अमित नारकर

बाबा आमटे गेले त्यानंतर साधना साप्ताहिकात कुमार शिराळकरांनी लेख लिहिला होता. बाबांनी माणूस म्हणून जगायचा ध्यास घेतला होता, असं लिहिलं होतं. “श्रमातून वस्तूंची निर्मिती-नवनिर्मिती करणं, आणि स्वतःच्या प्रतिभेतून भवितव्याला साकार करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे माणूस म्हणून जगणं,” असं त्यांनी लिहिलं आहे. बाबा आमटेंनी सोमनाथला श्रमिक विद्यापीठ काढलं, त्या विद्यापीठाच्या पहिल्या बॅचमधला कुमार शिराळकर हा एक विद्यार्थी. माणूस म्हणून जगायचा ध्यास घेतलेल्या या माणसाने २ ऑक्टोबरला आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला. ते गेली तीनेक वर्षं कॅन्सरने आजारी होते. गेल्या दोनेक महिन्यांत हा आजार बळावला. आता या आजारातून कुमार बाहेर येणार नाही, हे कळून चुकलं होतं. आता किती दिवस, एवढाच प्रश्न होता. पण हा प्रवास इतक्यात संपेल, असं वाटत नव्हतं. वाटलं, तरी ते स्वीकारायला मन तयार होत नव्हतं. आणि अखेर २ ऑक्टोबरला ८० वर्षांच्या देहाने ही जीवनयात्रा संपवली.

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

मार्क्सवादी कार्यकर्ता, संत कम्युनिस्ट, शोषित-वंचित समूहांचा, विशेषतः आदिवासी आणि भूमिहीनांचा आवाज म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कुमार शिराळकर संघर्षशील राजकीय कार्यकर्ता होतेच, त्याबरोबर ते कृतिशील विचारवंत होते. या कृतिशील विचारवंताची वैचारिक मूस घडली ती सत्तरच्या दशकात. सत्तरच्या अस्वस्थ दशकातल्या अनेक परिवर्तनवादी चळवळींमध्ये, प्रयोगांमध्ये कुमार शिराळकर अग्रक्रमाने सहभागी होते.

शहादा परिसरात जमीनदारांकडून होत असलेल्या शोषणाविरोधात तेथील आदिवासींची अंबरसिंग महाराजांच्या नेतृत्वाखाली लढाई सुरू होती. आयआयटीमधून सुवर्णपदक मिळवून पदवीधर झालेल्या कुमार शिराळकरांनी आधी सोमनाथचे श्रमिक विद्यापीठ, आणि तिथून बाबांच्या सांगण्यानुसार दिनानाथ मनोहर आणि इतर साथीदारांसह थेट शहादा गाठले. अंबरसिंग महाराजांबरोबर चळवळीत भाग घेतला. अंबरसिंग महाराजांच्या मृत्यूनंतर ही चळवळ टिकवून ठेवण्याचे, अधिक व्यापक आणि सशक्त करण्याचे काम केले. याच काळात पुण्या-मुंबईकडचे सुशिक्षित तरुणही या चळवळीत सहभागी झाले होते. आणीबाणीच्या अलीकडे पलीकडे यातले अनेक साथीदार शहाद्यातून बाहेर पडले. पण कुमार शिराळकर कायमचेच तिथले झाले. श्रमिक संघटना आणि १९८२ पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आदिवासींची, कष्टकऱ्यांची जगण्याची लढाई लढत राहिले. आजही शहादा-तळोदा परिसरात, अक्कलकुवा-धडगावसारख्या सातपुड्याच्या कुशीत विसावलेल्या भागातल्या पाड्यापाड्यांत ते कुमारभाऊ म्हणून ओळखले जातात.

सत्तरच्या दशकातल्याच मागोवा गटातही कुमार शिराळकर सक्रिय होते. युक्रांद, दलित पँथर, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ या साऱ्याशी कुमार शिराळकरांचा जैव संबंध होता. दहाएक वर्षांपूर्वी नितिन आगे हत्या प्रकरणानंतर दलित अत्याचाराविरोधी पदयात्रा आयोजित करण्यात कुमार शिराळकर अग्रभागी होते. वयाच्या सत्तरीतही या यात्रेत पायी चालले होते. दिवसभर चालून रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

एक गाव- एक संगणक!

