नायकांचे राजकीयीकरण केले जाते, तेव्हा त्या नायकांना बेडय़ाच पडतात. हे स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यपूर्व, पेशवेकालीन, पौराणिक अशा सर्वच काळांतल्या नायकांबद्दल आज खरे ठरताना दिसते. अशा नायकांच्या राजकीयीकरणातून आपापल्या अस्मिता जपल्या जाताना दिसतातच, परंतु हेच आपल्याला नायक का वाटतात? ज्ञानाच्या क्षेत्रातले नायक आपण स्वीकारत नाही, राजकीय इतिहास हाच ‘खरा इतिहास’ असे मानतो आणि त्या इतिहासात गुदमरून जातो.. ब्राह्मण आणि मराठा या दोन प्रमुख समाजगटांचा अस्मितावाद याच अंगाने जातो आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व सत्तास्थानांवर मराठा समाज राहिल्यानंतरही अद्याप  ब्राह्मण आणि मराठा समाजांतील छुपा संघर्ष संपत नाही, याला आजची व्यावहारिक कारणे दिसत नाहीत; परंतु ऐतिहासिक कारणे मात्र आहेत. असे असताना, या दोन समाजांतील महाराष्ट्रातील एकेकाळचे दोन्ही सत्ताधीश एकमेकांबद्दल असे भयग्रस्त का आहेत? त्याचे सामाजिक परिणाम काय होत आहेत? या प्रश्नांची खरे तर चांगली समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहाणी करायला हवी. पण विद्यापीठातही संशोधनाच्या दृष्टीने सर्व आनंदीआनंदच असल्याने अशा महत्त्वाच्या विषयांवर काहीही काम झालेले दिसत नाही. त्यामुळे या विषयासंबंधी अगदी स्पष्टपणे जाणवणाऱ्या काही ठळक बाबी या लेखातून मांडण्याचा विचार आहे.
२०० वर्षांच्या वासाहातिक काळात आपल्या जीवनात खूपच सखोल बदल झाले. नवी नीतिमूल्ये, सामाजिक रचना, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रशासन पद्धती सारेच आमूलाग्र बदलले. पारंपरिक व्यवस्थेची नव्याने चिकित्सा करून ती बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा सारा काळ युरोपातील १४५३ नंतर घडलेल्या धर्मसुधारणेच्या चळवळीसारखा होता. परंतु युरोपमध्ये धर्मसुधारणेपाठोपाठ प्रबोधन युग आले, ज्ञानविज्ञानातील नवसंशोधनाची लाटच आली, तसे काही भारतात घडले नाही. जॉन विक्लीफने बायबलचे भाषांतर सोप्या इंग्रजीत करून लोकांना पोपच्या नव्हे तर बायबलच्या आज्ञा पाळा, असा सल्ला दिला. अनेक धर्मसुधारकांनी यासाठी प्राणही दिले. त्यामुळेच ज्ञानविज्ञानाची चर्चच्या तावडीतून सुटका झाली. महाराष्ट्रातही ज्ञानेश्वरांनी गीतेचा मराठीत अनुवाद केला, पण त्यातून लोक चिकित्सेऐवजी भक्तिपंथाकडे वळले. ‘तुका झालासे कळस’ असे जरी आपण गौरवाने वर्णन केले तरी यातून लोकांच्या भौतिक परिस्थितीत काहीही बदल घडला नाही, हे नजरेआड करून चालणार नाही. प्रबोधनाऐवजी भक्तिमार्ग ही वाट आपण तेव्हा निवडली. आपल्या सामाजिक स्थितीचे भौतिक आधार शोधणे व भौतिक समस्यांचे भौतिक उत्तर शोधणे हा प्रयत्नच आपण केला नाही.
गॅलेलिओ हा धर्मनिष्ठ ख्रिश्चन होता, पण त्याने असे म्हटले होते की, ‘ईश्वराने आम्हाला दोन पुस्तके दिली आहेत- एक आहे बायबल व दुसरे आहे सभोवतालचा निसर्ग. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार निश्चितपणे पोपला व चर्चलाच आहे, पण निसर्गाचे पुस्तक वाचण्याचा व त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालाही आहे.’ यातून युरोपात मन्वंतर घडले. भारतात मात्र निसर्गाचे पुस्तक वाचण्याच्याही वाटेला कुणी गेले नाही, अर्थ लावणे तर दूरच! त्यामुळे पंथोपपंथ निघाले पण मूलभूत ढाचा तोच राहिला.
ब्राह्मणेतर चळवळीतही क्षात्र जगद्गुरू पीठ निर्माण झाले, पण मूलभूत ज्ञानविज्ञानाच्या वाटेला कुणी गेले नाही. त्यामुळे आमची आधुनिकता फक्त पोशाखीच राहिली. ती आतमध्ये गेलीच नाही. आम्ही आजही सरंजामी काळातील मूल्येच जोपासतो. तेच अहंगंड व न्यूनगंड जोपासतो. याचेच ठळक उदाहरण म्हणजे आजचे ब्राह्मण व मराठा जातीतील लोकांचे वर्तन. आपण फारच बुद्धिमान आहोत असे ब्राह्मणांना उगाचच वाटते. प्राचीन काळातील ऋषी हे आपले ज्ञानरचनाकार (इंटलेक्चुअल हीरो) आहेत असे ते मानतात. शिवाय प्रबोधनाच्या काळातील चळवळीतही अनेक ब्राह्मणांचा सहभाग असल्याने तेही आपले ज्ञानरचनाकार आहेत असे ते (प्रत्यक्षात ते या नेत्यांच्या मांडणीशी सहमत नसले तरी!) मानतात. मराठय़ांनी ब्राह्मणेतर चळवळीद्वारे स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले असले तरी त्यांचे नायक सरंजामी युगातीलच राहिले आहेत. नव्या काळाला साजेसा ज्ञानरचनाकार (इंटलेक्चुअल हीरो) त्यांना निर्माण करता आला नाही. याउलट दलितांमध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने नव्या काळाला साजेसा ज्ञानरचनाकार निर्माण झाला. त्यामुळे त्या समाजात नवी भरारी घेण्याची उमेदही निर्माण झाली. याउलट मराठा मात्र आपला ज्ञानरचनाकार नसल्याची उणीव ब्राह्मणांवर हल्ला करून, त्यांचे स्थान नष्ट करून भरून काढण्यात रमले. वास्तविक गौतम बुद्ध हा क्षत्रिय विचारवंत हा आपला इतिहासातील पहिला ज्ञानरचनाकार (इंटलेक्चुअल हीरो) आहे, असे मराठा सांगू शकले असते. पण या परंपरेशी नाते न सांगता त्यांनी बुद्धाला दलितांना देऊन टाकले!
