जगभर पसरलेली, एकच एक असलेली मानवजात मुळात आफ्रिका खंडात उत्पन्न झालेली असून तिथून ती जगभर पसरलेली आहे. मानवजातीच्या वेगवेगळ्या समूहांनी ते ज्या ज्या प्रदेशात स्थिर झाले तिथे तिथे, सुमारे फक्त आठ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लावून ते अन्नउत्पादक व संग्राहक बनले. त्यांनी तेथील हवामानाशी व परिस्थितीशी जुळवून घेतले व आता त्यांना स्थिर जीवन जगणे शक्य झाले.
आज पृथ्वीवर जगभर वस्ती करून असलेल्या माणसांमध्ये ढोबळपणे आफ्रिकन लोक काळ्या रंगाचे, युरोपियन लोक गोऱ्या रंगाचे, पूर्व आशियातील लोक पिवळसर रंगाचे व भारतीय लोक साधारणत: गहुवर्णीय व संमिश्र रंगाचे आहेत. या वेगवेगळ्या प्रदेशांतील लोकांच्या शरीरबांधणीत व चेहरेपट्टीतही पुष्कळ फरक असल्यामुळे ते मुळापासून वेगवेगळ्या मानववंशांचे लोक आहेत, असे अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे विसाव्या शतकाच्या मध्यानंतरही काही काळ मानले जात होते आणि त्यांचे नेग्रिटो, आर्य, मंगोलाइड, मेडिटरेनियन (ऊर्फ द्रविड), अल्पाइन वगैरे एकूण सहा वेगवेगळे स्वतंत्र मानववंश आहेत असे मानले जात होते. म्हणजे आस्तिक लोकांना असे वाटत होते की, ईश्वराने पृथ्वीवर मानव निर्माण केला तो अशा वेगवेगळ्या वंशांचा, वेगवेगळ्या रंगांचा, शरीरबांध्यांचा व वेगवेगळ्या चेहरेपट्टीचा असाच.
परंतु गेल्या अर्धशतकात जनुकशास्त्रातील (जेनेटिक्स) डी.एन.ए., क्रोमोसोम इत्यादीबाबतच्या प्रगत संशोधनामुळे आणि (अ) वेगवेगळ्या ठिकाणी जमिनींतील उत्खननात सापडलेले हाडांचे पुरावे आणि (ब) सध्या जिवंत असलेल्या माणसांचे डी.एन.ए. यांच्या सखोल अभ्यासाने, त्या शास्त्राच्या शास्त्रज्ञांनी आता असे सिद्ध केलेले आहे की (१) आज वेगवेगळ्या वंशांची वाटणारी मानवजात मूलत: एकच असून, जगातील सर्व खंडांतील माणसे एकाच मानव प्राणिजातीपासून निर्माण होऊन ती वेगवेगळ्या परिस्थितीत उत्क्रांत होत राहिल्यामुळे, त्यांच्यात आज दिसणारे फरक निर्माण झालेले आहेत. (२) एवढेच नव्हे तर आता असेही सिद्घ झालेले आहे की, जगभर पसरलेली, एकच एक असलेली मानवजात मुळात आफ्रिका खंडात उत्पन्न झालेली असून तिथून ती जगभर पसरलेली आहे. आज जगाची लोकसंख्या सात अब्ज आहे. म्हणजे आज या मानवजातीचे सातशे कोटी नमुने जगात जिवंत आहेत.
