हल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत..
जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा कधी नसतोच. तो कुणाबरोबर नसला तरी स्वत:बरोबर असतो. स्वत:शी संवाद करीत असतो. हा संवादही खुंटला तर तो वेडापिसा होता. एकटा राहात असतानाही तो रोज कोणा ना कोणाशी जोडला जात असतो. जगाचा संसार हे परस्परसंबंधांचे अवाढव्य जाळे आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावहारिक अशा असंख्य संबंधांची नवी जोडणी सतत होत असते वा जुन्या जोडणीमध्ये परिवर्तन होत असते आणि या जोडण्या एकमेकांवर प्रभाव टाकीत असतात. नेटवर्कशिवाय माणूस जगूच शकत नाही. निसर्ग म्हणजे नेटवर्क आणि त्यात माणूस आलाच.
यात नवीन काय सांगितले असा प्रश्न पडेल. माणूस प्रतिक्षणी स्वत:ला कशा ना कशाशी जोडतो, त्याशिवाय तो विचारच करू शकत नाही यात नवीन काहीही नाही. नवीन बाब ही आहे की, माणसांच्या या असंख्य जोडण्या आता प्रत्यक्ष पाहता येतात. त्यांचा अभ्यास करता येतो. त्यांचे विश्लेषण करता येते. त्यावरून निष्कर्ष काढता येतात आणि पुन्हा ते निष्कर्ष तपासून पाहता येतात. माणूस कसा जगतो हे प्रत्यक्ष पाहताना त्याचा अभ्यास करता येणे हे तंत्रज्ञानामुळे साध्य झाले. यातूनच ‘नेटवर्क रीसर्च’ ही नवी शाखा उदयाला आली. या शाखेने सुरू केलेल्या अभ्यासातून माणूसच माणसाला अधिक समजून घेऊ लागला आहे.
मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, गुगल अशी अनेक साधने आपण वापरतो. त्यांच्यामार्फत अनेक व्यवहार करतो. संदेश पाठवितो, बोलतो, माहिती विचारतो, माहिती सांगतो, सल्ला मागतो, सल्ला देतो, चौकशा करतो, अफवा पसरवितो, गॉसिप करतो. असंख्य उद्योग याच्यामार्फत होतात. माणूस पूर्वीही हे करीत होता, पण त्याची नोंद किंवा रेकॉर्डिग होत नव्हते. आता नोंद होते. या सर्व व्यवहारातून आपला स्वभाव प्रगट होत असतो. केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या समाजाचा, आपल्या गटाचा, आपल्या व्यवसायाचा. आपल्या स्वभावाचे असे अनेक पैलू नोंदले जात असतात. माणूस समजून घेण्यासाठी याहून उत्तम सामग्री कुठली? माणूस जसा आहे तसा, त्यामध्ये काहीही फेरबदल न करता, त्याच्या हालचालीतून निरखता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. अब्जावधी माणसांचा असा अद्ययावत डेटा आज जगात प्रतिक्षणी तयार होत आहे आणि अत्यल्प प्रमाणात त्याचा अभ्यासही सुरू झाला आहे.
या माहितीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ती प्रतिक्षणी तयार होत असते. म्हणजेच ती जिवंत असते. ताजी, टवटवीत असते. माणसाचा अभ्यास करण्यासाठी पूर्वी त्याच्या मुलाखती घेतल्या जात. आजही मानसोपचार करणारे रुग्णाच्या मुलाखती घेतात, परंतु मुलाखतीत माणूस पूर्ण उघडा होत नाही. अनेक गोष्टी तो झाकून ठेवू शकतो. मात्र दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करताना तो जसा आहे तसाच दिसतो. मानसोपचारतज्ज्ञाला रुग्णाची मुलाखत घेऊन जितकी माहिती मिळेल, त्याच्या कैकपट अधिक माहिती त्याच्या मोबाइल संभाषणाच्या टेप्स ऐकल्या तर मिळेल.
