विधानसभेच्या जागावाटपात ८० ते ९० जागा मिळाव्यात, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करू नये अशा विविध मागण्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करण्यात आल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीत चार जागा देऊन पवार गटाला जागा दाखवून देणाऱ्या भाजपकडून या मागण्यांना फार काही महत्त्व दिले जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच ४ जूननंतर भाजप अधिक भरभक्कम झाल्यास भाजपपुढे झुकण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय नसेल.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने फुंकले. लोकसभेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी विधानसभेला अधिकच्या जागा मिळाव्यात, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची भूमिका समोर आली. पण ही मागणी करताना वेळ चुकल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील सारी गणिते अवलंबून आहेत. लोकसभेत भाजपला चांगले संख्याबळ मिळाल्यास राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाला फारसे महत्त्व दिले जाणार नाही हे निश्चित आहे. समजा कमी जागा मिळाल्या आणि मित्र पक्षांवर सरकार अवलंबून असेल तरच राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला किंमत वसूल करता येईल. पण हे सारे निकालावर अवलंबून असताना राष्ट्रवादीने भाजपला आव्हान देण्याचा आधीच प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा निवडणुकीतील प्रचारामुळे चर्चेत; कारण काय?
मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची भाजपची योजना लपून राहिलेली नाही. गेले आठवडाभर मनुस्मृतीवरून काँग्रेस, शरद पवार, रामदास आठवले आदींनी विरोधी सूर लावला. पण भाजपकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी विचारधारा सोडणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच आम्ही सरकारमध्ये असेपर्यंत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होऊ देणार नाही, असा इशारा दिला. पण भाजप आणि संघ परिवाराचा तो ठरलेला कार्यक्रम असल्यास राष्ट्रवादीने कितीही विरोध केला तरीही भाजपचे नेते त्याला प्रतिसाद देण्याची अजिबात शक्यता नाही.
जागावाटपावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. लोकसभेला आपली उपेक्षा झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीला फक्त चारच जागा मिळाल्या. यातील किती निवडून येतात हे पुन्हा महत्त्वाचे. राष्ट्रवादीने ८० ते ९० जागांची मागणी केली असली तरी भाजपला राष्ट्रवादीसह शिवसेना व अन्य छोट्या पक्षांना जागावाटपात सामावून घ्यायचे आहे. मित्र पक्षांचा सन्मान राखला जाईल, पण भाजप हा मोठा भाऊ असेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. भाजप १५० ते १७५ जागा लढविण्याची तयारी करीत आहे. मित्र पक्षांना १०० ते १२५ जागांपेक्षा अधिक जागा सोडल्या जाणार नाहीत. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यास भाजपचा भाव अधिकच वाढेल.