scorecardresearch

Premium

युगांडातील दहशतीची भारतालाही झळ

युगांडातील ‘अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस’च्या हल्ल्यात निरपराधांचे बळी जाणे १९९५पासून सुरू आहे. तिथे आजही भारतीय व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या हत्याकांडाची दखल घेणे आणि दहशतवादावर नियंत्रणासाठी तेथील सरकारच्या बरोबरीने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते!

lekh uganda terror
युगांडातील दहशतीची भारतालाही झळ

जतिन देसाई

युगांडा येथील एका शाळेवर १६ जूनच्या रात्री ‘अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस’ (एडीएफ) नावाच्या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात किमान ४१ जण मृत्युमुखी पडले. त्यातील ३७ विद्यार्थी होते आणि त्यातही २० मुली होत्या. यापूर्वी देखील या अतिरेकी संघटनेने शाळेवर हल्ले केले आहेत. १९९८ मध्ये एका अन्य शाळेत केलेल्या हल्ल्यात ८० विद्यार्थी मारले गेले होते आणि १०० मुलांचे अपहरण करण्यात आले होते. मुलांचे अपहरण करून त्यांना ते आपल्या संघटनेत भरती करतात व बालसैनिक म्हणून त्यांचा उपयोग करतात.

delhi police
‘न्यूजक्लिककडून भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा कट’; दिल्ली पोलिसांचा ‘एफआयआर’मध्ये आरोप
Turmeric-Council
क.. कमॉडिटीचा : हळद परिषदेच्या निमित्ताने…
Refugees from Myanmar
म्यानमारच्या निर्वासितांची बायोमेट्रिक तपासणी करणार नाही; मिझोरामच्या सरकारने केंद्राचे आदेश धुडकावले
fire broke 15 floors building Hindu Colony dadar old man died mumbai
दादरमधील १५ मजली इमारतीला आग; घुसमटल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

या हल्ल्यामुळे २०१४ च्या डिसेंबर महिन्यात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांनी पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलवर  केलेल्या हल्ल्याची आठवण होते. त्यात जवळपास १५० मुले व इतर कर्मचारी मारले गेले होते. युगांडात ख्रिस्ती समाजाची वस्ती ८४ टक्क्यांहून अधिक आहे, तर मुस्लिमांची १४ टक्के आहे. युगांडाचे सर्वेसर्वा योवेरी मुसेवेनी यांच्या विरोधात काही अतिरेकी व जहाल संघटनांनी एकत्र येऊन १९९५ मध्ये एडीएफची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी पश्चिम युगांडातून कारवाया सुरू केल्या आणि नंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे पळूून गेले. तिथून त्यांनी युगांडात दहशत पसरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांना सुदान सरकारची मदत मिळत होती.

जमील मुकुलू हा त्यांचा नेता. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या मुकुलूचे मूळ नाव डेव्हिड स्टीव्हन. सौदी अरेबिया येथे शिकत असताना त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. युगांडात परत आल्यानंतर तो ‘नॅशनल आर्मी फॉर लिबरेशन ऑफ युगांडा’ (‘नालू’) या संघटनेत सामील झाला. या संघटनेचा नेता होता अमीन बझीरा. १९९५ मध्ये त्याची हत्या झाली. त्यानंतर इतर काही जहाल संघटनांना एकत्र आणून त्यांनी इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी एडीएफची स्थापना केली. अनेक वर्षे त्यांना काँगोने मदत केली. इस्लामिक स्टेटशी (आयएस) संलग्न असलेल्या एडीएफने २०१३ मध्ये काँगोमध्येही हल्ले करण्यास सुरुवात केली. शेवटी मुकुलू याला टांझानिया येथे पळून जावे लागले. टांझानियाने त्याला पकडून युगांडाच्या स्वाधीन  केले. त्याच्याविरुद्ध युगांडा येथे खटला सुरू आहे.

काँगोच्या सीमेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या एमपोन्डवे येथील शाळेचे वसतिगृह अतिरेक्यांनी जाळले. अन्नधान्य लुटले. एकूण ४१ जणांची हत्या करण्यात आली. सहा मुलांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या मदतीने अन्नधान्य सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. ही शाळा राजधानी कंपालापासून जवळपास २०० मैलांवर आहे. युगांडाच्या ‘मिलिटरी ऑपरेशन्स इन काँगो’चे कमांडर मेजर जनरल डिक ओलुम यांच्या म्हणण्याप्रमाणे हे अतिरेकी हल्ल्याच्या आधीच्या दोन रात्री याच परिसरात होते. हल्ल्यानंतर ते विरुंगा नॅशनल पार्कच्या दिशेने पळून गेले. काँगोच्या या पूर्व भागावर सरकारचे नियंत्रण नाही. २०२१ मध्ये एडीएफने कंपाला येथे अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर युगांडा सरकारने एडीएफच्या विरोधात पूर्व काँगो येथे मोठय़ा प्रमाणात लष्करी कारवाई केली. त्यात एडीएफचे अनेक दहशतवादी मारले गेले. पण अतिरेकी संघटना संपली नाही.

