scorecardresearch

कॉक्लिअर इम्प्लान्टसारख्या महागड्या उपचार तंत्राचे नेमके काय करायचे?

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कॉक्लिअर इम्प्लान्ट या उपकरणासंदर्भातील अडचणींविषयी-

कॉक्लिअर इम्प्लान्टसारख्या महागड्या उपचार तंत्राचे नेमके काय करायचे?
कॉक्लिअर इम्प्लान्टसारख्या महागड्या उपचार तंत्राचे नेमके काय करायचे? ( छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया )

अर्चना कोठावदे

कर्णबधिरत्व ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे. त्याच्यावर उपचार म्हणून कॉक्लिअर इम्प्लान्ट ही शस्त्रक्रिया केली जाते. ती जितक्या लहान वयात केली जाईल तितके तिचे चांगले परिणाम मिळतात. या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे १० ते १२ लाखांच्या आसपास खर्च येतो. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो त्यामुळे ते अशा शस्त्रक्रियेच्या मागे न जाता श्रवणयंत्र लावून मुलाचे शिक्षण सुरू करतात. पण या पालकांना मदत करण्यासाठी सरकारच्या काही योजना असतात. त्याशिवाय अनेक समाजसेवी संस्था, अनेक दाते कॉक्लिअर इम्प्लान्टसाठी मदत करतात.

ही शस्त्रक्रिया करण्याआधी संबंधित कर्णबधिर मुलांच्या बेरा, सिटी स्कॅन, एम. आर. आय. यांसारख्या काही चाचण्या केल्या जातात. त्यांचे अहवाल पाहूनच कॉक्लिअर इम्प्लान्ट करावे की नाही, त्याचा त्या मुलाला फायदा होईल की नाही हे ठरवले जाते. आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. अनेक पालक या ना त्या प्रकारे पैशाची तजवीज करून आपल्या मुलाची किंवा मुलीची ही शस्त्रक्रिया करून घेतात.

खरे तर पालकांच्या मेहनतीला, प्रयत्नांना खरी सुरुवात व्हायला हवी ती इम्प्लान्ट झाल्यानंतर. पण स्वतःच्या मुलीचे लग्न आटोपल्यावर कसे पालक निश्चिंत होतात तसे हे सर्व पालक झाले एकदाचे इम्प्लान्ट, असे म्हणून एकदम निवांत होतात आणि आपापल्या कामाला लागतात. इथेच मुलाच्या प्रगतीची वाढ खुंटते. इम्प्लान्टनंतर होणारी मुलाची थेरपी, त्याचे मॅपिंग, त्याला जास्तीत जास्त ऐकवणे, त्याच्याशी जास्तीत जास्त बोलणे हे खूप महत्त्वाचे असते. पण याकडेच पालक दुर्लक्ष करतात. मग मुलाचे बोलणे खूप कमी होते. त्याला अभ्यास समजत नाही. त्याचे ऐकण्याकडे दुर्लक्ष होते. मग ते येऊन सांगतात, ताई बघा ना, याला एवढे इम्प्लान्ट करूनपण काहीच येत नाही. काही पालकांनी मात्र आपल्या इम्प्लान्ट झालेल्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षांची पातळी इतकी खाली आणून ठेवली असते की मुलाने एक शब्द बोलला तरी इम्प्लान्ट यशस्वी झाले असे त्यांना वाटते. आपल्या मुलानेदेखील इतर मुलांसारखे शिकावे, वाचावे असे त्यांना वाटतच नाही.

इम्प्लान्ट झालेल्या मुलांच्या पालकांच्या प्रतिक्रिया :

१) दीपाली काळे –
माझ्या मुलीचे इम्प्लान्ट वयाच्या चौथ्या वर्षी झाले. पुढच्या महिन्यात ती सात वर्षांची होईल. म्हणजे इम्प्लान्ट होऊन तीन वर्षे झाली. आता साधारणपणे ती स्वतःच्या मनाने वीसेक शब्द बोलू शकते. इम्प्लान्टनंतर तीन वर्षांत साधारणपणे इम्प्लान्टचे केबल आणि हुक हे दोन छोटे भाग बदलायची वेळ आली. इम्प्लान्टच्या दुरुस्तीचा खर्च मात्र खूप असतो.

२) दीपक शेलार –
माझ्या मुलीचे इम्प्लान्ट ती पाच वर्षांची असताना झाले. आज इम्प्लान्ट होऊन एक वर्ष झाले. आता ती तीन शब्द बोलते. वेळोवेळी सेशन व्हायला हवे. तरच मुलांची प्रगती होऊ शकते. मशीन सुरू बंद करायचे बटण खराब झाले आहे.

३) सुवर्णा भोसले –
माझ्या मुलाचे इम्प्लान्ट तो आठ वर्षांचा असताना झाले. आज इम्प्लान्ट होऊन सहा वर्षं झाली आहेत. तो रोजच्या वापरातील भाषा बोलतो. पूर्ण वाक्यात बोलू शकतो. पण पुस्तकातील भाषा तो लक्षात ठेवून, पाठ करून पूर्ण वाक्यात बोलू शकत नाही. इम्प्लान्ट केले की लगेच पुढे येणाऱ्या दुरुस्तीचा खर्च लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करून ठेवायला हवे. तसेच लहान वयातच इम्प्लान्ट व्हायला हवे.

