उज्ज्वला बर्वे

१९७० च्या दशकात दिल्लीतील एक तरुणी उठते आणि जर्मनीमध्ये जाऊन तिथल्या दूरचित्रवाहिनीवर राजकीय संपादक म्हणून काम करते, ५० उत्तम माहितीपटांची निर्मिती करते, हे आजच्या काळातही अचंबा वाटावे असेच. अर्थात नवीना सुंदरम यांची ओळख त्याहीपलीकडे त्यांच्याबद्दल बरेच काही सांगणारी आहे..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

अलीकडेच दृश्य कलाकार विवान सुंदरम यांच्या निधनाची बातमी भारतातील सर्व वृत्तमाध्यमांत- मराठी माध्यमांतही- ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्यांचे कार्य अर्थातच एवढे मोलाचे होते की त्यांच्या निधनाने वाटलेली हळहळ, त्यामुळे कलाविश्वात निर्माण झालेली पोकळी यांची विस्तृत चर्चा झाली. परंतु एक वर्षांपूर्वी (२४ एप्रिल २०२२ रोजी) त्यांच्या बहिणीचे- नवीना सुंदरम यांचे- निधन झाले तेव्हा त्याची फारशी दखल भारतात, किमान मराठीत तरी घेतली गेली नाही.

पण तेही साहजिकच होते.त्यांचे वडील स्वतंत्र भारतातील पहिले कायदा सचिव, दुसरे निवडणूक आयुक्त वगैरे होते, पण त्या त्यांच्यासारख्या त्या उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी नव्हत्या. आई इंदिरा सुंदरमसारख्या पियानोवादक नव्हत्या. मावशी अमृता शेरगिल यांच्यासारखी चेहरेपट्टी त्यांना लाभली होती, तरी अमृतासारख्या किंवा भाऊ विवानसारख्या त्या चित्रकार, कलाकार नव्हत्या. नवीना यांनी एकदम वेगळा, त्या काळात मुली ज्याच्या वाटेला फारशा जात नसत- असा मार्ग निवडला.

त्यांनी केवळ पत्रकारिताच निवडली असे नाही, तर परदेशात जाऊन पत्रकारिता केली. १९७० साली, म्हणजे वयाच्या फक्त २५ व्या वर्षी, त्या पश्चिम जर्मनीतल्या एनडीआर या टीव्ही वाहिनीवर पहिल्या जर्मनेतर आणि पहिल्या गौरेतर पत्रकार म्हणून रुजू झाल्या. (जर्मन टीव्हीवर साडी नेसून कार्यक्रम सादर करणाऱ्यादेखील अर्थातच त्या पहिल्या असणार.) १९४५ साली जन्मलेल्या नवीना स्वत:चे वर्णन ‘नेहरूकालीन बालक’ असे करत असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारलेल्या वातावरणात दिल्लीतल्या युवतीला स्वत:चा परीघ ओलांडून उंच झेप घेण्याची आकांक्षा निर्माण झाली हे त्यांना स्वाभाविक वाटत असे.

महिला पत्रकारांनी राजकीय वार्ताकन करण्याचा फारसा प्रघात नसलेल्या त्या काळात त्यांनी जर्मनीतील एनडीआर टीव्ही वाहिनीवर राजकीय संपादक म्हणून काम केले. त्या काळात त्यांनी जवळपास ५० उत्तम माहितीपटांची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या. भरपूर मेहनत घेऊन, संशोधन करून, लोकांशी बोलून माहिती जमा केली, त्याचं चित्रीकरण केलं आणि त्यांच्या खास शैलीत त्याची मांडणी करून ते माहितीपट त्यांनी सादर केले.

‘ॲन इनसायडर्स आउटसाइड व्ह्यू ॲण्ड ॲन आउटसाइडर्स इनसाइड व्ह्यू’ असे त्यांच्या कामाचे वर्णन केले जाते. भारत किंवा दक्षिण आशियातल्या घटनांकडे स्वत: मूलत: त्या भागातीलच असल्या तरी जर्मन दृष्टिकोनातून पाहणे, आणि जर्मनीत त्या बाहेरच्या असल्या तरी जर्मनीविषयी भारतीयांना सांगताना जर्मन दृष्टिकोनातून सांगणे अशी अवघड जबाबदारी त्यांनी लीलया पेलली असे त्यांचे काम पाहताना लक्षात येते.महेश योगी यांची जर्मनीतील प्रचंड लोकप्रियता, योगविद्येचा झपाटय़ाने होत असलेला प्रवास, हरेकृष्ण चळवळीतून युद्धाविषयी व्यक्त होणारा असंतोष यांचेही त्यांनी वार्ताकन केले (माहितीपट- ऑन दि पाथ टू ब्लिस), आणि युगांडातून निर्वासित झालेल्या काही भारतीयांना जर्मनीने आश्रय दिल्यानंतर त्यातील दोन कुटुंबांचा वर्ष-दोन वर्षांचा प्रवास दाखवणारा माहितीपटही (दर्शन सिंग वॉन्ट्स टू स्टे इन लेबरकुसन) त्यांनी केला. जर्मनांना भरतनाटय़मची ओळख करून दिली, आणि भारतीयांना पाश्चात्त्य घडामोडींची माहिती दिली.

