शकतो द्वेष नव्हे. त्यामुळेच अनेकवेळा प्रेम (Love) हा द्वेष (Hatred) या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून पाहिला जातो.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
uddhav thackeray slams bjp raises questions over contribution in india freedom
उद्धव ठाकरे म्हणतात,‘भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात योगदानच काय?, गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही निवडणूक रोखे…’

प्रेम ही एक निखळ नैसर्गिक व भावनिक अवस्था असते; तद्वतच राष्ट्रदेखील माणसांच्या मनातील एकत्वाचे बंध जोपासणारी भावनिक अवस्था असते. प्रेम म्हणजे माणसांच्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असते तर राष्ट्रसुद्धा माणसाला स्वतंत्र असण्याची अनुभूती देते. प्रेम हे ‘मातृप्रेम’, ‘मैत्रप्रेम’, ‘बंधुप्रेम’ व ‘देशप्रेम’ अशा विविध भावबंधात अभिव्यक्त होत असते. प्रेम हे व्यक्तीसापेक्ष असल्यामुळे प्रत्येकाच्या प्रेम धारण व अभिव्यक्त करण्याच्या धारणा व तऱ्हा भिन्न-भिन्न असू शकतात किंवा असतात. परंतु कोणत्याही प्रेमबंधात ‘मानवता’ हे मुख्य तत्त्व अधिष्ठित असतं. त्यामुळे प्रेम ही मानवी संबंधांना व मानवतेला अधिकाधिक समृद्ध व प्रगल्भ बनवणारी प्रक्रिया आहे. म्हणून प्रेमाची भावना (sentiment) ही मानवीच असू शकते; जात, धर्म, भाषा नव्हे! त्याचप्रमाणे राष्ट्र ही कल्पनासुद्धा जात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन मानवी मूल्यांना अधिष्ठित करणारी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

एरिक फ्रॉम हा तत्त्वचिंतक प्रेमाची व्याख्या करताना ‘आदर करणे, काळजी घेणे, जबाबदारी निभावणे व ज्ञान विनिमय करणे’ हे प्रेमाचे मुख्य घटक असल्याचे प्रतिपादन करतो. तसेच ‘देणे’ ही प्रेमाची मुख्य प्रेरणा असल्याचेही स्पष्ट करतो. अर्थातच आपण आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करतो म्हणजे त्या व्यक्तीची काळजी घेणे, आदर करणे, जबाबदारी पार पाडणे आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करत असतो. परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती असते का, हा प्रश्नही येथे महत्त्वाचा ठरतो. कारण भारतीय समाज हा जात-पितृसत्तेच्या नीतिनियमांवर अधिष्ठित असल्यामुळे प्रेम हे जातपितृसत्तेच्या विषम सत्तासंबंधामध्ये जखडलेले आहे. त्यामुळे पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रियसीच्या नात्यात पुरुष हा ‘श्रेष्ठ’ (superior) तर स्त्री ही ‘कनिष्ठ’ (inferior) असतात. त्यामुळे कुटुंब ते सार्वजनिक जीवनात ‘स्त्रीला काय कळतं’ हा मुद्दा उभा राहतो. यातूनच स्त्रीकडे ज्ञान नसते हे गृहीतक तिथे असते. त्यामुळे अनेक वेळा स्त्रियांचा अनादर वा अवहेलना होते. पुरुषाचे मत हे स्त्रीचे मत असते असे मानले जाते. उदा. बहुतांशवेळा कुटुंबातील पुरुष ज्या व्यक्तीला/पक्षाला मत देतो तेच त्या कुटुंबातील स्त्रियांचेही ‘मत’ असते. परंतु अलीकडे शिक्षणातून आलेल्या हक्क-अधिकाराच्या जाणिवेमुळे ही धारणा काहीशी बदलताना दिसते. म्हणून एखाद्या मुद्यावर स्त्रीचे मत वा तिची असहमती विचारात घेतली जाते.