आपण मागील प्रकरणात हे पाहिले आहे की, या मानवजातीचा पूर्वज, वन्य प्राणी असलेली, एक बिनशेपटीची मर्कट जात, जी मागील दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागली ती होती. या ‘रामपिथेकस’ नाव दिलेल्या मर्कट जातीच्या सांगाडय़ांचे पुरावे उत्खननात सापडलेले आहेत. (ज्यांचा काळ विज्ञानाने सुमारे एक कोटी वीस लाख वर्षे ठरवलेला आहे.) मग सुमारे साठ-सत्तर लाख वर्षांपूर्वी या जातीपासून ऑस्ट्रेलोपिथेकस किंवा दाक्षिणात्य वानर ही नवीन जात जी काहीशी मानवासारखी असलेली पण तोंड काहीसे चिंपांझीसारखे असलेली निर्माण झाली. ती जात उत्क्रांत होत होत अखेरीस म्हणजे फार तर दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस् म्हणजे दोन पायांवर ताठ चालणारी आदिमानवजात बनली. म्हणजे हे पहिले आदिमानव आफ्रिकेत, तेथील विशिष्ट माकडांपासून उत्क्रांत झालेले होते.
म्हणजे सुमारे तेरा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हा आदिमानव आफ्रिकेत वावरत होता. या दोन पायांवर ताठ चालू शकणाऱ्या आदिमानवाने त्याला प्राप्त झालेल्या थोडय़ाशा अक्कलहुशारीने तेथील जंगलमय खडतर परिस्थितीशी टक्कर देत जगायला सुरुवात केली. हळूहळू त्याची बुद्धिमत्ता काहीशी वाढत गेली व तो अधिकाधिक चांगली दगडी हत्यारे बनवू लागला, त्याच्या रानटी टोळीजीवनात अधिकाधिक शब्दांचा बोलण्यासाठी वापर करू लागला. त्याने अग्नीचाही शोध लावला. तो शेकोटी पेटवू शकत होता. त्याच्या टोळीतल्या एखाद्याचे हाड मोडले तर बाकीचे त्याची काळजी घेत. एखाद्याचा मृत्यू झाला तर टोळी त्याचे दफन करी. नंतर काही काळाने त्यांच्यापैकी काही टोळ्या अन्नशोधार्थ आफ्रिकेबाहेर पडू लागल्या. त्या काळी ईशान्य आफ्रिकेत आज जिथे सुवेझ कालवा आहे तिथे आफ्रिका व आशिया खंड एकमेकाला जमिनीने जोडलेले होते. त्यामुळे या आदिमानवजाती आधी मध्य-पूर्वेत, मग वायव्य-उत्तर भारतात आणि तिथून अगदी आशिया खंडाच्या पूर्व भागातही पोहोचल्या. इंडोनेशियात जावा येथे व चीनमध्ये पेकिंग येथे उत्खननात सापडलेले सांगाडे चार-पाच लाख वर्षांपूर्वीचे असून ते या आदिमानवजातीचे आहेत. अन्न भाजून खाण्यासाठी अग्नीचा वापर त्यांना माहीत होता व काही थोडे शब्द तरी त्यांना नक्की बोलता येत असावेत, असे उत्खननात सापडलेल्या त्यांच्या कवटय़ांच्या आतील आकारावरून निश्चित करता येते. पण पुढे केव्हा तरी हे आदिमानव पृथ्वीतलावरून नष्ट झाले असावेत. त्याची नक्की कारणे माहीत नाहीत.
आफ्रिकेत मागे राहिलेले आदिमानव जे तेथील आव्हानांना तोंड देत चिकाटीने तगून राहिले त्यांची संख्या एकूण जेमतेम दहा हजार असू शकेल. त्यांच्या जनुकसंचयात व त्यामुळे त्यांच्या शरीरात पुष्कळ बदल होत होत दोन लाख वर्षांपूर्वी ते ‘होमो सॅपियन’ म्हणजे आजचा ‘शहाणा मानव’ बनले. त्यातच आजपासून एक लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी कडाक्याचे पहिले हिमयुग येऊन गेले. तोवर उत्क्रांत होत असलेली ही मानवजात शिकार करीत, पाला, फळे, कंदमुळे ओरबाडून त्यावर गुजराण करीत कशीबशी टिकून राहिली.
