हर्षल प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एक रोचक किस्सा सांगितला होता, एकदा बडे गुलाम अली खाँ यांना भेटण्यासाठी जसराज अमृतसरला गेले. तिथे ट्रान्झिस्टरवर लता यांचे ‘ये जिंदकी उसी की है जो किसी का हो गया’ हे गाणे वाजू लागले. तर, खाँसाहेब बोलता-बोलता अचानक गप्प झाले आणि गाणे संपल्यावर म्हणाले, ‘कमबख्त कभी बेसुरी होती ही नहीं.’ या टिप्पणीत पित्याची ममता आणि एका कलाकाराला वाटणारा हेवासुद्धा होता, असे जसराज म्हणतात. लतादीदींच्या या उदाहरणांची आठवण आज होण्याचे कारण भाजपच्या देशभरातील नेत्यांना आणि चेल्याचपाटय़ांना उद्धवराव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना अशाच आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर इतके वार करून, राजकीयदृष्टय़ा त्यांना संपवण्याचे पराकोटीचे प्रयत्न करून, त्यांच्या कुटुंबाला बदनाम करूनही ये कंबख्त कभी  खतमही नहीं होता, हे त्यांचे खरे दु:ख आहे. म्हणूनच त्यांच्या मुलाखतीवर आता भाजपवाले अश्रू ढाळत आहेत. 

रामराज्याच्या गप्पा आणि मणिपूरचा विसर

आज देश मणिपूरमधील स्त्रियांची नग्न धिंड पाहून स्तब्ध झाला आहे, पण भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही नेत्याला त्याबाबत विचार मांडावेसे वाटले नाहीत. मणिपूरला जाणे तेथील परिस्थिती पाहणे, त्या नराधमांना शिक्षा करणे हे दूरच देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार घेतात. ते लोकमान्य टिळकही स्वर्गात कपाळावर हात मारून घेत असतील. मोदींच्या संपूर्ण कालखंडात महिलांवरील अत्याचारांची मालिका बघून आदरणीय बाळासाहेबांनीही स्वर्गात हे मोदींचे राज्य म्हणजे ‘रोमराज्या’पेक्षाही भयंकर आहे असेच म्हटले असेल. भाजपने उद्धवरावांना मागील राजकारणाची उदाहरणे देऊन नैतिकतेचे धडे देणे हे तर हास्यास्पदच आहे. मोदी-शाह अटल अडवाणींना विसरले, महाजन-मुंडे तर यांच्या स्मरणातही नाहीत. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब काय होते आणि उद्धवराव आणि शिवसेना काय आहेत हे कळणे दुरापास्तच. विनाकारण बाळासाहेबांच्या काळाची तुलना उद्धवरावांच्या काळाशी करणे आणि मोदी-शाह यांची अटलजी- अडवाणींशी करणे अयोग्य आहे.

अटलजींचे स्मरण करा

अटलजींनी भर लोकसभेत सांगितले होते, ‘‘किसीके पार्टी को तोडम् मरोडम्कर अगर हमें सत्ता मिलती होगी तो ऐसी सत्ता को मैं चिमटी से भी छूने कि इच्छा नहीं करुंगा,’’ असे होते अटलजी. आताच्या भाजपचे धोरण अन्य पक्षांतील नेते फोडा आणि त्यांना आपल्या पक्षात घ्या, ते बऱ्या बोलाने येत नसतील तर त्यांना ईडी, सीबीआय, आयटीच्या फासात अडकवा आणि भाजपमध्ये येण्यास भाग पाडा, एकतर भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करतात आणि पुढच्याच आठवडय़ात शरद पवार यांचा पक्ष फोडतात आणि त्यांना महाराष्ट्रात सत्तेत सामावून घेतात. कहर म्हणजे अजित पवार आपली आमदार संख्या सांगत नाहीत. शरद पवार त्यांना पक्षातून काढून टाकत नाहीत. अजितदादांना कोणी गद्दार म्हणत नाही. ते साहेबांचा फोटो वापरतात. कोणी त्यांना ‘खोके ओके’ म्हणत नाही. दादा अचानक जाऊन आशीर्वाद घेतात. आम्ही बंड केलेले नाही म्हणतात. कोणीच कोणाला व्हीप काढत नाहीत. पायऱ्यांवर कोणीच दादांविरोधात घोषणा देत नाही. शरद पवार विरोधकांच्या बैठकीलाही जातात आणि नरेंद्र मोदी यांच्या समारंभालाही जातात, विधिमंडळ अधिवेशनात त्यांचे निम्मे आमदार गायब असतात. बैठक व्यवस्थेवरून वादावादी नाही. कोर्टबाजी नाही. पक्ष कुणाचा, यावर तक्रारी नाहीत, शपथपत्र नाही की काही नाही. भाजपही यावर कोणाकडून लेख लिहून घेत नाही, तरीही पवार समर्थक म्हणतात, ‘काय चाललंय हेच आम्हाला कळत नाही.’ राज्यातील जनता भाजपचा हा तमाशा बघत निवडणुकांची वाट पाहत बसली आहे, पण सरकार निवडणुका घ्यायलाच तयार नाही. आहे की नाही लोकशाहीची चिरफाड?

भाजपने खंजीर खुपसल्याची उदाहरणे..