२०२१ मध्ये अमेरिकेने एडीएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले. २०१७ पासून आतापर्यंत एडीएफने काँगो येथे ७३० हल्ल्यांत तीन हजार ८५० जणांची हत्या केली आहे. मार्च महिन्यात काँगोच्या नॉर्थ किवू प्रांतातील एका गावात केलेल्या हल्ल्यात एडीएफने ३६ जणांची हत्या केली. युगांडाच्या शाळेत हल्ला करण्याच्या एका आठवडय़ापूर्वी युगांडाच्या सीमेजवळील काँगोमधील एका गावात एडीएफच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्या गावातील १०० हून अधिक जण जीव वाचविण्यासाठी युगांडात पळून गेले होते. आता ते आपापल्या गावी परत आले आहेत. मुसेवेनी सरकारला पदच्युत करण्याचा एडीएफचा उद्देश आहे. २६ जानेवारी १९८६ पासून सत्तेत असलेल्या हुकूमशहा मुसेवेनी यांनी लोकांवर प्रचंड अत्याचार केले आहेत. याकाळात युगांडाचे अमेरिकेशी असलेले संबंध सुधारले आहेत. दहशतवादविरोधी युद्धाला मुसेवेनी यांचे समर्थन आहे.

अलीकडे आफ्रिका खंडात दहशतवाद वाढत आहे. येथील अनेक सरकारे कमकुवत आहेत. वांशिक गटांत लोकांचे विभाजन होत आहे. अतिरेकी वेगवेगळय़ा देशांच्या सीमांचा पळून जाण्यासाठी उपयोग करतात. सोमालियाचा विचार केल्यास तिथे अल शबाब नावाची दहशतवादी संघटना आहे आणि तिची प्रचंड दहशत आहे. सरकारचे नियंत्रण राजधानी मोगाडिशूपर्यंत मर्यादित आहे. अनेकदा राजधानीत देखील अल शबाब बॉम्बस्फोट घडवून आणत आहेत. सोमालियाव्यतिरिक्त जिबुटी, केनिया आणि इथिओपियातही अल शबाब सक्रिय आहे. नायजेरियात बोको हराम नावाच्या अतिरेकी संघटनाची प्रचंड दहशत आहे. बोको हरामही शाळांवर आणि शैक्षणिक संस्थांवर अनेकदा हल्ले करते. मुलींना पळवून नेणे आणि त्यांना गुलाम करणे ही बोको हरामच्या कामाची पद्धत आहे. नायजर, चाड, माली, केमेरूनसारख्या देशांतही त्याची प्रचंड दहशत आहे. भारताचे युगांडाशी जुने संबंध आहेत. १९७२ च्या आधी मोठय़ा संख्येने भारतीय युगांडात होते आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने व्यापार उद्योग होता. १९७२ च्या ऑगस्ट महिन्यात युगांडाच्या तेव्हाच्या अध्यक्ष इदी अमीन यांनी आशिया खंडातील लोकांना देश सोडून जाण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली होती. आशिया खंडातील अंदाजे ८० हजार लोकांमध्ये भारतीय मोठय़ा संख्येने होते. त्यातील जवळपास २७ हजार व्यक्तींनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतलेला. इतर भारत व अन्य देशांत गेले. युगांडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचा मोठा वाटा होता. मूळ भारतीय लोक निघून गेल्यानंतर युगांडाची आर्थिक परिस्थिती मोठय़ा प्रमाणात खालावली. लोकांमध्ये असंतोष वाढला आणि इदी अमीन यांनी तो चिरडण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांचे लक्ष आर्थिक प्रश्नांवरून हटविण्यासाठी १९७८ च्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी टांझानियावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. नंतर १९७९ ला टांझानियाने इदी अमीन विरोधी युगांडातील लोकांच्या मदतीने कंपालावर हल्ला केला. ११ एप्रिल १९७९ ला टांझानियाचे जवान आणि युगांडा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे सैनिक कंपालाच्या जवळ पोहोचले. लगेच इदी अमीन यांनी कंपालातून पळ काढला. त्यांनी सुरुवातीला लिबिया नंतर इराक आणि शेवटी सौदी अरेबियाचा आश्रय घेतला. तिथेच २००३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या सरकारने मूळ भारतीयांना सन्मानाने परत बोलवले. अनेक परत आले. आजही युगांडात मूळ भारतीय मोठय़ा संख्येने राहत आहेत आणि तिथे व्यापार व उद्योग करत आहेत. 

युगांडात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा तिथे राहणाऱ्या मूळ भारतीयांवर परिणाम होतो आणि साहजिकच त्याचा भारताशी संबंध येतो. म्हणून दहशतवादी संघटना मग ती एडीएफ असेल किंवा इतर कुठलीही त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. एडीएफच्या दहशतवादाला लगाम घालण्यासाठी युगांडा आणि काँगो सरकारने लोकांचे जीवन सुधारेल असे धोरण आखले पाहिजे. उभय राष्ट्रांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terror in uganda also affected india allied democratic forces attack ysh

First published on: 22-06-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×