भांडवली विकासाच्या प्रतिमानाला पर्याय उभा करण्याच्या कामात पुढाकार घेत होते. त्यासाठीची वैचारिक मशागत करणाऱ्या संस्थांशी त्यांचा संबंध होता. पुण्यातल्या समाजविज्ञान अकादमीचे ते विश्वस्त होते. काही वर्षांपूर्वी कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी नाशिकमधून एक दैनिक वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते – लोकपर्याय. या लोकपर्याय माध्यम समूहाचे ते एक संचालक होते. समाजाची वैचारिक मशागत करण्यासाठी अशा पद्धतीच्या व्यासपीठांची गरज आहे, हे ते ओळखून होते. संगणक नवा होता, तेव्हा संगणकाचा आणि माहितीजालाचा वापर वंचित समूहांसाठी कसा करता येईल, हे पडताळून पाहात होते. तेव्हा काही काळ सुरू झालेल्या एक गाव – एक संगणक या चळवळीमध्ये सक्रिय होते. गावविकासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती गोळा करून, त्याचे विश्लेषण करून गावविकासाचे आराखडे कसे बनवता येतील, यासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या मदतीने विविध उपक्रम राबवत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे देशपातळीवरचे महत्त्वाचे नेते होते.

शिक्षणातले प्रयोग

आणि इतके सारे असूनही, धुळे-नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्यांशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती, ती अखेरपर्यंत तशीच राहिली. त्यांनी अंबरसिंग महाराज ज्ञान विज्ञान शैक्षणिक प्रसार मंडळाची स्थापना करून तळोदा तालुक्यात आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह, माध्यमिक शाळा सुरू केली. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून गणित-विज्ञान-भाषा शिक्षणातील राज्यातील तज्ज्ञ व्यक्ती व गटांना जोडून घेतले. पाबळच्या विज्ञान आश्रमाचा इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम राबवून आदिवासी मुलांना वेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाची दारे उघडून दिली. शिक्षणातले हे प्रयोग राज्यातल्या इतर भागांमध्ये पसरावेत, यासाठी प्रयत्न केले. त्यातून नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी भागाबरोबरच नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळा आणि सोलापूरच्या कामगार वस्त्यांमधल्या बालकामगारांच्या शाळा अशा ठिकाणीही शिक्षणातले हे प्रयोग काही काळ राबवण्यात आले. वंचित समूहांच्या मुक्तीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे, ही डॉ. आंबेडकरांची शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न होता. शिक्षण आणि ज्ञानावरची मूठभरांची मक्तेदारी मोडून काढायची, तर शिक्षण आणि ज्ञानव्यवहाराचे लोकशाहीकरण केले पाहिजे, या विचारांतून कुमार शिराळकरांनी या साऱ्या प्रयोगांना पाठबळ दिले, मोडच्या कॉ. बी. टी. आर. हायस्कूल या शाळेच्या माध्यमातून प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली.

पर्याय जोडणारा खांब

व्यवस्था परिवर्तनाची लढाई दोन खांबांवर उभी असते. एक खांब असतो विरोधाचा – जे जे चुकीचे, अन्याय्य, ते नाकारण्यासाठीच्या विरोधाचा, संघर्षाचा. दुसरा खांब असतो, तो पर्यायांची मांडणी करण्याचा, पर्यायांची उभारणी करण्याचा. कुमार शिराळकर परिवर्तनाच्या लढाईतले बिनीचे शिलेदार होते. सर्व प्रकारच्या अन्याय-अत्याचाराविरोधातला संघर्ष करत असतानाच पर्यायांची मांडणी आणि उभारणी करण्याच्या कामातही त्यांनी भागीदारी केली. पर्यायी विकासनीतीची चर्चा असो, की भारत ज्ञान विज्ञान समितीच्या लोकसहभागातून विकासाचे उपक्रम असोत, कुमार शिराळकर या साऱ्यामध्ये सहभागी असायचे. पर्यायी विकासाची चर्चा केवळ स्वप्नरंजन ठरू नये, म्हणून तिला वास्तवाचे भान देण्याचे काम करायचे, त्याचवेळी या प्रयोगांना भूमी उपलब्ध करून द्यायचे. या प्रयोगांमध्ये स्वतः भाग घ्यायचे. शेतमालाच्या बाबतीत उत्पादक-ग्राहक थेट संबंध प्रस्थापित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक प्रयोग सुलभा ब्रह्मेंच्या पुढाकाराने आम्ही काही लोकांनी केला होता. त्यात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून तूरडाळ विकत घेऊन ती पुण्यातल्या मध्यमवर्गीय-निम्नमध्यमवर्गीय ग्राहकांना थेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता. या प्रयोगात बीडमधल्या शेतकऱ्यांना किसान सभेच्या माध्यमातून जोडून देण्याचे काम कुमार शिराळकरांनी केले होते. स्वतः त्याचा पाठपुरावा केला होता. या प्रयोगात शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा थोडा चढा मोबदला, आणि ग्राहकांना बाजारभावापेक्षा स्वस्तात तूरडाळ देण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.

