‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान पाहिलेलं एक छायाचित्र माझ्या चांगलंच लक्षात राहिलं. ज्या दिवशी आपल्या सरकारनं ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे ठार झालेल्या लष्कर-ए -तय्यबाच्या दहशतवाद्यांची नावं जाहीर केली, त्याच दिवशी हे छायाचित्र ‘व्हायरल’ होऊन समाजमाध्यमांवर फैलावत होतं… पाकिस्तानी लष्करातले वरिष्ठ अधिकारी या मोहिमेत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्यदर्शनाला उपस्थित आहेत असं ते छायाचित्र! दहशतवाद्याच्या शवपेटीलगत त्याचा कुणी दाढीधारी नातेवाईक किंवा जिहादीच आणि त्याच्या मागे हे अधिकारी. शवपेटी पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेली आहे आणि त्यावर गुलाबफुलांचं पुष्पचक्रही आहे. या छायाचित्रातून माझ्या आणि इतरही अनेकांच्या लक्षात राहील, तो पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा बेशरमपणा.
पहलगामच्या हत्याकांडानंतर लगोलग पाकिस्ताननं जुनीच युक्ती पुन्हा वापरली- त्या देशातले लष्करी आणि राजकीय नेते ‘आम्ही काही दहशतवादाचा वापरबिपर आता करत नाही. उलट आम्हालाच दहशतवादाचा त्रास होतो’ वगैरे प्रचारकी रडगाणी एका सुरात गाऊ लागले. यात अर्थातच पाकिस्तानी लष्कराचे अधिकार जरा कमी पडतात, कारण त्यांच्या इंग्रजीचीही बोंबच असते. मग पाकिस्तानातली जी राजकीय घराणी पाश्चात्त्यांना माहीत आहेत त्यांतल्या जरा तरुण, गोऱ्यागोमट्या, परदेशात शिकलेल्या राजकीय नेत्यांना बोलावून त्यांच्याकरवी हाच प्रचार फर्ड्या इंग्रजीतून केला जातो.

हे या वेळी निभावायला होते बिलावल भुत्तो आणि हीना खार (त्याच त्या- भारतात २०११ मध्ये आल्या असताना ज्यांच्या ७ लाख रुपये किमतीच्या हॅण्डबॅगेचाच बोलबाला अधिक झाला होत्या त्याच). बिलावल भुत्तो यांनी ‘कधीतरी जुन्या काळात’ पाकिस्ताननं दिलाही असेल कुणा दहशतवाद्यांना पाठिंबा, पण आता आमचा देश बराच पुढे गेलाय, असा पवित्रा घेताला. हीना मेमसाबना एका ब्रिटिश वृत्तवाहिनीवरल्या चर्चेत संधी मिळाली, तेव्हा आपला भारी लेसचा दुपट्टा सांभाळत त्यांनीसुद्धा बिलावल भुत्तोंसारखीच विधानं केली. अखेर बरखा दत्त यांनी या हिना खार यांना थेटच प्रश्न विचारला : लष्कर- ए- तय्यबा किंवा जैश- ए- मोहम्मद यांना तरी दहशतवादी संघटनाच मानता ना तुम्ही? – त्यावर हिनाबाई काहीच बोलल्या नाहीत. निघूनच गेल्या. त्या चित्रवाणी चर्चेतली हिना यांची खिडकी मग रिकामीच दिसू लागली… पळाल्या त्या!

पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी- म्हणजे लष्करशहा आणि राजकीय नेत्यांनी- नेहमीच ‘अनवधानानं’ का होईना नृशंस/ भ्याड/ धर्मांध शक्तींना पोसलेलं आणि आणि त्यांच्याकरवी निरपराध माणसांना मारलेलं आहे; कारण थेट लष्करी संघर्ष करण्यासाठी मुळात धैर्य लागतं. खरंतर इथंच भारताची जीत होते. तरीही आपल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ आखणं क्रमप्राप्त ठरलं, कारण तुमच्या जिहादी बगलबच्च्यांची गय आता आम्ही करणार नाही, असा सज्जद संदेश पाकिस्तानी लष्कराला द्यायलाच हवा होता. मुरीदके इथलं लष्कर- ए- तय्यबाचं आणि बहावलपूरमधलं जैश- ए- मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करून आपण हा संदेश दिलाच, पण पाकव्याप्त काश्मीरमधल्या तळांनाही या वेळी आपण धडा शिकवला.

हे सगळं खरं, पण दर वेळी आपण पाकिस्तानला अद्दल घडवतो तरीही पाकिस्तानी नेते/ लष्करशहा काहीच धडा न शिकता त्यांचं म्हणणंच जगापुढे रेटत राहातात, रेटून खोटं कथानक रचत राहातात ही भारतानं खरी डोकेदुखी मानायला हवी; ती अद्यापही वाढतेच आहे असं दिसतं. पाकिस्तान्यांच्या सुरात सूर मिसळणारे काही पाश्चात्त्य विश्लेषकही दिसतात, त्यांना दोष देणं हा आपला निव्वळ त्रागा ठरतो. कारण आपली पावलं पाकिस्तानी कथानकं हाणून पाडण्याच्या हिशेबानंच टाकली पाहिजेत, हे आपण विसरतो. उदाहरणार्थ, पहलगाम हल्ल्याच्या वेळी पाकिस्ताननं ‘पुरावे’ मागितले, तेव्हा आपण ती मागणी धुडकावून लावली. मग पाकिस्तानला ‘आमच्या नावावर उगाच खपवलेला हा प्रकार आहे’, हे हत्याकांड ‘शंकास्पद’ आहे वगैरे कथानकं रचता आली, ती पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांतूनही पोहोचवली गेली. मुळात एखाद्या नृशंस हत्याकांडाला ‘शंकास्पद’ ठरवणं हा काय प्रकार आहे? – ज्या देशात लोकशाही कधीच टिकू शकली नाही आणि लष्करशहांचीच सद्दी बहुतेक काळ राहिली, त्याच देशाला हे सुचू शकतं की राज्यकर्ते आपल्याच देशातली माणसं मारण्याचं राजकारण करतील… जिथं लोकशाही कायम राहिली आहे, जिथले नेते हे नेहमीच लोकप्रतिनिधी असतात, अशा देशात हे होऊ शकतच नाही या निर्विवाद सत्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

