भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ या पहिल्यावहिल्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी ठरली असली तरी त्यामुळे आकाश कोसळल्यासारखे घाबरून जाण्यासारखे काही नाही. एक तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते व कुठलेही तंत्रज्ञान त्याच्या चाचण्या केल्याशिवाय नेहमीच्या वापरासाठी योग्य ठरू शकत नाही. ‘निर्भय’ हे अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या प्रकारातील क्षेपणास्त्र असून टॉमहॉकच्या निर्मितीतही प्राथमिक उड्डाणे ही अशीच फसली होती. मुळात म्हणजे ‘निर्भय’चे उड्डाण फसलेले नाही, ते जवळपास ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी केला आहे. अदमासे २०० कि.मी. अंतर उंची गाठल्यानंतर ते क्षेपणास्त्र भरकटल्याने ते एका विशिष्ट टप्प्यावर बंगालच्या उपसागराच्या परिसरात पाडण्यात आले. ते पाडण्याचा निर्णयही योग्यच होता कारण तसे केले नसते तर प्राणहानी होऊ शकत होती.  विशेष म्हणजे भारताच्या ‘अग्नि’ या क्षेपणास्त्राच्याही प्राथमिक चाचण्या अपयशी ठरल्या होत्या, त्यामुळे चाचणी, तीही पहिली अपयशी ठरल्याने वैज्ञानिकांनी खचून जाण्याचे कारण नाही. त्यांच्यावर इतरांनीही ‘अपयशाचे धनी’ असा शिक्का मारण्याचे कारण नाही. असे असले तरी बंगळुरू येथे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या संस्थेत गेली सात वर्षे अथक परिश्रम करून ‘निर्भय’ हे क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या डॉ. अविनाश चंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला या अपयशामुळे वाईट वाटले असेल तर ते स्वाभाविकच आहे. आता या क्षेपणास्त्राच्या या उड्डाणाचे विश्लेषण सुरू आहे व एक महिन्यात त्यातील नेमके दोष हुडकून काढले जातील, नंतर त्याची चाचणी यशस्वी होईल यात शंका नाही. पाकिस्तानने ‘राद’ व ‘बाबर’ ही क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्यांची क्षमता ७०० कि.मी. आहे. पाकिस्तानबरोबरच्या या स्पर्धेत भारत काहीसा मागे पडला असल्याची टीका होते आहे पण यात हे लक्षात घ्यायला हवे की, पाकिस्तानची क्षेपणास्त्रनिर्मिती ही कॉपी करून पास होणाऱ्या मुलांसारखी आहे. ती केव्हा दगा देईल याचा नेम नाही. १९९८ मध्ये पाकिस्तानने त्यांच्या देशात पडलेली टॉमहॉक क्षेपणास्त्रे उचलून तशीच बनवण्याचा प्रयत्न केला, पण क्षेपणास्त्राला इंजिन लागते ते त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांच्या आवडत्या मित्राकडून म्हणजे चीनकडून ते घेतले व चाचण्या यशस्वी केल्या. त्यामुळे आपले यश हे कालहरण करणारे असले तरी चिरंतन असणार आहे, ही अभिमानाची बाब आहे. पाकिस्तान म्हणजे, आयजीच्या जिवावर बायजी उदार, असा प्रकार आहे. म्हणजे, चीनच्या जोरावर त्यांच्या सगळ्या बढाया आहेत. भारताच्या ‘निर्भय’ क्षेपणास्त्रातही टबरेफॅनसह काही परदेशी बनावटीचे भाग वापरलेले आहेत. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे कार्यक्षमरीत्या वापरात आणण्यास पाच ते सहा वर्षे लागणार आहेत. त्यामुळे या अपयशाने खचून न जाता आता तातडीने त्याच्या आणखी चाचण्या घेण्याची गरज आहे. त्यातील आणखी काही सुटे भाग भारतातच कसे तयार करता येतील याचाही विचार करायला हवा. भारताकडे सध्या ‘ब्राह्मोस’ हे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्यात आपण रशियाची मदत घेतली व नंतर बऱ्याच प्रमाणात स्वयंपूर्णताही मिळवली. ‘निर्भय’चे वेगळेपण म्हणजे ते ‘अग्नि’ किंवा इतर क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे आहे. ते उडताना अग्निबाणासारखे उडते व नंतर काही उंचीवर त्याचे पंख पसरले जातात, ते पक्ष्यासारखे घिरटय़ा घालू लागते. योग्य स्थान, वेळ निवडून मगच लक्ष्यावर आघात करते. खूप कमी उंचीवर उडत असल्याने ते, पक्षी उडतो तसे भासते, त्यामुळे शत्रूला चकवा बसतो. भारतीय लष्कराला तातडीने पंधराशे कि.मी. पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गरज आहे, त्याचा विचार करता स्वस्थ बसून चालणार नाही हे खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First step of sucess
First published on: 14-03-2013 at 02:24 IST