गेली काही वर्षे कुमार शिराळकर ग्रामीण विकासाचे जनवादी पर्यावरणस्नेही प्रतिमान उभे करण्यासाठी झोकून देऊन काम करत होते. स्थानिक संसाधनांचा वैज्ञानिक पायावर अभ्यास करून, लोकसहभागातून विकासाच्या गरजा व प्राधान्यक्रम ठरवणे, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा वापर करणे, अशा सूत्राने अलीकडच्या काळात नंदुरबार जिल्ह्यातल्या चिंचोरे गावात त्यांनी स्थानिकांना बरोबर घेऊन काम उभे केले होते. आणि हे करताना राज्यातले तज्ज्ञ या प्रयोगांशी कसे जोडले जातील, त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा कसा योग्य उपयोग करता येईल, हे ते आवर्जून पहायचे.

जगन्मित्र, तरुणांचे मित्र…

शिराळकर अव्याहतपणे काम करत राहिले. गेली पाच दशके. मुख्यतः लोकांना संघटित करायचे काम त्यांनी केले. साऱ्या जगापासून एक प्रकारे तुटलेल्या शहादा-तळोद्याच्या आदिवासी भागात राहून काम केले. पण अशाही परिस्थितीत जागतिक पातळीवरच्या विचारविश्वातल्या घडामोडींविषयी ते अद्ययावत होते. विज्ञान-तंत्रज्ञान असो, की मार्क्सवादातल्या ननव्या विचारप्रवाहांची मांडणी असो, कुमार शिराळकर त्याबद्दल जाणून होते. या घडामोडींचा त्यांचा अभ्यास होता. हा अभ्यास आणि जमिनीवरच्या कामातले अनुभव याची सांगड घालून त्यांनी परिवर्तनवादी राजकारणाची दिशा ठरवण्याबाबत उभ्या महाराष्ट्राला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे, कृतीशीलतेचे मार्ग देखवून देण्याचे काम केले. कष्टकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत लिखाण केले. पुस्तिकांच्या रूपात, वृत्तपत्रीय लेखांच्या रूपात आणि अगदी सामाजिक शास्त्रातल्या नावाजलेल्या संशोधनपर लेख छापणाऱ्या साप्ताहिकांतही. राज्यभरात विद्यार्थी-तरुणांची, कार्यकर्त्यांची अभ्याससिबिरे घेतली. गावगाड्याच्या मार्क्सवादी विश्लेषणापासून ते प्रेमापर्यंत, साऱ्या विषयांवर.

गेल्या काही वर्षांत जगभरात वाढत असलेल्या आणि भारतात मुळे घट्ट रुजवत असलेल्या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील संघर्षात ते अग्रेसर राहिले.

कुमार शिराळकरांचा लोकसंग्रह दांडगा होता. ते जगन्मित्र होते. केवळ डाव्याच नाही, तर पुरोगामी विचारांच्या पक्ष-संघटना-संस्था-व्यक्तींमध्ये त्यांना मान्यता होती. त्यांच्याशी मतभेद असलेल्या लोकांचे त्यांच्याशी आपुलकीचे संबंध होते. त्यांना व्यापक स्वीकारार्हता होती. सामाजिक पातळीवरच्या स्नेहबंधांबरोबर, कित्येकदा त्यापलीकडे व्यक्तिगत पातळीवर अनेकांशी त्यांनी स्नेह जोडला होता. या माणसावर केवळ प्रेमच करता येत होते.