उद्धवरावांनी खंजीर खुपसला, अमित शाह यांनी शब्द दिलाच नव्हता वगैरे भाजपचे नेते कंठशोष करतात, पण उद्धव ठाकरे आपल्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतात ते खोटे बोलत नाहीत यावर राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तो अधिकच कमवला आहे. कोविडकाळात याच उद्धवरावांनी राज्यातीलच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान येथील नागरिकांचीही काळजी घेतली. तेव्हा केंद्र सरकार महाराष्ट्रालाच सगळे श्रेय मिळताना पाहून या राज्याच्या अडचणीत वाढ कशी होईल हेच पाहत होते. ट्रेन बंद ठेवल्या गेल्या, ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला नाही. तरीही एकीकडे गंगेत मृतदेह वाहत असताना, गुजरातमध्ये रस्त्यांवर अंत्यसंस्कार होत असताना महाराष्ट्राच्या मुंबई मॉडेलचे मात्र जगभर कौतुक होत होते. तेव्हाच या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना ‘ये उद्धवराव कम्बख्त गलतीही नहीं करता,’ हेच जाणवले. त्यामुळेच त्यांचा राजकीय बंदोबस्त करण्यासाठी चरफड सुरू झाली. तसाही भाजपचा इतिहास वापरा आणि फेका असाच आहे. सत्यपाल मलिक यांनीही याचेच उदाहरण दिले आहे आणि सत्तेसाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असे म्हटले आहे.

मोदीजींनी गुरूंनाच अडगळीत टाकले

नरेंद्र मोदी गुजरातमध्ये केशुभाई पटेलांना गुरू म्हणत, महाराष्ट्रात आले की शरद पवारांना गुरू म्हणत. केशुभाई पटेल यांचे मुख्यमंत्रीपद मोदींनी घालवले, शंकरसिंह वाघेला, संजय जोशी आणि केंद्रात लालकृष्ण अडवाणी अशी भाजपअंतर्गत अनेक नावे आहेत ज्यांना मोदींनी अडगळीत टाकले. मोदींचे राजकीय यश त्यांच्या अनेक वर्षांच्या त्याग आणि मेहनतीवर उभे आहे. ज्यांनी पक्ष आणि विचारांसाठी हालअपेष्टा सहन केल्या आणि पक्ष वाढवला मोदींनी त्यांनाच बाजूला केले. प्रवीण तोगडिया हे त्यापैकीच एक नाव जे राजकारणापासून लांब होते. स्वत:च्या उत्कर्षांत जो कोणी मध्ये आला त्या प्रत्येकाला मोदींनी कटकारस्थान करून बाजूला केले. पटेल समाजाचे नेतृत्व बाजूला केले म्हणून मोदींनी काँग्रेस विचारधारेच्या सरदार वल्लभभाई पटेलांचा राजकीय वापर केला. थोडक्यात काय तर जे मोदी भाजपच्या निष्ठावानांचे झाले नाहीत, स्वत:च्या राजकीय गुरूंचे, सहकारी बांधवांचे झाले नाहीत, संघाचे झाले नाहीत, ते इतरांना देशभक्तीविषयी सांगतात. मोदी भाजपचे नाहीत, तर भाजप मोदींचा झाला आहे. 

फसवणुकीचा इतिहास

म. गोमांतक पक्ष, मेहबूबा मुफ्ती, मायावती, ममता बॅनर्जी, नितिशकुमार, हरियाणा बिश्नोई, कुमारस्वामी अशा अनेकांशी भाजपने युती केली. पासवान यांच्या मुलाची फसवणूक करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत युती केली, मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. २०१९मध्ये शिवसेनेला निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत आश्वासन देण्यात आले. शिवसेना आणि अकाली दल जुने सहकारी असूनही पाठीत वार केले. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडली, चिन्ह गोठवले. अकाली दल १९९८ ते २०२० दरम्यान भाजपबरोबर एनडीएचा भाग होता. कृषी कायद्यांविरोधात अकाली दल बाहेर पडला.

एकंदर भाजप आणि सहयोगी पक्षांचा युतीचा इतिहास बघता शिवसेना व अकाली दल वगळता इतर सर्व पक्ष भाजपची केंद्रातली सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले. सत्ता नसतानाही  शिवसेना भाजपसोबत राहिली होती. शिवसेनेने भाजपची साथ सोडली तेव्हा भाजपकडे अनेक राज्यांत सत्ता आणि केंद्रात सत्ता होती. त्यामुळे शिवसेनेने सत्तेसाठी युती तोडली, या भाजपच्या दाव्यात तथ्य नाही. भाजपने इतिहास तपासणे गरजेचे आहे. मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकंदर सगळय़ांचा भाजपने वापर केला नंतर त्यांच्या पक्षप्रमुखांच्या कुटुंबात फूट पाडली आणि त्यांना मिंधे केले व देशोधडीला लावले.

..म्हणून उद्धव ठाकरे उजवे

उद्धव ठाकरे भाजपची ही कूटनीती ओळखून होते. ते लढत राहिले. पक्षाचे नाव काढून घेतले गेल्यावर लगेच त्यांनी पक्षाला नवीन नाव दिले. पक्षाचे चिन्ह गोठवल्यावर त्यांनी लगेच मशाल हाती घेतली. पक्षातील पदाधिकाऱ्यांना पैशाचे आमिष आणि कारवाईचा धाक दाखवून दूर केले गेले, तरीही त्यांनी निष्ठावान सहकाऱ्यांसह लढाई सुरूच ठेवली. पक्ष गेला, चिन्ह गेलं तरी कम्बख्त उद्धवराव ठाकरे खतमही नही होता हीच भाजपची खरी अडचण आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The party name symbol is gone uddhav thackeray fight is bjp problem ysh
First published on: 02-08-2023 at 00:02 IST