सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे जेवढे खरे, तेवढेच सत्तेने शहाणपण येते हेही खरे. भारतीय जनता पक्ष देशात आणि विविध राज्यांत सत्तास्थानी आल्यानंतर या पक्षाची ‘करनी’ आणि पूर्वीची ‘कथनी’ यात खूपच अंतर होते. तो या शहाणीवेचाच परिपाक होता. भाजपचे बिहारी संस्कृतीत मोठे झालेले नेते गिरिराज सिंह यांना मात्र त्या सुज्ञतेचा स्पर्शही झाला नसल्याचे त्यांच्या एकंदरच वक्तव्यांवरून दिसते. आधी याच गिरिराजांनी, मोदी यांना मतदान न करणाऱ्यांना पाकिस्तानात धाडण्याच्या वक्तव्याचे तारे तोडून त्यांनी ऐन निवडणुकीत खळबळ माजवून दिली होती. निवडणूक प्रचारात माणसे अनेकदा अशी एकेरीवर येतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसते, हे लोकांनाही माहीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आणि माध्यमांनी त्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली, तरी सामान्य नागरिकांनी त्याकडे दुर्लक्षच केले. या दोन्ही गोष्टींमुळे बहुधा गिरिराज चेकाळले असावेत. त्या भरात त्यांनी त्यांचा आणि संघपरिवारातील काही वाचाळ नेत्यांचा, ‘सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात, परंतु सगळेच दहशतवादी मुसलमान असतात,’ हा आवडता सिद्धांत मांडला. वस्तुत: या अशा गोष्टींपासून भाजप राजकीय वर्तनाच्या पातळीवर केव्हाच दूर आले आहे. देशात मंडल विरुद्ध कमंडल असा जो वाद झाला, त्या वादळातून अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार जन्मास आले. मात्र तरीही सत्तेवर आल्यानंतरचे वाजपेयी सरकारचे राजकीय वर्तन हे भाजपच्या ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या भूमिकेहून खूपच वेगळे होते. मोदी यांना राजधर्माची आठवण करून देणारे वाजपेयी हे त्या अर्थाने सेक्युलरच. किंबहुना भाजपचे नेते आजही ही गोष्ट अभिमानाने सांगतात, की भाजपशासित राज्यांत हिंदू-मुस्लीम दंगलींची संख्या घटली. ती आकडेवारी किती खरी, हा भाग वेगळा. मुद्दा हा, की भाजपची सत्तेवर आल्यानंतरची अल्पसंख्याकांबाबतची वागणूक ही काँग्रेस वा अन्य कोणत्याही पक्षाहून वेगळी नव्हती, असा यापूर्वीचा अनुभव आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढलेल्या ताज्या निवडणुकीतही भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आला होता. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने पुढे आणलेला मोदींच्या जातीचा मुद्दा आणि फैजाबादच्या सभेत लावण्यात आलेला राम मंदिराचा फलक या दोन गोष्टींनी तर भाजपने एरवी हिंदुत्वाचा कार्यक्रम किती मागे सोडला आहे हेच अधोरेखित केले. या निवडणुकीतला प्रचाराचा नेमका मुद्दा, हे तसे अदृश्यच प्रकरण होते. पण जो दिसला तो विकासाचा आणि सुप्रशासनाचा मुद्दा होता, हे नक्की. तेव्हा उद्या भाजपची सत्ता आली, तर तो विजय हिंदुत्वाचा नसून, विकासाच्या आणि सुप्रशासनाच्या मुद्दय़ाचा आहे, असे बिनदिक्कत म्हणता येईल. असे असताना गिरिराज सिंह यांनी छद्म धर्मनिरपेक्षतावादावर दुगाण्या झाडत मुस्लीमविरोधी वक्तव्य करण्याचे काहीच कारण नव्हते. सगळेच दहशतवादी एका विशिष्ट समाजाचे कसे असतात, असा प्रश्न उपस्थित करताना, या देशातील सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना नक्षलवाद्यांची आहे, हेही ते विसरलेले दिसतात.  मोदी सत्तेवर आले तर अल्पसंख्याकांचे काही खरे नाही, असा भयगंड निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. आपण ते खोडून काढायचे की त्यात तेल ओतायचे याचे भान गिरिराज यांना राहिले नाही. तसेच असे करून नव्या सरकारसाठी आपण अपशकुनीमामा ठरत आहोत याची जाणीवही त्यांना राहिलेली नाही. माध्यमांना अशा भडकपणाची नेहमीच ओढ. त्यातून गिरिराज यांच्यासारख्यांना प्रसिद्धी मिळते. अशीच प्रसिद्धी पूर्वी प्रवीण तोगाडियांना मिळत असे. तशा प्रसिद्धीची नशा चढली की मग माणसे बोलण्याऐवजी बरळू लागतात. हा त्यातलाच प्रकार म्हणून सोडून देणे बरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh courts controversy again says all terrorists belong to a particular community
First published on: 15-05-2014 at 02:44 IST