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही प्रामुख्याने राजकीय आहे. त्यामुळे त्याच प्रतिमेशी एकरूप होऊन मराठा समाज फक्त राजकीय क्षेत्रातच कार्यरत राहिलेला दिसतो. अर्थात हीच स्थिती सर्व इतर नवजागृत समूहांचीही आहे. त्या त्या समाजात ज्यांनी आपले बौद्धिक योगदान दिलेले आहे ते सर्व योगदान आध्यात्मिक क्षेत्रातील आहे किंवा राजकीय क्षेत्राशी काही तरी संबंध असलेले आहे. याच दोन क्षेत्रांतील नायक असल्याने तीच त्यांची मर्यादा होऊन बसली आहे. म्हणूनच महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन असो की विमानतळापर्यंत असो की नवी फ्लायओव्हर असो, सर्वत्र फक्त शिवाजी महाराजांचेच नाव द्यावे असे प्रस्ताव येतात, कारण अभियांत्रिकी, भौतिकी, रसायनशास्त्र अशा जीवनाच्या अन्य क्षेत्रांत नाव घेण्यासारखे कुणी नसतेच! नाना शंकरशेट यांचे नाव खरे तर व्हीटी स्टेशनला देता आले असते, कारण त्यांनी पहिली रेल्वे कंपनी स्थापन केली होती व रेल्वेचा नवीन व्यवसाय म्हणून विचारही केला होता. ते ब्राह्मणेतर समाजातीलही होते, पण त्यांची कुणालाही या वेळी आठवणसुद्धा आली नाही, कारण नवे व्यवसाय ज्ञानाधिष्ठित असणार हे आम्हाला अद्यापही मान्य नाही. आमची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी होते व शेवटही छत्रपती शिवाजी महाराजांनीच होतो.
एक जात समूह म्हणून मराठा संख्येने सर्वात मोठा समूह आहे. तो असा न्यूनगंडाने पछाडलेला असल्यानेच कर्तृत्वाची नवी शिखरे पादाक्रांत करण्याऐवजी राखीव जागांची मागणी करण्याकडे वळला आहे. याउलट ब्राह्मण समाज अहंगंड व भयगंडाने पछाडलेला असल्याने तोही आता नव्याने संघटित होऊन परशुराम, पहिला बाजीराव अशा राजकीय क्षेत्रातील नायकांनाच घेऊन आपला बचाव करू पाहातो आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा महाराष्ट्रातील दोन मोठे समुदाय नव्या आधुनिक जाणिवांशी नाते जोडू शकलेले नाहीत, हीच आपली शोकांतिका आहे. इतर समूह अद्याप सर्व क्षेत्रांत परिघाबाहेरच आहेत, पण त्यांच्यासमोरही आदर्श मग हेच उभे राहतात. शिक्षणाचे क्षेत्रही राजकारणाचे साधन होऊन बसते. त्यातून ज्ञानाची उभारणी होण्याऐवजी मतदारसंघाची बांधणी होऊ लागते. शिक्षण क्षेत्र वेगवेगळ्या जातीसमूहांत वाटले जाते. मात्र सर्वत्र त्यातून ज्ञानरचना वगळली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच एक नव्या आधुनिक जाणिवांशी नाते जोडू शकेल असा नायक आमच्या समाजात झाला. तोही सध्या जातीच्या चौकटीत बांधला गेला आहे. दलितांमध्येही बाबासाहेबांच्या राजकीय प्रतिमेचाच वापर जास्त होत असला तरी दलितांमध्ये ज्ञान हेच मुक्तीचे साधन आहे हा विचारही रुजला आहे. त्यामुळेच राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही ते आपली वाट शोधताना दिसतात. जीवनाच्या इतर क्षेत्रांत आपले नवीन नायक असावेत यासाठी त्यांची धडपड चाललेली दिसते. अशी अनेक नावे आज हळूहळू पुढे येताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी राखीव जागांपलीकडे जाण्याचा विचार नुकताच मांडला तोही या प्रेरणेशी सुसंगतच आहे. मराठा व ब्राह्मण हे दोन बलदंड समाज इतिहासात गुदमरलेले असताना नव्या विचारव्यूहाची मांडणी करण्यास दलित समूह पुढे येतो आहे, ही नव्या प्रबोधनाची वाट आहे. हीच वाट आता इतर समूहांनीही स्वीकारून पुढे जायला हवे, तरच नवे वर्तमान घडवता येईल, अन्यथा आपण सर्वार्थाने इतिहासजमा होऊन जाऊ!

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero in political history
First published on: 30-04-2013 at 12:05 IST