होय, ठेवावाच लागेल विश्वास… कारण जेव्हा केव्हा सत्ताधारीच लोकांच्या जिवावर उठले असल्याची साधार शंका घेण्याइतपत परिस्थिती आपल्याकडे उद्भवली, तेव्हा तेव्हा सरळ आरोप झाले आणि संबंधित सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोडसुद्धा उठली. उदाहरणांची यादी बरीच मोठी असली तरी इथं मेरठजवळची हाशिमपुरा दंगल – १९८७, दिल्लीत १९८४ मध्ये घडलेलं शिखांचं शिरकाण आणि २००२ ची गुजरात दंगल ही तीन मोठी उदाहरणं पाहू- या तीन्ही वेळी न्याय पूर्णपणे मिळाला असेल वा नसेल, पण सत्ताधारीच नरसंहाराला पाठिंबा देताहेत हे सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवणाऱ्या सामान्य भारतीयांना माहीत होतं, प्रसारमाध्यमांनीही आपलं स्वातंत्र्य जपून हेच उघड केलं होतं. त्यामुळेच आपल्यात आणि पाकिस्तानात मोठा फरक उरतो. आपण पाकिस्तान्यांसारखा खोटेपणा नाही करत. पाकिस्तानी लोक समजतात की भारतातलं ‘हिंदुत्व’ ही जणू काही त्यांच्याकडल्या इस्लामी धर्मांधतेचीच हिंदू आवृत्ती आहे. पण तसं असू शकत नाही. मला हिंदुत्वाबद्दल उमाळा नसला तरीसुद्धा सांगते, स्वत:ला ‘गोरक्षक’ म्हणवत दिसला मुस्लीम माणूस जनावरासह की काप त्या माणसाला, असं करणाऱ्यांना हिंदू धर्माची मान्यता असू शकत नाही. हाच आपल्यातला आणि धर्माला राजकीय हत्यार मानू शकणारे पाकिस्तानी यांच्यामधला मूलभूत फरक आहे.

तरीही पाकिस्तान्यांची कथानकबाजी ही आपली डोकेदुखी ठरते आहे, असं का होतंय? एक कारण तर घराघरांतून सर्वांच्या डोळ्यांना दिसतंय, कान किटेपर्यंत ऐकूही येतंय- आपले अतिदेशभक्त ‘न्यूज चॅनेल’वाले! त्यांच्या अक्कलशून्य माकडचाळ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जो काही ऊत आला, त्यातून त्यांची विश्वासार्हता तर गळपटलीच, पण या लोकांनी आपल्या सरकारच्या विश्वासार्हतेलाही बट्टा लावला. अक्षरश:, एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता एकाही भारतीय चित्रवाणी- वृत्तवाहिनीवरचे निवेदक (अँकर) आणि वार्ताहर आम्हीच कसे राष्ट्रवादी याचं प्रदर्शन करण्यासाठी काय वाटेल ते बोलत/ दाखवत सुटले होते. राष्ट्रवादाला उकळ्या आणण्यासाठी नव्हे- बातम्या पोहोचवण्यासाठी आपण काम करतो आणि बातमीमध्ये तथ्यपूर्णता असावी लागते, याचाच विसर या लोकांना पडल्याचं दिसलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याऐवजी खरोखरज जर बातम्या शोधल्या गेल्या असत्या, जर पत्रकारिता झाली असती तर काय फरक पडला असता, याचा विचार आता संघर्षाला ‘स्थगिती’ मिळाल्यानंतर तरी करायला हरकत नाही. पाकिस्तानची लष्करी कुवत खरोखरच आपल्याएवढी आहे का, आपले लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांत पाकिस्तानला ‘कायमची अद्दल’ घडवण्याची भाषा करत होते तशी आपल्या लष्करी कारवाईतून घडेल का, याचा नेमका अंदाज आपल्याला आपल्या पत्रकारांनी द्यायला हवा होता. स्वतंत्र प्रसारमाध्यमांचं ते काम होतं. तसं काही झालं नसलं तरी अपवाद म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी याच दिवसांत एका लेखामध्ये पाकिस्तानच्या लष्करी क्षमतांचा ऊहापोह केला होता. दोन्ही देशांकडे सध्याच्या घडीला जवळपास एकसारखंच तंत्रज्ञान आहे, यातून आपल्याला पुडे जायचं असेल तर आपल्या सेनादलांच्या कायापालटासाठी ‘भारताचा संरक्षणखर्च दुपटीनं वाढवून तो जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या) तुलनेत चार टक्क्यांवर नेणं आवश्यक आहे’ या त्यांच्या म्हणण्यावर रास्त विचार व्हावाच, पण युद्ध केवळ शस्त्रांनी नाही- युक्तीनंही लढलं जातं हेही लक्षात राहावं.