४) अनिल कळंबे –
माझ्या मुलाचे इम्प्लान्ट तो साडेपाच वर्षांचा असताना झाले. आता त्याच्या इम्प्लान्टला एक वर्ष होईल. तो आता पाच-सहा शब्द स्वतःहून बोलतो. त्याचे मशीन एकदाही खराब झाले नाही.

५) योगिता कांगणे –
माझ्या मुलीचे इम्प्लान्ट ती अडीच वर्षांची असताना झाले. त्यानंतर सहा महिने मशीन लावले. पण मशीन लावले तसा तिचा डोळा बारीक व्हायला लागला होता. मग पुढे साताठ महिने मशीन लावलेच नाही. मग डोळ्यांच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. डोळा बरा झाल्यावर आवाज खूप कमी करून मशीन लावले. आज इम्प्लान्ट होऊन चार वर्षे झाली. ती चार-पाच शब्द बोलते.

६) अनुपमा संचेती –
माझ्या मुलाचे इम्प्लान्ट तो तीन वर्षांचा असताना झाले. इम्प्लान्ट होऊन आज चार वर्षे झाली. आतापर्यंत बॅटरी, केबल यांचा साधारणपणे ३० हजार ते ३२ हजार रुपये खर्च आला आहे. तो आता चार ते पाच शब्द स्वतःच्या मनाने बोलू शकतो.

७) रितंभरा जंगले –
माझी मुलगी साडेपाच वर्षांची असताना इम्प्लान्ट झाले. आज इम्प्लान्ट होऊन १२ वर्षे झाली. इम्प्लान्टनंतर तिचे मशीन एकदा चोरीला गेले. मग सेकंड हॅन्ड मशीन वापरावे लागले. २०१५ मध्ये नवीन मशीन घेतले. त्यानंतर दोन वेळा बॅटरी घ्यावी लागली. १२ हजार रुपयांची एक बॅटरी होती. साधारणपणे दहा वर्षांनी मशीन अपग्रेड करावे लागते. त्याचा खर्च अंदाजे चार ते पाच लाख रुपये येतो. आजकाल बऱ्याच लहान-मोठ्या वस्तूंचा विमा मिळतो. पण या इम्प्लान्टच्या मशीनचा मात्र मिळत नाही. असे का? तो मिळायला हवा. तसेच इम्प्लान्ट झालेल्या मुलांना वैद्यकीय विमा नाकारला जातो, असे का? त्यांच्या एलआयसीसारख्या पॉलिसीदेखील काढता येत नाहीत, याचादेखील विचार व्हायला हवा. इम्प्लान्टचे मशीन आणि त्याचे भाग यावर १८ टक्के जीएसटी असतो. खरेतर तो नाही लावला पाहिजे. आता माझी मुलगी छान ऐकते, बोलते. उत्स्फूर्तपणे तीनचार वाक्येदेखील बोलू शकते. पण वरील सर्व मुद्द्यांचा विचार व्हायला हवा.

८) ज्योती शिंदे –
माझ्या मुलाचे इम्प्लान्ट तो अडीच वर्षांचा असताना झाले आहे. आता इम्प्लान्ट होऊन तीन वर्षे झाली. तो दहा ते १५ शब्द बोलू शकतो. मशीन आतापर्यंत दोन ते तीन वेळा खराब झाले. आतापर्यंत २५ हजारांच्या आसपास खर्च आला आहे. शिवाय मॅपिंगसाठी खर्च येतो तो वेगळाच.

९) राणी सुर्वे –
माझी मुलगी दोन वर्षांची असताना तिचे इम्प्लान्ट झाले. आज चार वर्षे झाले. ती “पप्पा” हा एक शब्द बोलू शकते. इम्प्लान्ट झाल्यापासून मशीन दोन वेळा बंद पडले. पहिल्या वेळी पैसे लागले नाहीत, पण दुसऱ्या वेळी ४५ हजार रुपये लागले.

इम्प्लान्टबाबत पालकांच्या या अशा प्रतिक्रिया आहेत. खरेच का इम्प्लान्ट झालेल्या मुलांनी केवळ काही शब्दच बोलणे अपेक्षित असते? इम्प्लान्ट झाल्यानंतर या मुलांच्या ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या प्रगतीचा आलेख हा वर वर जाणारा म्हणजेच चढता असायला हवा. अनेक मुलांच्या बाबतीत तो थोडा वर जाऊन पुढे एका सरळ रेषेत आडवा जात राहतो. त्यांच्या पालकांना आर्थिक भारदेखील खूप पेलावा लागतो आहे. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. या पालकांनी थोडे जागरूक राहून या सगळ्या गोष्टींकडे पाहायला हवे. फक्त इम्प्लान्ट केले म्हणजे झाले असे नसते. त्यानंतर होणारी थेरपी खूप महत्त्वाची असते. मुलाला आवाज ऐकवणे, तो ओळखता येणे, आवाजातील फरक समजणे, घरात त्याच्याशी खूप खूप बोलणे, त्याला योग्य आवाजास प्रोत्साहन देणे, त्याच्या स्पष्ट शब्दास शाबासकी देणे. त्याला बाहेर मुलांमध्ये घेऊन जाणे, उस्फूर्त बोलण्याच्या संधी उपलब्ध करून देणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलांची प्रगती करायची असेल तर पालकांनो जागरूक राहा. डोळसपणे या सर्व गोष्टींकडे बघा.

लेखिका नाशिक येथील महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित

श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात विशेष शिक्षिका आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या