प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये

सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य केवळ एका लेखात मावणारे नाही. त्यांचा जीवनपट अनंत आव्हाने आणि खडतर वळणांनी भरलेला आहे. या महामानवांची चरित्रे वाचताना आपण काय करत आहोत? आपल्या भोवतालात आणि एकूणच देशाच्या उभारणीत आज आपले योगदान काय, असे प्रश्न पडतात आणि आपण या परीक्षेत नापास झाल्याचे जळजळीत वास्तव समोर उभे ठाकते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झाला. तेव्हा जोतीरावांचेही वय होते अवघे १३ वर्षांचे. सावित्रीबाईंच्या वडिलांच्या घरी पाटीलकी होती. नेवसे गावचे पाटील असलेले वडील विठ्ठलराव यांनी आपल्या लेकीवर शिक्षणाचे संस्कार केले होते. त्या काळात सर्वत्र क्रांतिकारी विचारांचे वारे जोरात वहात होते. एकोणिसाव्या शतकात जगभर स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या मूल्यांसाठी चळवळी सुरू होत्या. दुसरीकडे भारतीय समाजमनावर धर्माचा प्रचंड पगडा होता! कट्टर वर्णव्यवस्था, जातीभेद यांनी भारतातील वातावरण गढूळ झाले होते. मानवतेच्या धर्माला ग्लानी आली होती.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

अनेक शतकांपासून चालत आलेला वारकरी संप्रदाय केवळ मंदिरात बंदिस्त झाला होता. ‘या रे या रे लहान थोर’ हा विचार मावळतो की काय अशी परिस्थिती होती. ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग ऐकू येत नव्हते. सगळीकडे भोंदू-बाबांचा सुळसुळाट झाला होता. असे असताना युवा जोतीराव फुले काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होते. सत्यनारायणाची कथा मोठ्या भावभक्तीने ऐकणारा समाज आपल्या घरातील बालविधवा सुनेला सती जाण्यास भाग पाडत होता. तिचे केशवपन करून तिला बंदिस्त कोठडीत टाकण्यास मागेपुढे पहात नव्हता. भोवतालची प्रचंड विषारी विषमता, गरिबी, दारिद्र्य, उपासमार, स्त्रियांचा प्रचंड छळ इत्यादी पाहून जोतीराव मनोमन व्यथित झाले होते. तरुण जोतीराव रात्र-रात्र याचाच अखंड विचार करत. यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

हेही वाचा : धार्मिक उत्सव जरूर असावेत… पण त्यात सरकार कसे सहभागी होऊ शकते?

असे विचारांचे वादळ सुरू असताना सावित्रीबाई १५-१६ वर्षांच्या झाल्या. भोवताली अनेक बालविधवा झालेल्या, केशवपन केलेल्या, घरात बंदिस्त आयुष्य कंठणाऱ्या युवा भगिनी पाहून यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, यांना लेखन, वाचन शिकवायला हवे, असे जोतीरावांना मनापासून वाटू लागले, मात्र यांना शिकवायला स्त्री शिक्षिका कुठून आणायची, हा फार मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आणि हा प्रश्न आपल्या घरातूनच सोडवायचे त्यांनी ठरवले. आपली पत्नी सावित्रीबाईंना लेखन, वाचन आणि अध्यापन शिकवायचे असे जोतीरावांनी ठरवले. हे फार मोठे क्रांतिकारी पाऊल होते! चूल आणि मूल विचारसरणीत अडकलेला बुरसटलेला समाज हे स्वीकारेल का, याचा तीळभरही विचार न करता जोतिबा कामाला लागले आणि त्यांच्या युवा पत्नी सावित्रिबाईंनी त्यांना खंबीर साथ द्यायचे ठरवले! त्यानंतरचा त्या दोघांचा संपूर्ण जीवनपट मोठा क्रांतिकारी ठरला.

जोतीराव-सावित्रीबाई यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून आपल्या क्रांतीचे रणशिंग फुंकले. आधी घरातील पाण्याची विहीर समाजासाठी खुली करून त्यांनी क्रांतिकारी कार्य सुरू केले होतेच. मुलींच्या शाळेत जाताना सावित्रीबाईंना कर्मठ विचारांच्या समाजाने अतोनात छळले. शिव्यांची लाखोली, शेण, चिखल, सडकी अंडी असे बरेच काही त्यांना सहन करावे लागले. एवढ्यावरही समाज थांबला नाही. सावित्रीबाईंना अक्षरशः दगडही मारले जात. त्यात सावित्रीबाई रक्तबंबाळ होत, तरीही त्यांनी त्यांचे काम थांबवले नाही. अविरतपणे आपले काम करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंगावरील एका लुगड्याचे दोन तुकडे करून त्यांनी एक अंगावर शेण-चिखल-सडकी अंडी झेलण्यासाठी आणि दुसरे शाळेत गेल्यावर शिकवण्यासाठी वापरले!

हेही वाचा : स्वत:च्याच कार्यकाळातील भ्रष्टाचारावर टीका?

शिक्षणाचे काम सुरू असताना जोतीरावांकडून लेखनाचे बाळकडू घेतले आणि एकही दिवस शाळेत न गेलेल्या सावित्रीबाई लेखिका, कवयित्री झाल्या. त्यांचे ‘काव्यफुले’ (काव्य संग्रह), ‘सुबोध रत्नाकर’, ‘सावित्रीबाईंची गाणी’, ‘बावनकशी’ इत्यादी चार महत्वपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत.

शाळेशिवाय ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही

बुद्धी असुनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?

असे रोखठोक काव्य लिहून समाजाची कानउघाडणी करणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ वर्गातीलच नाही तर समाजातील लोकशिक्षक झाल्या. त्यांचे विचार फारच प्रगल्भ आणि दिशादर्शक होते. जोतीरावांचे निधन झाल्यानंतर दत्तक पुत्राने अग्नी देण्यास लोकांचा विरोध झाला, तेव्हा सर्व रीतीरिवाज झुगारून स्वतः आपल्या पतीच्या सरणाला अग्नी देण्याचे क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचलले. पुढे पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली. स्वतःला झोकून देऊन प्लेगग्रस्तांना दवाखान्यात नेण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. यातच प्लेगची लागण होऊन वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एका क्रांतिकारी, कृतिशील, समाजऋण फेडणाऱ्या महान व्यक्तीचा अंत झाला.

हेही वाचा : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना समाजशास्त्र महत्त्वाचे वाटत नाही का?

आज आपण स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळा’त काय करत आहोत? आज चळवळी कुठे आहेत? शिकेलेली मंडळी काय करत आहे? उच्च शिक्षित स्त्रिया काय वाचत, लिहित, बोलत आहेत? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. तासनतास मोबाइलच्या निर्जीव काचेवर बोट फिरवून थकलेला तरुण वर्ग काय चिंतन करत आहे? शिक्षणाची अवस्था काय आहे? असे अनंत प्रश्न आज महान कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी सतावत आहेत. त्यावर उत्तर शोधणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

(लेखक व्याख्याता, कवी, कीर्तनकार आहेत.)

jaybhayev@gmail.com