प्रेम हे एकत्वाची भावना प्रदान करत असले तरी दोन व्यक्तींमध्ये विचार-आचाराच्या, निर्णय घेण्याच्या प्रक्रिया भिन्न असल्याने त्यात एक द्वंदही उभे राहते. तरीदेखील ही भिन्नता व त्यांच्यातील वेगळेपण जपणे व त्याचा आदर करणे हे प्रेमाचे महत्त्वाचे लक्षण समजले जाते. म्हणजेच प्रेमात असलेल्या व्यक्ती एकमेकांच्या भिन्नतेचा आदर करतात. म्हणूनच एकाच कुटुंबातील एक व्यक्ती ही मांसाहारी असते तर दुसरी शाकाहारी, एकाला एखादी गोष्ट करायला आवडते तर दुसऱ्याला ती आवडत नाही. परंतु तरीही ते एकमेकांच्या आवडी-निवडी, विचारांचा आदर व आपापसात ज्ञानव्यवहार करतात. मला जे आवडते तू तेच खावे, तेच ल्यावे, तेच विचार मान्य करावे म्हणून बळजबरी केली जात नाही किंवा ते त्यावर लादले जात नाही. त्यामुळे प्रेमात एखाद्या मुद्द्यावर असहमतीसुद्धा व्यक्त केली जाते व त्या असहमतीचा आदर केला जावा ही अपेक्षा असते. तसंच राष्ट्राचेसुद्धा असते. राष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या वैविध्यांनी समृद्ध असणाऱ्या लोकांचा समूह एकत्रित राहतो. अनेकांच्या भाषा, पेहराव, खाद्य संस्कृती व विचारांमध्ये भिन्नता असते; तरीदेखील आपण या भिन्नतेचा आदर करतो, सन्मान करतो. आणि तेव्हाच आपल्याला आपण एक राष्ट्र असण्याचा बोध होतो.

परंतु आपल्याकडे आपल्यापेक्षा वेगळ्या अन्न ग्रहण करणे, वस्त्र परिधान करणे, स्वतंत्र विचार व्यक्त करणे याचा आदर केला जातो का, हा प्रश्न निर्माण होतो. शाळेत असताना आपण ज्याचा अर्थबोध न होता आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणायचो. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ म्हणजे या देशातल्या जमीन, भूप्रदेश, नद्या, डोंगर, पर्वत रस्ते, शहरे, गाव केवळ यावर प्रेम असते का? खरंच आपण आपल्या देशातील विविध जाती-धर्माच्या, भिन्न भाषा-संकृतीच्या लोकांवर प्रेम किंवा त्यांचा आदर करतो का? खरेच आपल्यामध्ये आपण सारे भारतीय बांधव आहोत असा भाव निर्माण होतो का? आपल्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्याला अभिमान वाटतो का? तेव्हा या सर्व प्रश्नांकडे आपल्याला गांभीर्याने पाहणे व याचा बोध करणे गरजेचे आहे. केवळ आपण भारत नावाच्या देशाच्या एका भूमीत राहतो म्हणजे आपण राष्ट्रावर प्रेम करतो का? तर इथे एवढेच पुरेसे नसते तर आपण एक राष्ट्र आहोत ही सामूहिक भावना आपल्या ठायी निर्माण होणे इथे अभिप्रेत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राची व्याख्या सांगताना आपण केवळ भौगोलिक सीमा किंवा एक धर्मीय लोक आहोत म्हणून राष्ट्र होऊ शकत नाही तर ‘सुदिन व सुतक एकाच भावनेने पाळणाऱ्या नागरिकांच्या समुदायानेच आपण राष्ट्र बनू शकतो’ असे प्रतिपादन करतात. प्रसिद्ध तत्त्वचिंतक रेनन यांच्या विचारांना उद्धृत करत बाबासाहेब सांगतात, “राष्ट्र हा एक सजीव आत्मा व आध्यात्मिक तत्त्व असते. ते दोन गोष्टींनी घडते. एक म्हणजे सामाईक ताबा असलेल्या श्रीमंत स्मृतींचा (memories) वारसा व दुसरे म्हणजे एकत्र राहण्याची प्रत्यक्ष संमती (actual consent) या गोष्टी राष्ट्रातील विविधतेला बाधा न पोहोचवता एकत्वाच्या भावनेने आपल्याला बांधून ठेवतात. तसेच आपल्याला राष्ट्र म्हणून अनुभव देणाऱ्या अनेक गोष्टी असतात. जसे की आनंदापेक्षा एकत्रित सहन करणे हा भाव एकत्वासाठी अधिक आवश्यक असतो असे त्यांचे मत होते. म्हणजेच आपण इतरांच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा इतरांच्या दुःखात किती सहभागी होतो? एकत्रितपणे किती सहन करतो (suffering in common is a greater bond of union than joy) हे राष्ट्र बांधणीसाठी जास्त महत्त्वाचे असते.