माणसाकडून सतत प्रगट होत जाणारी ही माहिती सच्ची असते आणि म्हणूनच मौल्यवान असते. शास्त्रज्ञांना तिचे मोल कळते. कारण अशा सच्च्या माहितीच्या आधारे गृहीतक मांडता येते. एकदा गृहीतक हाती आले की संशोधनाला दिशा येते. मग हे गृहीतक अधिक माहिती मिळवून किंवा प्रयोग करून तपासता येते. अशा चोख तपासण्या झाल्या की गृहीतकातून निश्चित निष्कर्ष काढता येतो आणि आपल्या हातात वैश्विक नियम येतात. निसर्गातील असे अनेक नियम आपण शोधून काढले, पण ते मुख्यत: स्थूल सृष्टीतील होते. आता निसर्गातही अनेक चमत्कृती समोर आल्या आहेत, स्थूल सृष्टीपेक्षा सूक्ष्म सृष्टीचा पसारा अवाढव्य म्हणावा असा आहे व त्यात अधिकाधिक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. निसर्गातील या नव्या गोष्टींची माहिती अखंड जमा होते व संगणकात साठत राहते. त्यात भर पडत आहे ती माणसाच्या माहितीची. पण नुसती माहिती असून चालत नाही. केवळ माहितीवर आधारित निष्कर्ष चुकीचे ठरतात. निसर्गातील व माणसांमधील अनेक घटकांबद्दल खूप माहिती मिळू शकते व तशी ती जमा झालीही आहे. आता समस्या आहे ती या असंख्य घटकांमधील परस्परसंबंध शोधून काढण्याची. हे परस्परसंबंध पूर्ण चित्र समोर आणतात, नुसती माहिती तसे चित्र देत नाही. हे परस्परसंबंध म्हणजेच नेटवर्क. हे परस्परसंबंध जितेजागते असतात व ते जिवंतपणीच समजून घ्यायचे असतात. नुसते घटक माहीत झाले तर जंत्री तयार होते. जंत्रीतून बौद्धिक आनंदापलीकडे हाती काही लागत नाही. मात्र परस्परसंबंध जेव्हा कळून येतात तेव्हा ती माहिती आपल्याला कृतिशील करू शकते.
‘ह्य़ूमन जेनोम प्रोजेक्ट’वरून ही बाब स्पष्ट होईल. माणसाच्या गुणसूत्रांची माहिती या प्रकल्पातून जगासमोर आली. त्यामुळे रोगांवर हमखास इलाज करणारी औषधे शोधता येतील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. उलट औषधांची संख्या बरीच कमी झाली. याचे कारण अनेक औषधे कुचकामी आहेत हे नव्या माहितीतून समजले  जरी असले, तरी खरे कारण म्हणजे गुणसूत्रांची माहिती झाली असली तरी त्यांच्या आपापसातील परस्परसंबंधांची तितकीशी माहिती आपल्याला अद्याप झालेली नाही. त्यांचे नेटवर्क कसे काम करते हे अद्याप कळलेले नाही. या प्रकल्पातून पुढे आलेली माहिती महत्त्वाची नक्कीच आहे, पण ती पुरेशी नाही. त्यातून रोगाचे डायनॅमिक्स अद्याप कळत नाही, कारण ते डायनॅमिक्स हे गुणसूत्रांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून आहे. मोबाइल, गुगल वापरणाऱ्या माणसाकडून जशी जिवंत माहिती मिळते, तशी या गुणसूत्रांतून अद्याप मिळायची आहे. त्यासाठी गरज आहे ती नेटवर्किंगच्या विशेष अभ्यासाची.
अल्बर्ट लाझारो बाराबसी हे नॉर्थईस्टर्न विश्वविद्यालयातील ‘सेंटर फॉर कॉम्प्लेक्स नेटवर्क रीसर्च’चे प्रमुख आहेत. त्याच्या प्रयोगशाळेतील एक शाखा ही वैद्यक व जीवशास्त्रातील नेटवर्किंगचा अभ्यास करते. बाराबसी यांचा प्रश्न साधा आहे. मोटारीमध्ये सुमारे पाच हजार पार्ट असतात. ती नादुरुस्त झाली की मॅकॅनिक ती दुरुस्त करतो, कारण त्याला सर्व पार्टची माहिती असते. मग शरीरातील सर्व पार्ट माहीत असताना गुंतागुंतीचा आजार झाला की डॉक्टरांना ते सहजतेने दुरुस्त का करता येत नाहीत? याचे उत्तर मॅकॅनिककडे असलेल्या मोटारीच्या ब्लूप्रिंटमध्ये आहे, असे बाराबसी यांचे म्हणणे. या ब्लूप्रिंटमध्ये असलेला ‘वायरिंग डायग्राम’ हा मोटारीची खरी माहिती देतो, पार्टस् नव्हेत. याचप्रमाणे शरीरातील असंख्य घटकांचे परस्परसंबंध तपासून पाहिले तरच रोग का होतो, कधी होतो व कसा होतो हे समजून घेता येईल. बाराबसींच्या प्रयोगशाळेत हेच केले जाते. अस्थमा, हृदयरोग, कर्करोग अशा आजारात पेशींमधील नेटवर्कमध्ये काय समस्या निर्माण होतात, कोणते नेटवर्क कुचकामी ठरते वा नवे तयार होते याचा अभ्यास तेथे सुरू आहे. रोगाचे पेशीतील मूळ व त्या पेशीचा अन्य पेशींचा येणारा संबंध यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच ब्रेकथ्रू मिळेल अशी खात्री त्यांना वाटते.
