सत्येंद्र श्रीवास्तव

हिंदी कवितेचे क्षेत्र मोठे आहेच, पण भौगोलिकदृष्टय़ा हे क्षेत्र हिंदीभाषक राज्यांपुरते आणि फारतर मुंबईपर्यंत मर्यादित झालेले दिसते.

हिंदी कवितेचे क्षेत्र मोठे आहेच, पण भौगोलिकदृष्टय़ा हे क्षेत्र हिंदीभाषक राज्यांपुरते आणि फारतर मुंबईपर्यंत मर्यादित झालेले दिसते. अन्यत्र राहणाऱ्या कवींना, हिंदीच्या मुख्य धारेत जणू स्थान नसते. अर्धशतकभर परदेशांतच राहणारे आणि अलीकडेच दिवंगत झालेले कवी सत्येंद्र श्रीवास्तव यांचे मुख्य धारेत मूल्यमापनच अभावाने झाले. त्या अर्थाने, काव्यक्षेत्राने स्वत:वर लादलेल्या भौगोलिक मर्यादांचा मुद्दा पुन्हा खरा ठरला. इतका की, लंडनच्या गोल्डर्स ग्रीन दहनभूमीत त्यांच्यावर गेल्या गुरुवारी अंत्यसंस्कार झाले, तरी भारतात त्यांची निधनवार्ता रविवारी आली.
आज्ममगढ येथे १९३५ साली जन्मलेल्या सत्येंद्र यांचे शालेय शिक्षण वाराणसी व अन्यत्र; तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठात (१९५३ ते ५७) झाले होते. त्यांचा विषय इतिहास, त्यातच पुढे शिकण्यासाठी ते लंडन विद्यापीठात (१९६२ पासून) गेले. पीएच.डी. मिळवून १९६८ ते ७१ पर्यंत कॅनडातील टोरंटो विद्यापीठात भारतविषयक अभ्यासशाखेत अध्यापकाची नोकरी करण्यासाठी त्यांनी ब्रिटन सोडला. मात्र पुढले दशकभर ब्रिटनप्रमाणेच त्यांनी अन्यत्रही अध्यापन केले. १९८० पासून केम्ब्रिज विद्यापीठाच्या भाषा विभागात वरिष्ठपदी रुजू होऊन तेथूनच २००३ मध्ये निवृत्त झाले.
या लौकिक कारकिर्दीतच जलतरंग (१९५२), एक किरण एक फूल (१९५४), स्थिर यात्राएं (१९७५), मिसेज्म जोन्स और वह गली.. (१९७८), सतह की गहराई (१९८०) असे हिंदी काव्यसंग्रह निघाले. भारतात असताना त्यांची कविता काहीशी पारंपरिक वळणाची होती. नवप्रवाहांची ओळख होऊनही सांकेतिकतेतून बाहेर पडली नव्हती. नंतर मात्र या कवितेला अक्षरश: विश्व खुले झाले. कवीचं हे विश्वनागरिकत्व ‘मिसेज्म जोन्स..’बद्दलच्या कवितेत दिसते.. ईस्ट लंडन भागात राहणारी ही ब्रिटिश महिला, तिचा परिसर स्थलांतरितांनीच कसा व्यापला हे उघडय़ा डोळय़ांनी पाहते आहे. संस्कृतिसंघर्षांच्या एकाच बाजूला न राहता, दुसरी बाजू समजून घेणारे कविचक्षू सत्येंद्र यांनी वापरले होते. ‘टॉकिंग संस्कृत टु फॉलन लीव्ह्ज’ (१९९५), बिटविन थॉट्स (१९९८), अनदर सायलेन्स (२००३) आणि  ‘विन्स्टन चर्चिल न्यू माय मदर’ (२००६) या त्यांच्या इंग्रजी काव्यसंग्रहांतील अनेक कविता हिंदीतून स्व-अनुवादित आहेत. विश्वनागरिकत्व पत्करूनही इतिहासाचा पीळ कसा कायम राहतो, हे त्यांच्या ‘विन्स्टन चर्चिल..’ या कवितेतून दिसते. सत्येंद्र यांचा आत्मशोध अखेर भारतीयच ठरतो. काव्यलेखनाखेरीज हिंदी व इंग्रजीत विपुल ललितलेख सत्येंद्र यांनी लिहिले. त्यांचा ‘कंधों पर इंद्रधनुष’ (१९८९) हा संग्रहदेखील निघाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hindi poet satyendra srivastava

ताज्या बातम्या