कुमारभाऊंनीही माणसांवर केवळ प्रेमच केले. या प्रेमापोटीच त्यांनी गरीबांविषयी, श्रमिकांविषयी निर्माण झालेल्या करुणेला भावनाविवशतेचे रूप येऊ दिले नाही. करुणेतून कृतिशील झाले. बाबा आमटेंवरच्या लेखात कुमार शिराळकरांनी लिहिले आहे – ‘बाबांना वाटत असे देशातील तरुणांनीदेखील जगले पाहिजे ते स्वत: जगले तसे. अगदी तंतोतंत तसेच नाही. पण त्या आणि तशा जिद्दीने. स्वत:च्या वैयक्तिक सुखदुःखाची पर्वा न करता. ते म्हणत, फिकीर करा दु:खितांची, स्वत:विषयी बेफिकीर रहा.’ कुमार शिराळकर स्वतः तसे जगले. शहादा-तळोदा परिसरातल्या गरीब आदिवासींसाठी ते शहरातल्या मध्यमवर्गीय मित्रांकडून वापरलेले पण चांगल्या स्थितीतले कपडे घेऊन जात. स्वतः आयुष्यभर कधी नवे कपडे घातले नाहीत. ज्यांनी कुमार शिराळकरांना जवळून पाहिले आहे, त्यांना माहीत आहे. अंगावर कपड्याचा एक जोड, आणि पिशवीत एक. रात्री-अपरात्री एसटीने प्रवास करून जाणार. खिशात केवळ तिकिटाचेच पैसे असले, तरी पुरत. अपरात्री एखाद्या ठिकाणी पोचले, तर कार्यकर्त्यांना अपरात्री कशाला त्रास, म्हणून एसटी स्टँडवर वर्तमानपत्र पसरून झोपलेले अनेकांनी पाहिले आहे. पुण्यातून निघून तळोद्याला अपरात्री पोचले, की मोडपर्यंत तडक चालत जायचे. दोनेक तासात पोचतो, असं सहज म्हणायचे. पुण्यातला मुक्काम समाजविज्ञान अकादमीमध्ये, मोडमध्ये बी. टी. आर. हायस्कूलमध्ये.

स्मृती कशी जागवायची?

स्वतःच्या आयुष्याबद्दल असे बेफिकिर असलेले कुमार शिराळकर कुटुंबवत्सल होते. मिरजेच्या इस्टेटीची योग्य विल्हेवाट लावून त्यातून आलेल्या पैशातून पुण्यात एक छोटा फ्लॅट घेतला. आईची सोय व्हावी म्हणून. स्वतः मात्र तिथे कधीच राहिले नाहीत. आई खूपच थकली, तेव्हा तिच्या शुश्रुषेसाठी मात्र त्यांनी साऱ्या कामातून वेळ काढला. आईबरोबर अधिक वेळ व्यतीत केला. बहिणींना-भाचीला लागेल तेव्हा मदतीला हजर असायचे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा यापलीकडचा तपशील फारच कमी लोकांना माहीत असेल.

कुमार शिराळकरांना त्यांच्या पिढीतले लोक त्यांच्या पिढीतला गांधी म्हणत. गांधीजयंतीच्या दिवशीच कुमारभाऊंनी देह ठेवला. सुधीर बेडेकर हे त्यांचे खास मित्र. मार्क्स-एंगल्सची जोडीच. सुधीर बेडेकरांचे मार्चमध्ये निधन झाले. १६ जुलै रोजी हरिती प्रकाशन आणि शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय यांनी बेडेकरांच्या हजार हातांचा आक्टोपस या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम ब्रह्मे ग्रंथालयात आयोजित केला होता. कुमार शिराळकरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेले शिराळकरांचे भाषण कदाचित त्यांचे शेवटचेच भाषण असावे. बदलत्या काळाची आव्हाने ओळखून नव्याने बांधणी करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर केवळ दोन-अडीच महिन्यांत कुमारभाऊंचे जाणे चटका लावणारे आहे. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला बेडेकर-शिराळकरांचे मित्र नंदा खरे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी नंदा खरेही गेले. अतुल देऊळगावकरांनी एक आठवण नोंदवली आहे – कुमार आणि सुधीरची प्रदीर्घ मुलाखत घ्यायचे नंदा खरेंच्या मनात होते. एका काळाचे केवळ साक्षीदारच नाही, तर सक्रीय सहभागी असलेल्यांपैकी बेडेकर आणि खरे आधी गेले, आणि आता कुमार शिराळकरही आपल्यात नाहीत.

बाबा आमटेंवरच्या लेखात कुमार शिराळकर लिहितात – ‘कोणत्याही महान माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे अस्तित्त्व राखले जाते, त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्यातून. प्रश्न आहे की बाबांची स्मृती कशी जागवायची? बाबांना काय अभिप्रेत होते आणि आपल्याला काय अभिप्रेत असले पाहिजे?’

ज्या श्रमिक-कष्टकरी समूहांसाठी कुमार शिराळकरांनी आपलं उभं आयुष्य वेचलं, त्या समूहांसमोरची आणि या समूहांच्या बाजूने उभे राहणाऱ्या परिवर्तनवादी चळवळींसमोरची आव्हाने खडतर होत चालली असतानाच्या आजच्या काळात कुमार शिराळकरांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणं, माणूस म्हणून जीवन जगण्याचा ध्यास घेणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.