हेच मॉडेल आर्थिक क्षेत्राला लावले पाहिजे असा बाराबसी यांचा आग्रह आहे. मात्र तेथे सर्व माहिती उघड केली जात नाही. रुग्णांची खरी माहिती रुग्णालयांतून मिळते. प्रसंगी त्यांना प्रयोगशाळेत बोलावता येते. आर्थिक क्षेत्रातील सर्व घटकांची अशीच माहिती मिळाली व त्यातील परस्परसंबंध तपासून पाहता आले तर या समस्या सोडविण्यासाठी नवीन दृष्टी मिळेल, असे बाराबसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत आर्थिक विषयांचा अभ्यास होत नाही, पण सामाजिक विषयांचा होतो. वर म्हटल्याप्रमाणे माणसाचा स्वभाव प्रगट करणारी जास्तीत जास्त माहिती जमा करून त्यातील परस्परसंबंध प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातात. मग लक्षात येते की माणसाला समजून घेण्यासाठी एकच शास्त्र उपयोगी पडत नाही. जीवशास्त्राबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अन्य शास्त्रांमधील नेटवर्कही तपासून पाहावे लागते. किंबहुना, नेटवर्क कसे काम करते, या मुख्य प्रश्नाचाही वेध घ्यावा लागतो. आज बाराबसी यांच्यासाठी तोच मोठा प्रश्न आहे आणि पुढील काळात विज्ञानालाही याच प्रश्नावर काम करावे लागणार आहे.
या संशोधनातून दोन मुख्य बाबी पुढे आल्या आहेत. नेटवर्क, मग ते कोणतेही असो, ते नेटवर्क स्वत:चे नियम तयार करते व नियमाबरहुकूम काम करते. जगात अस्ताव्यस्त अशी कोणतीही गोष्ट नाही. घटना घडू लागली की पॅटर्न तयार होतातच आणि त्या साच्याबरहुकूम पुढच्या घटना घडत जातात. भरपूर माहिती जमा झाली व त्यांच्यातील परस्परसंबंध नीट समजला की हे साचे लक्षात येतात.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्व माणसांसाठी हे साचे किंवा वर्तणुकीचे पॅटर्न अगदी समान आहेत. ते मोजकेच आहेत, पण सारखेच आहेत. हल्लीचा समाज हा व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तीच्या वैशिष्टय़ांना अधिक महत्त्व दिले जाते. या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असल्याने जगातील माणसांचा अभ्यास करताना असंख्य वेगवेगळे साचे मिळतील असे बाराबसी यांना वाटले होते, पण तसे त्यांना आढळले नाही. उलट वर्तणुकीचे साचे सारखेच दिसले. मग जगातील पाच प्रमुख खंडातील माणसांची माहिती गोळा करण्यात आली. आफ्रिकेतील माणूस व अमेरिकेतील माणूस यांच्यात फरक दिसला पाहिजे होता. पण तेथेही तो दिसेना. तुलनात्मक अभ्यास करण्याचे प्रकल्प त्यामुळे बंद केले गेले, कारण तुलना करण्याजोगा फरकच आढळेना. जगात कुठेही जा, श्रीमंत असो, गरीब असो, झोपडीत असो, बंगल्यात असो, स्त्री असो पुरुष असो, माणसाचे वर्तन ठरविणारे साचे सारखेच आहेत. ‘माणसांमधील फरक शोधणे हेच मोठे आव्हान झाले आहे, कारण जमा होत असलेली अवाढव्य माहिती माणसातील साम्यच ठळकपणे दाखविते,’ असे बाराबसी यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या भारतीय तत्त्वविचाराची खात्री पटविणारा हा अस्सल पुरावा आहे.
अजून कित्येक डेटा शास्त्रज्ञांसमोर आलेला नाही. कंपन्या तो देत नाहीत. हा डेटा संशोधनासाठी मिळावा म्हणून काही शास्त्रज्ञांनी मोहीम सुरू केली आहे. माणसाला समजून घेण्यासाठी त्यांना ही माहिती हवी आहे, उत्पादन खपविण्यासाठी नव्हे. या संशोधनाचे महत्त्व आणखी एका गोष्टीसाठी आहे. जगातील जिवंत माहिती फक्त साचे निर्माण करीत नाही, तर ती स्वत:च स्वत:चे नियंत्रण करते, स्वत:ची व्यवस्था लावते. याबद्दलचा बाराबसी यांचा संशोधन निबंध जगात गाजतो आहे. एडवर्ड डी बोनो यांनी दोन दशकांपूर्वी ‘सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम’ अशी मनाची ओळख करून दिली होती. तो प्रकार प्रत्यक्षात कसा घडतो ते आता पाहता येते. माणूस गोंधळ घालतो आणि व्यवस्थाही निर्माण करतो. हे सर्व कळत-नकळत होत असते. परस्परसंबंधांचे जाळे कळले की माणसाला स्वत:चीच ओळख होईल. तो शहाणा होण्यासाठी याचीच गरज असते आणि भारतीय अध्यात्मही याचाच आग्रह धरते.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?