आपण इतर जातीय, इतर धर्मीय समूहाच्या आनंद व दुःखात किती सहभागी होतो? इतर जात-धर्माच्या स्त्रीवर झालेल्या बलात्काराने आपले मन दुःखी होते का? इतर जात-धर्माच्या निर्दोष व्यक्तीला झुंडीने ठेचून, जाळून मारले जाते तेव्हा त्या व्यक्तीप्रति आपली संवेदना जागृत होते का? या देशातल्या शेतकऱ्याच्या दुःखाशी आपण एकरूप होतो का? आपल्या विचार, संस्कृतीशी एखाद्याने लोकशाही तत्त्वाने असहमती दर्शवली तर आपण त्याचा आदर किंवा स्वीकार करतो का? आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे आपण इतरांच्या स्वातंत्र्याची तमा बाळगतो का? स्वातंत्र्यप्रेमी व्यक्ती हीच मानवी स्वातंत्र्याची पर्यायाने राष्ट्र स्वातंत्र्याची पुरस्कर्ती असते. त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मत, विचार स्वातंत्र्याचा आदर करणे हे त्यात अभिप्रेत असते. म्हणून बाबासाहेब म्हणतात, ‘आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मतस्वातंत्र्याविषयी आपल्या स्वतःच्या मतस्वातंत्र्याइतकीच जागरूकता दाखविणे हेच स्वातंत्र्यप्रेमाचे खरे लक्षण आहे.’

एखाद्या विशिष्ट समूहाची जीवनरीत किंवा संस्कृती ही संपूर्ण देशाची संस्कृती मानली जाते व तीच बहुविध संस्कृतीच्या लोकसमुदायावर ‘राष्ट्रीय संस्कृती’ म्हणून थोपवली जाते. तसेच तिला राजकीय सत्तेची अधिमान्यताही मिळवून दिली जाते. या ‘तथाकथित’ राष्ट्रीय संस्कृतीशी असहमती दर्शवणाऱ्या व्यक्ती व समूहाला ‘राष्ट्रविरोधी’ शक्ती म्हणून अपमानित केले जाते. प्रसंगी त्या व्यक्तीला दंडित करण्याचा आपल्याला नैतिक अधिकारच आहे अशा अविर्भावात त्याच्यावर ‘झुंडीची हिंसा’ करून मारले जाते. अर्थातच त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा ‘इतर’ ठरवून त्याबद्दल द्वेष व हिंसा करणे ही राष्ट्रासाठी नैतिक व कायदेशीर बाब आहे असे भासवले जाते. ही वृत्ती आपल्या राष्ट्रीयत्वाला व पर्यायाने मानवतेला घातक ठरते.

बंधुत्व ही भावना मनुष्याला बांधून ठेवते. बंधुतेचे तत्त्व आपल्याला स्वातंत्र्य आणि समता प्रदान करणाऱ्या लोकशाहीचे मुख्य गमक आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे मानवमात्राबाद्दल आस्था व प्रेम नसेल तर स्वातंत्र्य आणि समता या गोष्टी निरर्थक ठरतात. म्हणून बंधुतेची भावना व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवते. त्यामुळेच बंधुत्वाचे तत्त्व आपल्या संविधानामध्ये समाविष्ट झालेली आहे. ती माणसाला प्रेम या भावनेतून बांधून ठेवते व सतत प्रवाही ठेवते.

आपण मनुष्य म्हणून जन्म घेतला असला तरी ‘माणूस’ बनण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू असते. जीवन जगत असताना ज्या-ज्या गोष्टी मनुष्यपणाला अडथळा ठरतात त्या काढून टाकत नव्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असतो. त्याप्रमाणेच राष्ट्रसुद्धा उपजत असत नाही; ती घडणारी आणि निरंतर घडत जाणारी प्रक्रिया आहे. आणि आपण राष्ट्र बनण्यात अडथळा ठरणाऱ्या माणसांमधील भेदरेषा मिटवणे आवश्यक असते. ती त्या देशात राहणाऱ्या माणसांच्या सामूहिक सहभाग व इच्छाशक्तीच्या बळावर घडते. सुंदर आणि निरोगी सहजीवन हे प्रेमाला अधिक समृद्ध बनवते त्याप्रमाणेच राष्ट्राला अधिक समृद्ध आणि निरोगी बनवायचे असेल तर सर्व जात, धर्म, भाषा व भिन्न लिंग धारण करणाऱ्या समूहांच्या एकत्रित सहजीवनातूनच ते शक्य होईल. त्यामुळे आपल्याला ‘माणूस’ व ‘राष्ट्र’ म्हणून अधिक समृद्ध व प्रगल्भ व्हायचे असेल तर ‘प्रेम’ हाच धागा महत्त्वाचा ठरेल द्वेष नाही!

prabuddha26m@gmail.com