परंपरा म्हणून कलेत ज्या गोष्टी अभिमानपूर्वक जपल्या जातात, त्या ओलांडून पुढे कसे जायचे हा प्रश्न पडणारे कलावंत मुळात कमी. प्रश्न पडला, तरी उत्तर सापडणारे त्याहून कमी. गणेश पाइन यांना परंपरेच्या पुढे जाणारी उत्तरे सापडली होती, म्हणून बंगालच्या कलाप्रवाहात ते वेगळे ठरले. हा बंगाली कलाप्रवाह १९३० व ४०च्या दशकांत नवी वाट शोधणाराच होता, परंतु शांतिनिकेतनातील कलाभवनाची मुक्त अभिव्यक्ती आणि कोलकात्याच्या सरकारी कला महाविद्यालयातील मानवाकृती चित्रणावरला भर यांच्या परंपराच पुढल्या दशकांत तयार झाल्या. या परंपरांची बंधने ओलांडायची आहेत, तोडून टाकायची नाहीत, हे पाइन यांनी ओळखले आणि रवींद्रनाथ टागोरांची मुक्त रेषा आणि सरकारी महाविद्यालयातील कौशल्य यांचा संगम पाइन यांनी आपल्या मानवाकृतींत केला. रंग अगदी मातकट म्हणावेत असे वापरून, काळय़ाकरडय़ा छटांनाच अधिक महत्त्व देऊन रेषांमधून आकार, अवकाश आणि मिती व खोली (डेप्थ) दाखवणारी चित्रे त्यांनी केली. चित्रे तैलरंगाने कॅनव्हासवर केलेली असोत की बॉलपेनाने कागदावर चितारलेली, चेहऱ्यांवरले नाटय़मय, प्रकाशमान उंचवटे आणि साऱ्याच चेहऱ्यांना व्यापून चित्रभर उरणारे ते शांत, गंभीर आणि काहीसे विरागी भाव पाइन यांच्या चित्रांचे अलौकिकत्व सिद्ध करणारे ठरले. डोळय़ांत बुबुळे न दाखवता काळे करण्याचा प्रयोग पुढेही अनेक बंगाली चित्रकारांनी केला, पण या अनुयायांच्या चित्रांतील ते डोळे भेसूर वाटतात, तर पाइन यांची चित्रे गूढ म्हणजे भीतीदायक नव्हे, असा दिलासा देतात! सुनील गंगोपाध्याय, सत्यजित राय आदींसह १९६०च्या दशकात अड्डा जमवणारे गणेशदा गेल्या २० वर्षांत मात्र एकांडे झाले होते. ते खूप बोलत, पण समविचारींचे साहचर्य त्या गप्पांत नसे. कलेच्या बाजाराने पाइन यांना फार लवकर ज्येष्ठ केले असा एक प्रवाद होता आणि आकडे त्यातील तथ्यही दाखवतील; परंतु पाइन यांनी परंपरांचा जो मेळ आपल्या चित्रांमध्ये घातला, मानवी मनोव्यापाराची जी अभिजात कोडी आपल्या मानवाकृतींतून मांडली, त्यांमुळे पाइन यांचे ज्येष्ठत्व चाळिशीतही सिद्धच झाले होते. मंगळवारी त्या अभिजात, अज्ञेय गूढाच्या प्रवासाला पाइन जरा अकालीच, ७६व्या वर्षी निघून गेले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2013 रोजी प्रकाशित
गणेश पाइन
परंपरा म्हणून कलेत ज्या गोष्टी अभिमानपूर्वक जपल्या जातात, त्या ओलांडून पुढे कसे जायचे हा प्रश्न पडणारे कलावंत मुळात कमी. प्रश्न पडला, तरी उत्तर सापडणारे त्याहून कमी. गणेश पाइन यांना परंपरेच्या पुढे जाणारी उत्तरे सापडली होती, म्हणून बंगालच्या कलाप्रवाहात ते वेगळे ठरले.

First published on: 14-03-2013 at 02:31 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh pain