कष्टकरी वर्ग, स्थलांतर, लिंग असमानता, मानवी हक्क, संस्कृती, निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया, वंशवाद, आंतरराष्ट्रीय राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था, अध्यात्म अशा विविध विषयांचे त्यांनी सखोल वार्ताकन केले, त्यांविषयी लेख लिहिले.स्थलांतरितांचा जर्मनीतील आवाज म्हणून त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांना एखाद्या विषयाचे ज्या पद्धतीने वार्ताकन करायचे असे त्याबाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी त्यांना अनेकदा वरिष्ठांशी वाद घालावा लागत असे. अनेकदा त्या त्यांचे मत पटवून देण्यात यशस्वी होत असत.त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीची परिपूर्ण नोंद त्यांच्याबद्दलच्या डिजिटल अर्काइव्हच्या रूपाने उपलब्ध आहे ही फार मोलाची गोष्ट आहे. हे डिजिटल अर्काइव्ह, त्याची निर्मिती, रचना हे स्वतंत्र लेखाचे विषय आहेत. परंतु थोडक्यात सांगायचे तर नवीना यांच्याबरोबर ज्यांनी काम केले त्यांनी त्यांच्या कामाचे मोल जाणले होते. समकालीन इतिहासासंबंधीचा हा दस्तऐवज असा काळाच्या उदरात गडप होता कामा नये या तळमळीतून त्यांच्या दोन जर्मन सहकाऱ्यांनी ‘द फिफ्थ वॉल’ (पाचवी भिंत) या नावाने हे डिजिटल अर्काइव्ह उपलब्ध करून दिले आहे. (दुवा: https:// die- fuenfte- wand. de/ en)त्यावर त्यांचे सर्व माहितीपट, त्यासाठी तयार केलेल्या संहिता, लिहिलेले लेख, आणि विशेष म्हणजे त्यांचा खासगी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्या हयात असतानाच या अर्काइव्हची निर्मिती झाल्यामुळे नवीना यांच्या कालखंडातील विविध टप्प्यांविषयीच्या मुलाखतीदेखील त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

खासगी पत्रव्यवहार आणि या मुलाखती यांतून त्यांची विचारप्रक्रिया, भूमिका, कामातील तळमळ आपल्यापर्यंत पोचते. नवीना काम करत होत्या त्या वाहिनीकडे सर्व चित्रफिती सुयोग्य स्थितीत उपलब्ध होत्या ही कौतुकाची गोष्ट असली तरी अर्काइव्हच्या निर्मात्यांना त्या चित्रफिती विकत घ्याव्या लागल्या, ही थोडी आश्चर्याची गोष्ट वाटते.परंतु तेवढा खर्च करून, इतके कष्ट करून नवीना सुंदरम या व्यक्तीचे आयुष्य आणि पत्रकारितेतील काम जिवंत ठेवावे, इतरांना उपलब्ध करून द्यावे असे निर्मात्यांना वाटले यातच त्यांच्या कार्याची महती लक्षात यावी.

स्थलांतर, आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा विविध विषयांच्या भारतीय अभ्यासकांना १९७० ते २०२० अशा ५० वर्षांच्या कालखंडाकडे पाहण्याची वेगळी नजर कदाचित नवीना सुंदरम यांच्या कामाचा अभ्यास करताना मिळू शकेल.रंगभूमीवरील कलाकार जसा नाटक चालू असताना मध्येच ती अदृश्य भिंत भेदून त्याच्या प्रेक्षकांशी संवाद करतो, तसाच नवीना यांचा पत्रकार या भूमिकेच्या पलीकडचा त्यांच्या प्रेक्षकांशी, वाचकांशी असलेला संवाद त्या गेल्यानंतरही उपलब्ध आहे.
लेखिका माध्यम अभ्यासक व शिक्षक आहेत.

Story img Loader