नंतर सव्वा लाख वर्षांपूर्वी (दोन हिमयुगांमधल्या काळात) काही शे किंवा हजार माणसांच्या काही तुकडय़ा आफ्रिका सोडून, सुवेझजवळ जोडलेल्या त्याच जमिनीवरून चालत चालत अरेबियाच्या उत्तरेच्या जॉर्डन, लेबेनॉन, सीरिया इत्यादी भागात आल्या. परंतु ते लोकही कालौघात फारसे टिकले नाहीत, असे वाटते. त्यानंतर पुन्हा एकदा सुमारे ८५ हजार वर्षांपूर्वी दुसरे हिमयुग आले. प्रत्येक हिमयुगात दोन्ही ध्रुवांवरची बर्फाची टोपी रुंदावते व त्यामुळे समुद्र काहीसा मागे जाऊन त्याची पातळी कित्येक मीटर खाली जाते. त्या काळात आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या टोळ्यांतले काही ‘होमो सॅपियन’ लोक अरेबियात स्थिर झाले, तर काही जण तुर्कस्तानमार्गे पश्चिमेला युरोप खंडात गेले. आणखी काही टोळ्या वेगळ्या फुटून भारतात येऊन सिंधू नदीच्या काठाकाठाने तिच्या उगमापर्यंत व पुढे पूर्व आशियातील देशांमध्ये गेल्या. काही टोळ्या दक्षिणेकडे पसरून त्यातील काही टोळ्या आकसलेला समुद्र, लाकडांच्या तराफ्याने ओलांडून ऑस्ट्रेलियातही पोहोचू शकल्या. काही जण उत्तर-ईशान्येकडून बेअरिंगच्या आजच्या सामुद्रधुनीत त्या काळी पाणी नसल्यामुळे व पायवाट असल्यामुळे, चालत चालत व शिकार करीत करीत अलास्कामार्गे अमेरिकेतही पोहोचल्या व त्या खंडात पसरल्या. हे सगळे घडले ते पन्नास-साठ हजार वर्षांत वेगवेगळ्या काळी व स्थळी घडलेले आहे. आणि अशा प्रकारे मानवजात पृथ्वीवर सर्व खंडांत जवळजवळ सगळीकडे पोहोचून तिने पृथ्वी व्यापली.
या मानवजातीच्या वेगवेगळ्या समूहांनी ते ज्या ज्या प्रदेशात स्थिर झाले तिथे तिथे, सुमारे फक्त आठ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लावून ते अन्नउत्पादक व संग्राहक बनले. त्यांनी तेथील हवामानाशी व परिस्थितीशी जुळवून घेतले व आता त्यांना स्थिर जीवन जगणे शक्य झाले. या लोकसमूहांनी आपापल्या प्रदेशात आपापली संस्कृती, विविध देवकल्पना, ईश्वरकल्पना, धर्मकल्पना व पुराणे, धर्मग्रंथ इत्यादी निर्मिली. हे सर्व संस्कृतिसंवर्धन (सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर परंतु) गेल्या सुमारे फक्त पाच-सहा हजार वर्षांत घडलेले आहे. त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे शेवटच्या अवघ्या चार-पाच शतकांत याच शहाण्या मानवाने विज्ञानाच्या विविध शाखांद्वारे निसर्गाची, विश्वाची आणि विश्वशक्तींची विश्वासार्ह माहिती मिळवून आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनेक शाखांतील ज्ञानाचा उपयोग करून घेऊन वाढत्या जनसंख्येला इथे पृथ्वीवर सुखाने जगता येईल अशी धडपड चालविली आहे. या सर्व वाटचालींत मानवाने प्रत्येक क्षणी सहन केलेल्या अडचणींमुळे व वाढलेल्या भीतीमुळे आणि त्यांनी कल्पित ईश्वराचे अस्तित्व, गृहीत धरलेले असल्यामुळे, जेव्हा जेव्हा त्याला यश मिळाले तेव्हा तेव्हा ते ईश्वराच्या कृपेने मिळाले व जेव्हा जेव्हा अपयश मिळाले तेव्हा तेव्हा ते ईश्वराच्या अवकृपेने झाले असे त्याला वाटले.
शरद बेडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human evolved in africa
First published on: 12-01-2015 at 12:26 IST