चित्रात अमुकच पद्धतीचं कौशल्य नाही, ओळखता येण्याजोगे आकार नाहीत, रंगही कमीच आणि ‘यातून काय म्हणायचंय चित्रकाराला’ या प्रश्नालाही उत्तर नाही.. अशा चित्रांकडे ‘वैभव’ नसेल, पण ही चित्रंदेखील चांगली असू शकतातच!
श्रीधर अंभोरे यांची इथली दोन्ही चित्रं अनेकांनी त्यांची सही न पाहता ओळखली असतील, इतकी अंभोरे यांची आपल्यावरली छाप अमीट आहे (‘कलाभान’मधले ‘आपण’ म्हणजे मराठीभाषक, हे निराळं सांगायला नको). अंभोरे यांना पुरस्कारांनी गौरवून, महाराष्ट्रातल्या काही संस्थांनी तरी मराठी वाचकांना पाहायला लावणाऱ्या या रेखाकलावंताचे पांग फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.. परंतु मानसन्मानांवरच आपलं कार्य मोजलं जावं असं अंभोरे यांना वाटत असतं, तर मग  तथाकथित ‘पद्धतशीर प्रगती’ करून घेणं त्यांना काही अशक्य नव्हतं.. मुखपृष्ठं, मग चित्रविक्री, पुरेसा ग्राहकवर्ग असल्याची खात्री झाल्यावर मग दणक्यात प्रदर्शन अशी ‘पद्धतशीर पावलं’ अजिबात न उचलता निरलसपणेच अंभोरे रेषेशी प्रामाणिक राहिले. तिला हवं, तसं वाहू देत राहिले.
हेच.. हेच जे आहे, त्याला एक फ्रेंच चित्रकार ‘ल् आर्त ब्रूत’ म्हणाला होता.. हा शब्द त्यानं स्वतबद्दल योजला होता, हे विशेष. मी ‘तुमच्या त्या पक्क्या कलेचं’ प्रतिनिधित्व करत नाही, असं तो म्हणू इच्छित असावा, पण तो म्हणाला की ‘माझी कला कच्ची आहे.. (अनाघ्रात, अम्लान अशा अर्थानं कच्ची).. गॅलरीत विकण्यासाठीच कलानिर्मिती करणारे लोक असतात, त्यांच्यापेक्षा ही माझी कला निराळी आहे आणि बालकला, आदिवासींची कला यांच्याशी माझ्या कलेचं नातं आहे असं मी मानतो’.. १९४५ साली जॉन डय़ुबफे नावाचा कलावंत हे म्हणाला! त्या वेळी तर,  प्रस्थापित कलेला हादरे देऊ पाहणारी डाडाइझमची चळवळ (१९१३च्या आसपास जन्मलेली)  थकली होती आणि ‘फ्लक्सस’सारखी तशीच दुसरी चळवळ (१९५९ साली) जन्माला यायची होती, तेव्हा डय़ुबफेनं हा हादरा दिला. चाळिशीनंतरच माझी चित्रकला सुरू झाली, असं अंभोरे म्हणाल्याचं कुठेतरी वाचलं असेल.. तर या डय़ुबफेनं बापाचा धंदा सांभाळण्यासाठी चाळिशीपर्यंत कुंचला दूरच ठेवला होता. डय़ुबफे स्वतच्या आणि स्वतसारख्या कलेबद्दल, त्यामागच्या ऊर्मीबद्दल बोलला, तेव्हा युद्धक्लान्त युरोपात ‘कुठंतरी निरागसपणा टिकतोय’ असा शहारा सुखदच ठरला असावा. कारणं काहीही असोत, पण डय़ुबफे ‘मोठा’ झाला. गॅलरीत त्याची चित्रं विकली जाऊ लागली! म्हणून त्यानं नाटकांचे सेट वगैरे केले तर तेही विकले जाऊ लागले. कला लोकांना परवडावी, म्हणून स्क्रीन प्रिंटिंगचं तंत्र त्यानं वापरलं, तर त्याच्या मृत्यूनंतर (१९८५) ही सेरिग्राफिक चित्रंसुद्धा लिलावांमध्ये वगैरे मोठय़ा बोल्या मिळवू लागली! पराभवच की हा एकप्रकारे, डय़ुबफेच्या स्व-प्रतिमेचा.
पण आपल्याला अंभोरेंच्या किंवा डय़ुबफेच्या तपशिलांत फक्त एवढय़ाचपुरतं शिरायचंय की, अंभोरे यांची चित्रं आपल्याला आणि डय़ुबफेची चित्रं पाश्चात्यांना का आवडतात, हे आपल्याला माहीत व्हावं. डय़ुबफेनं कलेच्या अनाघ्राततेची जी बाजू घेतली, ती दुसऱ्या महायुद्धकाळात त्या समाजाला खरोखरच हवी होती. डय़ुबफेची १९४५ नंतरची चित्रं युद्धोत्तर मनाचा उद्गार ठरली होती. पुढे (१९७०नंतर) चित्रांमधून त्यानं रेषेतून  मिती (डायमेन्शन) शोधण्याचा प्रयत्न केला, असं त्याची चित्रं सांगतात. दुसरीकडे, अंभोरे यांचं सातत्य ही मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याची जणू पहिली पायरी होती. मजकुरापेक्षा निराळं आणि ‘इलस्ट्रेशन’ (कथेसाठी चित्र, कवितेसाठी चित्र वगैरे) न ठरणारं रेखाटन अंभोरे करत आहेत, असा जणू ‘शोध’ प्रत्येक रसिक मराठी वाचकाला ऐंशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत लागला होता! हा शोध लोकांनी लावलाय की नाही, याची तमा न बाळगता अंभोरे यांची रेषा सुरूच राहिली.. या रेषेनं स्त्रीसुलभ नर्तन करावं, अशी अंभोरे यांची इच्छा असणार, मात्र त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन ग्मज्मलांनी आणि स्त्रीला आयडिअलाइज करणाऱ्या कवितांनी घडवलेला असावा, असं त्यांची चित्रं वर्षांनुर्वष बघणाऱ्यांना माहीत असतंच जणू.. ते मत खोडून काढणं अशक्य बनतं.
बनूदे. डय़ुबफे आवडणारे कुणी पाश्चात्य लोक आणि अंभोरे आवडणारे आपण यांच्यात गुणांचं साम्य आहे : चित्र म्हणजे अमुकच, कला म्हणजे अमुकच, असं आपण अजिबात मानत नाही आणि चित्रात केवळ कौशल्याचं, रंगांचं, आकारांचं आणि संदेशांचं ‘वैभव’ आहे म्हणून ते चांगलं असं न पाहाता, आपण चित्र ही चित्रकाराची एक सहज कृती आहे किंवा त्याला होणाऱ्या भासांपासून ते अगदी त्रासांपर्यंतच्या कुठल्याही मनोवस्थेची त्यानं पकडलेली लय त्याच्या रेषेतून कशी बरोब्बर उतरतेय हे एकदा आपल्याला जाणवलं की, मग – हा चित्रकार मोठाच आहे, श्रेष्ठच आहे अशी खूणगाठ आपण बांधतो!
अर्थात पुढे असं आहे की, अशा अनेक चित्रकारांबद्दलच्या खूणगाठी आपण बांधलेल्याच असतात.. कुणाचं हे पटतं म्हणून, कुणाचं ते पटतं म्हणून..
.. त्याच्याही पुढलं असं की, प्रत्येक चित्र पाहताना, अनेक चित्रकारांबद्दल आपण बांधलेल्या आपल्या जास्तीत जास्त खूणगाठी आपण पुन्हा उघडायच्या- मोकळय़ा करून सोडवून टाकायच्या आणि मग पुन्हा बांधायच्या! एक चित्र पाहताना खूप चित्रं आठवायची.. फक्त त्या चित्रकाराचीच नव्हे तर बाकीच्यांची सुद्धा. हे चित्रकारावर ‘अन्यायकारक’ वगैरे असल्याची भीती काढून टाकायची आणि खूणगाठी ताज्यातवान्या ठेवण्याचा आपला खेळ प्रत्येकाशी खेळत राहायचं.. मग चित्रकारांनाही बरं वाटतं.. ‘अरे, तुम्ही खरंच खेळताय माझ्या चित्रांशी..’ असं! मग हळूच.. ‘तुमचं हे चित्र मात्र तितकं नाही हं आवडलं’ असं मोठ्ठय़ा चित्रकारालासुद्धा तुम्ही सांगू शकता आणि चित्रकारही तुमचं ऐकतात.
इथं आज मुद्दामच आपण फक्त रेषांनी बनलेल्या चित्रांची उदाहरणं घेतली. अशा चित्रांमधून चित्रकाराच्या मनोवस्थांची आपल्याला त्याच्या (अगोदरच्या) चित्रांतून जाणवलेली लय आणि चित्रातल्या रेषा यांचा ताळमेळ घालून पाहाणं प्रेक्षकासाठी तुलनेनं सोपं असतं, म्हणून! मात्र रंगचित्रांतून किंवा अमूर्त चित्रांतूनही अशीच लय प्रेक्षकाला जाणवू शकत असते. अमूर्तचित्रांना ‘हे क्काय, कुण्णीपण करील’ असं हिणवणारे लोक हल्ली कमी का होईना, पण आहेत. त्यांच्याखेरीजचे जे बहुसंख्य आहेत ते असेल अमूर्तचित्रात काहीतरी, म्हणून गप्प बसतात.. त्यांनीही अमूर्तचित्रांची लय प्रत्येक  चित्रकाराच्या (त्याच्या-त्याच्या चित्रांपुरती) आधी शोधायची, मग अनेक अमूर्तचित्रकारांच्या लयी एकमेकांशी ताडून पाहायच्या आणि त्याहीनंतर मग १९५०च्या दशकातली अमेरिकन ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’ची चळवळ आणि १९७० पासूनची भारतीय अमूर्तचित्रं यांच्यातले साम्यभेद शोधायचे.. हे खेळ अवघड आहेत आणि वर्षांनुर्वष खेळल्याखेरीज जमत नाहीत.
पण चित्राला मुद्दाम ‘वाईट’ ठरवायचं नाही, हे आधी ठरवून घेऊन असा खेळ (भले आपल्याला जमेल तितकाच) खेळल्याखेरीज एखादं चित्र चांगलं का नाही, हे कळत नाही.  लय फक्त चित्रात नाही.. तुमच्या खूणगाठींमध्येही ती आहेच!